

पणजी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत येण्यापासून काँग्रेसने रोखले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनेच त्यांचा पराभव केला, असे सांगत, बाबासाहेबांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र जपणे काळाची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी व्यक्त केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पणजी बसस्थानकाजवळील आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेच्या जोरावर राज्यसभेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी लोकसभेत येण्याचाही प्रयत्न केला; परंतु लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांचा दोनवेळा पराभव केला. काँग्रेसला बाबासाहेबांना लोकसभेत येऊ द्यायचे नव्हते, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून दलित समाजातील नागरिकांचा सातत्याने विकास साधला जात आहे. त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. यापुढे तंत्रशिक्षणात भारतात मेरिटमध्ये येणाऱ्या राज्यातील एससी समाजातील विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दलित समाजातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत असलेल्या एनजीओंना सरकारकडून अर्थसाहाय्य देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आंबेडकर भवनाची पायाभरणी मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. पुढील वर्षभरात आंबेडकर भवनाचे काम पूर्ण होईल. या भवनात सभागृह, हॉस्टेलची व्यवस्था करण्यात येईल. उच्च शिक्षणासाठी राज्यभरातून पणजीत येणाऱ्या एससी समाजातील विद्यार्थ्यांना या हॉस्टेलचा लाभ मिळेल. शिवाय भवनाच्या माध्यमातून आंबेडकरांची ग्रंथसंपदाही लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.