

चावडी: घरात पाणी येत नसल्याने शेतातील विहिरीवरील पंप तपासण्यासाठी गेलेल्या सातोर्ली-गावडोंगरी येथील यशवंत तोळू गावकर (३३) या तरुणाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली.
घरापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीजवळ यशवंत यांचा मृतदेह सायंकाळी गावकऱ्यांना आढळून आला. यशवंत हे शेतातील विहिरीवर पंप बसवून त्याद्वारे घरातील पाण्याची गरज भागवत होते. मंगळवारी सकाळी पंप सुरू करूनही घरात पाणी येत नसल्याचे लक्षात आल्याने ते पंप तपासण्यासाठी विहिरीजवळ गेले. त्यावेळी विजेच्या वायरच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा धक्का बसला.
शेतात पाणी साचलेले होते. तसेच, घटनास्थळी त्यावेळी कोणीही उपस्थित नसल्याने त्यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी घरातून गेलेले यशवंत सायंकाळपर्यंत घरी परतले नाहीत.
यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घरापासून सुमारे ३०० मीटर अंतरावरील विहिरीजवळ ते मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती काणकोण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील रुग्णालयात पाठविला. बुधवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातोर्लीतील पाणीप्रश्न ऐरणीवर
सातोर्ली-गावडोंगरी परिसरात घराघरांत नियमित नळपाणीपुरवठा नसल्याने काही कुटुंबांना आजही शेतातील विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. घरात नळाद्वारे पाणी उपलब्ध असते, तर यशवंत यांना शेतातील विहिरीवर जाण्याची गरज भासली नसती. येथील पाणीप्रश्न तातडीने सोडवून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चिमुकलीच्या भवितव्याचा प्रश्न
यशवंत यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या तीन महिन्यांची चिमुकली मुलगी, वृद्ध वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आर्थिक आधार असलेले यशवंत मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोसायटीअंतर्गत इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत होते. त्यांची नोकरी कायमस्वरूपी नसल्याने त्यांच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी यशवंत यांचे वयोवृद्ध वडील तोळू गावकर यांनी अश्रू अनावर होत केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.