Memory Exercises Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

विमान उडाले, पण मुले खालीच राहिली! विसरभोळेपणाचा कळस आणि मातेचा टाहो; तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा तर देत नाही ना?

Modern Lifestyle Challenges: विसरभोळेपणाचा कळस म्हणजे एकदा विमान प्रवासात, दोन जुळ्या बालकांना ‘बेबीकार्ट’मध्ये बसवून एक युरोपियन महिला त्यांना फिरवत होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

स्मिता तिंबले

जे नकोसे आहे जे मनाला त्रासदायक आहे ते विसरायलाच हवे. त्याला आपल्या मनात स्थान नकोच. पण, जे महत्त्वाचे आहे ते विसरता कामा नये. विसरभोळेपणा हा शाप ठरू शकतो.

‘प्लीज’, ‘सॉरी’, आणि ‘थँक्यू’ हे तीन ‘गोल्डन वर्डस्’ शाळेतील मुलांना शिकवले जातात. त्यांना वेळोवेळी या शब्दांचा वापर करावा असे शिकवले जाते. परंतु मुलांनी न विसरता एखादे काम करावे हे त्यांना शिकवले जात नाही. वेगवेगळे प्रोजेक्टस् वगैरे देऊन आपण मुलांना आठवण ठेवायला शिकवतो, त्यांच्या मेंदूला व्यायाम द्यायचा प्रयत्न करतो पण ते सारे तेवढ्यापुरतेच. मुलांपेक्षा पालकाच्या डोक्यालाच याचा ताप जास्ती असतो.

सांगायचा मुद्दा असा, की लहान वयात कुठल्याही गोष्टीची आठवण ठेवायची सवय आपण लावली पाहिजे. कारण, विसरभोळेपणा हल्ली एखाद्या महामारीसारखा वाढत चाललेला आहे. ‘विसरलो बुवा’ हे वाक्य न उच्चारणारे विरळाच.

तुम्ही म्हणाल ही एवढी आत्मविश्वासाने या विषयावर लिहू शकते, म्हणजे विसरणाऱ्यांपैकी ही नक्कीच नाही. पण छे हो. कसलं काय! मी काय काय विसरत असते यांची यादी बरीच मोठी आहे. गॅस शेगडीच्या जवळून बाजूला होत मी तुरुतुरु चालत फ्रिजपाशी येते. पण कशासाठी आले होते हेच विसरते.

छानपैकी नाचणे धुऊन संध्याकाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून ठेवते. सकाळी त्याचे घावन करायचे साफ विसरून लगबगीने उपमा करायला रवा कढईत भाजायला घेते. नातीचे डान्स क्लास नेमके कुठल्या दिवशी ते सांगताना माझी तारांबळ उडते. मुलगी कुठल्या देशात व कधी फिरायला जाणार असते हे विचारा, माझी दांडी गूल झालीच. माझ्या मुलाच्या शाळेतील मित्रांची नावे पाठ करून लक्षात ठेवायला बरीच वर्षे जावी लागली

कुणालाही आपल्या बालमित्र- मैत्रिणींची, शिक्षकाची नावे व त्यांचे पत्ते वगैरे आठवणीत राहिलेले पाहताना खरोखर माझ्या मनात त्याच्याविषयी आदर काठोकाठ भरून येतो. कारण अस्मादिक याबाबतीत शून्य! पाटी अगदी कोरी. त्याला आता काही उपाय नाही. मागचे सपाट ते सपाट, निदान पुढचे तरी आठवणीत राहावे यासाठी माझा प्रयत्न चालू असतो.

पण माझ्या विसरण्याने कुणाचे नुकसान तर नाही ना होणार याकडे माझं लक्ष असते(!) म्हणजे असे की माझ्यावर सोपवलेले कुठलेही काम मी न विसरता करते. कारण ते मी नीट लिहून ठेवते! नाहीतर फोनवर बोललेले सगळे माझ्या लक्षात राहीलच अशी मलाच खात्री नसते. कुणी सामानाची यादी न लिहिताच न विसरता सारे काही नीट आणत असला की मला जाम आश्चर्य वाटते. मला असे त्याच्यासारखे कसे जमेल असा मला प्रश्न पडतो.

पावसात भिजू नये म्हणून छत्री न्यायची आणि पाऊस नसला की छत्री हमखास विसरून घरी यायची असे बहुतेक सर्वच करत असतील. घराची चावी आत विसरून दार ओढून लॉक करणं बऱ्याच जणांकडे होत असते. दाराचे लॉक मोडावे लागणे, कौले काढून आपल्याच घरात शिरावे लागणे, अशा अनेक अभिनव प्रयत्नांनंतर शेवटी एक चावी -ज्याच्या घरात नेहमी कुणीतरी असेल व आपली चावी सुरक्षित राहू शकेल - अशा घरात ठेवण्याची कल्पना सुचते. हे सारे उपद्व्याप विसरभोळ्यांच्याच वाट्याला येत असतात. न विसरणारे मात्र ऐटीत खिशात हात घालून किंवा पर्स उघडून चावी काढतील व घराचे दार उघडतील.

हे लोक खरेच भाग्यवान. त्यांना कधी कुणाचा वाढदिवस विसरलो म्हणून सांगावे लागत नाही. लग्नांचे आमंत्रण विसरलो म्हणून कपाळावर हात मारावा लागत नाही. हे लोक आपल्या कारमध्ये काही विसरले असे कधी घडत नाही. यांचे कपडे कधीच धोब्याकडे राहत नाहीत. आम्ही काय, धोब्याचे सोडाच, एकदा शिंप्याकडे शिवायला दिलेला ब्लाऊज घ्यायला मी साफ विसरले.

मी विसरते म्हणून मला समजून घेणारे आहेत म्हणून जीवन सुकर आहे. नाहीतर माझे काही खरे नव्हते. भाजीपाला आणायला गेले की न चुकता जे आणण्यासाठी आले होते तेच राहून जाते. म्हणजे कांदा आणण्यासाठी म्हणून निघायचे आणि कांदा सोडून बाकी सर्व आणायचे. याला विसरणे म्हणतात की वगळणे? गॅसवर काही ठेवून स्वयंपाकघराबाहेर यायचे तर मी अगदी सोडलय. एक तर आतच राहावे नाही तर बाहेरच. आतबाहेर केले तर आत करपून कोळसा ठरलेलाच!

‘फोटोजेनीक मेमरी’ का काय असते ती तर मला अगदी भयानक गोष्ट वाटते. ज्यांना ती असते ते लोक एक तर रोबोचे वंशज असावेत किंवा उपग्रहाचे स्थानिक असावेत. या पृथ्वीतलावर त्यातही आपल्या देशासारखे, जिथे जीवन म्हणजे तारेवरची कसरत आहे. किंवा माणसामाणसांत लागलेली शर्यत आहे तिथे एकदा पाहिलेले फोटोसारखे आठवणीत ठेवणारा म्हणजे अहो आश्चर्यम्! पण असे वरदान लाभलेल्यांना विशेष इंद्रिय असले पाहिजे जे त्यांना आपल्या मेंदूत फायली ठेवतात त्याप्रमाणे व्यवस्थित रचून ठेवता येतात.

याच्या उलट काही इतके आपल्याच तंद्रीत असतात, की त्यांच्या विसरभोळेपणाचे परिणाम भयानक होतात. कित्येक वेळा त्यांच्या बायकोने मुलांना शाळेत पोहोचवलेले असत. त्यांचे काम मुलांना व्यवस्थित घरी आणायचे असते. पण.. ते सपशेल विसरतात. शाळेतून घरी फोन जातो आणि मग मुलांना घरी आणण्याची धावपळ सुरू होते.

विसरभोळेपणाचा कळस म्हणजे एकदा विमान प्रवासात, दोन जुळ्या बालकांना ‘बेबीकार्ट’मध्ये बसवून एक युरोपियन महिला त्यांना फिरवत होती. विमान उड्डाणाची वेळ जवळ आल्यावर तिने अचानक ‘बेबीकार्ट’ दुमडून बालकांना तेथील बाकांवर नीट बसवले. व बेबीकार्ट अत्यंत काळजीपूर्वकपणे आपल्या सोबत घेऊन विमानात चढलीसुद्धा! आपल्या मुलांना बरोबर न्यायला ती आश्चर्यकारकरीत्या विसरली! विमानाने आकाशात झेप घेतली अन् तिच्यातील मम्मा जागी झाली ‘ओऽ माय बेबीऽऽ’ म्हणून तिने विमानात टाहो फोडला.

जे नकोसे आहे जे मनाला त्रासदायक आहे ते विसरायलाच हवे. त्याला आपल्या मनात स्थान नकोच. पण, जे महत्त्वाचे आहे ते विसरता कामा नये. विसरभोळेपणा हा शाप ठरू शकतो. पूर्वी बायका आठवण राहावी म्हणून आपल्या पदराला गाठ मारायच्या. आता ‘अलेक्सा’, ‘अलार्म’ किंवा मोबाइलवर नोंद करतो आपण. पण, किती आणि काय काय नोंद करून ठेवू? सर्वांत उत्तम म्हणजे मेंदूला न विसरण्याचे व्यायाम करायला लावणे. बघू जमते का? अगदी न विसरता. नक्की!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT