Tukaram Mundhe Food Adulteration Action Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

भेसळखोरांच्या मुसक्या आवळा- संपादकीय

Tukaram Mundhe Food Adulteration Action: महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागात २५ मे २०२६ रोजी आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

जयराम अनंत रेडकर

महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागात २५ मे २०२६ रोजी आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. अवघ्या पंधरा दिवसांत त्यांनी महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबईसह अन्य शहरांत एकाच वेळी धाडी टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांची तपासणी केली. यात हजारो लिटर भेसळयुक्त दूध आढळले. लगेच त्याचे परीक्षण करून संबंधित व्यक्ती व आस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली.

गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून हा भेसळीचा गोरखधंदा सुरू होता. दुधात अक्षरशः विष मिसळले जात होते. रासायनिक खते, शॅम्पू, निकृष्ट दर्जाचे तेल अशा गोष्टी बेमालूमपणे दुधात मिसळल्या जात होत्या. अर्थात, वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेते यांच्या संगनमताशिवाय हे होणे शक्य नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याचा वापर करतात. भेसळयुक्त दूध प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होत असतील, हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टराची आवश्यकता नाही. कर्करोग, मधुमेह, हगवण यांसारखे घातक रोग भेसळयुक्त दुधामुळे होऊ शकतात, हे जाहीर झाले आहे. याचा अर्थ, गेल्या पंधरा वर्षांत कर्करोग व मधुमेहग्रस्त रुग्णांची वाढती संख्या या भेसळयुक्त दुधाशी संबंधित असू शकते.

अन्नधान्यातही अशीच भेसळ होत असते. धान्य टिकवून ठेवण्यासाठी काही व्यापारी रासायनिक पावडरी व फवारण्यांचा वापर करतात. ही द्रव्ये शरीरासाठी घातक असतात. अन्नपदार्थ साठविण्याची अनेक ठिकाणेही गलिच्छ आढळतात. उंदीर, घुशी, पाली, झुरळे यांचे ते आश्रयस्थान असते. त्यांचे मलमूत्र अन्नपदार्थांत मिसळते. मात्र, याची कुणालाही चिंता नसते. ना व्यापाऱ्यांना, ना सरकारला. मरतात तर मरू देत, आपल्या बापाचे काय जाते? अशी बेफिकीर वृत्ती वाढीस लागली आहे.

तसेच शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी मधल्या सुट्टीत किंवा प्रवासादरम्यान असे पदार्थ खाताना दिसतात. त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. यासाठी शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन पालक व विद्यार्थ्यांना एकत्रित मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. फक्त अन्नपदार्थ व पेयांमध्येच नव्हे, तर औषधांमध्येही भेसळ होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. २०२१-२२ मध्ये कोविडचा प्रभाव वाढला असताना एका संन्यासी बाबाने ‘कोरोनिल’ हे कोविडवरील परिणामकारक आयुर्वेदिक औषध असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केली होती.

या औषधाच्या लोकार्पणासाठी त्याने दोन केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे औषधाची मोठी जाहिरात झाली आणि लोकांचा त्यावर विश्वास बसला. नंतर हे औषध अपेक्षित परिणाम देत नसल्याचे स्पष्ट झाले आणि त्यावर वाद निर्माण झाले. या देशातील अनेक साधू-संन्यासी धर्मप्रसारापेक्षा आयुर्वेदिक औषधनिर्मिती, त्यांची विक्री आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून भोळ्या-भाबड्या लोकांना आकर्षित करण्याचे काम करतात, अशी टीका अनेकदा केली जाते.

पाश्चात्त्य देशांत भेसळीविरुद्ध कठोर कायदे आहेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. मध्य-पूर्वेतील काही देशांत अन्नपदार्थ किंवा औषधांत भेसळ आढळल्यास कठोर शिक्षा दिली जाते. पोर्तुगीज राजवटीच्या काळात गोव्यातही अशाच प्रकारची कडक कारवाई केली जात असे. आरोग्य अधिकारी नियमितपणे बाजारपेठांची तपासणी करत. खराब झालेले मांस किंवा मासे आढळल्यास ते नष्ट केले जात आणि विक्रेत्याला शिक्षा दिली जात असे.

आज अशी परिस्थिती दिसून येत नाही. सरकारी धाक राहिला नाही, तर याहून वेगळे काय होणार? गोवा डेअरीचे दूध उत्पादन अपुरे असल्याने गोव्यात महाराष्ट्र, गुजरात व बेळगाव परिसरातून विविध कंपन्यांचे दूध विक्रीसाठी आणले जाते. हे दूध पूर्णपणे भेसळमुक्त आहे, याची खात्री कशी करायची, हा प्रश्न आहे. अलीकडेच गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनातील एका अधिकाऱ्याने गोव्यात भेसळयुक्त दूध विकले जात नसल्याचा दावा केला.

मात्र, या दुधाची प्रयोगशाळेत सखोल तपासणी झाली की केवळ प्राथमिक चाचणी करण्यात आली, हे स्पष्ट झालेले नाही. दुधात भेसळ करणारे इतके चलाख असतात की साध्या तपासणीत त्यांचे बिंग फुटेलच असे नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे. यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारखा निर्भीड, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गोव्यात असणे आवश्यक वाटते. अन्न, पाणी आणि हवा या जीवनावश्यक गोष्टीच जर प्रदूषित झाल्या, तर खायचे तरी काय आणि जगायचे तरी कसे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: हणजूण येथे 'एफडीए'कडून 13 व्यावसायिकांची तपासणी, सहा आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश

Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे काम आणि निधीचा हिशेब द्या! सुरेंद्र फुर्तादो यांची 'आरटीआय'द्वारे मागणी

'मला POK चा पंतप्रधान व्हायचंय'! नवाझ शरीफची अजब इच्छा अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा; हिंसाचाराच्या सावटाखाली होणार निवडणुका

Instagram Data Secure: ब्लॉक 'इन्स्टाग्राम'चा डेटा सुरक्षित; 'मेटा'ने दिलेे हायकोर्टात स्पष्टीकरण, अपिलावर 3 महिन्यांत निर्णय देण्याचेे निर्देश

Cyber Fraud: डिजिटल सरंजामशाही: संथ यंत्रणा अन् निर्भय गुन्हेगार

SCROLL FOR NEXT