विकास कांदोळकर
प्राचीन काळी, युद्ध प्रामुख्याने समोरासमोर व्हायचे, जेथे तलवारबाजी केंद्रबिंदू होता. जोरदार हल्ला करणारी रोमन ‘ग्लॅडियस’, चपळता आणि अचूकतेसाठी प्रसिद्ध ग्रीक ‘झिफोस’, अशा तलवारींनी त्याकाळी युद्धे गाजविली. कांस्याची एक अभेद्य भिंत बनविणारी ‘ग्रीक फॅलेन्क्स’ ही लांब भाले असलेल्या सैनिकांची रचना, शिस्तबद्ध समोरासमोरील लढाईचे उदाहरण होते. घोड्यांद्वारे चालवले जाणारे रथ, प्राचीन चीन आणि इतर पूर्वेकडील प्रांतात महत्त्वाचे होते.
प्राचीन युद्धात गतिशीलता वाढवून भीती निर्माण करण्यात, प्राण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी पाळीव प्राण्यांनी घोडेस्वार आणि रथांद्वारे युद्धात क्रांती घडवली. मंगोल लोकांच्या घोड्यांवरील धनुर्धाऱ्यांनी वेग आणि अचूकतेने विशाल प्रदेशांवर वर्चस्व गाजवले.
कार्थेज आणि भारतीय राज्यांमध्ये युद्धांत वापरल्या जाणाऱ्या हत्तींमुळे अराजकता निर्माण झाली, स्काउटिंग आणि हल्ल्यासाठी प्रशिक्षित रोमन युद्ध-कुत्रे, डुक्कर, मोलोसियन कुत्र्यासारख्या जाती प्रसिद्ध होत्या.
युद्धकलेच्या इतिहासात १३व्या शतकाच्या सुमारास चीनमधून ‘गनपावडर’च्या आगमनाने महत्त्वाचा टप्पा गाठला. सुरुवातीच्या तोफा आणि ‘मस्केट्स’ने लढाईला रेंजिंग युद्धात रूपांतरित केले. तलवारी आणि सैनिक प्रासंगिक महत्त्वाचे राहिले.
रासायनिक युद्ध प्राथमिक स्वरूपात उदयास आले, बायझंटाईननी ‘ग्रीक-अग्नी’, नौदलातील आग लावणारे शस्त्र, यासारखी अद्वितीय युद्ध-तंत्रे विकसित करून, व्यावसायिक सैन्य आणि नौदलाची निर्मिती केली. मोहरीची झाडे जाळण्यासाठी प्राचीन चिनी बचावकर्त्यांनी वापरलेल्या विषारी-बाण आणि विषारी-धूर, नंतरच्या रासायनिक शस्त्रांच्या आगमनांची पूर्वसूचना देताना मानवतेच्या विनाशासाठी विज्ञानाचे शाप अधोरेखित करत होते.
औद्योगिक क्रांतीने युद्धाचे प्रमाण वाढवले, अधिक पल्ला आणि अचूकतेसाठी रायफल-बंदुका-तोफखाने सादर केले. डायनामाइट आणि सुरुवातीच्या बॉम्बसारख्या स्फोटकांमुळे तटबंदीवर विनाशकारी हल्ले होऊ शकले. औद्योगिक युद्धात जलद सैन्य हालचालींसाठी रेल्वे आणि तारांचा वापर होऊ लागला. पहिल्या महायुद्धात रासायनिकांचा भडिमार झाला, ‘क्लोरीन’ आणि ‘मस्टर्ड’ गॅसमुळे कित्येक लोक मारले गेले, अगणित जखमांनी घायाळ झाले.
दुसऱ्या महायुद्धात टँक आणि विमाने उदयास आली, विमाने गुप्तहेरांपासून लढाऊ आणि बॉम्बर विमानांमध्ये विकसित झाली. १९४५मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बने मानवतेच्या संभाव्य विनाशाच्या नवीन युगाची सुरुवात केली.
विसाव्या शतकात हवाई शक्ती प्रबळ होऊन, स्पिटफायर, बी-१७सारख्या लढाऊ विमानांनी, हवाई वर्चस्व आणि धोरणात्मक बॉम्बस्फोटाद्वारे जागतिक संघर्ष वाढविले. शतकाच्या अखेरीस, लेसर-मार्गदर्शित बॉम्बसारख्या युद्धसामग्रींमुळे अचूकता वाढली. एकविसाव्या शतकात ड्रोन सादर केले गेले, जे सध्याच्या रशिया-युक्रेन संघर्षात दिसून आले.
युक्रेनने युद्ध-हल्ल्यांसाठी बायरॅक्टर टीबी२ ड्रोन आणि लहान, व्यावसायिक ‘क्वाडकॉप्टर’चा वापर केल्याने आधुनिक युद्धाची पुनर्परिभाषा तयार झाली. कमी किमतीचे ड्रोन, उच्च-प्रभाव देणारे ठरल्यामुळे, मानवी वैमानिकांचा धोका कमी होऊन, ‘रिअल-टाइम बुद्धिमत्ते’द्वारे अचूक हल्ले करणे शक्य झाले. रशियाचे ‘लॅन्सेट ड्रोन’ आणि युक्रेनचे ‘एफपीव्ही ड्रोन’ यांचे उत्पादन वाढले.
सुलभ तंत्रज्ञानाच्या वापराने युद्धात लहान सैन्य, मोठ्या सैन्यांना आव्हान देऊ शकते, हे युक्रेन-रशिया युद्धात दिसून आले. २०२४पर्यंत, युक्रेनने दहा लाखांहून अधिक ‘एफपीव्ही ड्रोन’ तयार केले होते, त्याच्या कितीतरी पटीने २०२५मध्ये ड्रोन तयार करण्याची योजना त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.
भविष्यात तंत्रज्ञानाद्वारे चालणाऱ्या युद्धात आणखी परिवर्तन होणार आहे. युक्रेनमधील चालू घडामोडींनुसार, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)’ आणि ‘स्वायत्त प्रणाली’, ड्रोन चालविण्यापासून ते रणनीतिक निर्णय घेण्यापर्यंत, वाढत्या प्रमाणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, यात शंकाच नाही.
सायबर युद्ध वाढतच राहील, पायाभूत सुविधा आणि माहिती प्रणालींवर अत्याधुनिक हल्ले होतील, ज्यामुळे अर्थव्यवस्था आणि सैन्यावर परिणाम होईल. अवकाशातील उपग्रह आणि अवकाश-आधारित शस्त्रे महत्त्वपूर्ण ठरतील, ज्यामुळे जटिल धोरणात्मक धोके निर्माण होतील.
‘रोबोटिक्स’ आणि ‘एआय’मुळे पूर्णपणे स्वायत्त लढाऊ प्रणाली निर्माण होऊन युद्धात मानवांची जबाबदारी आणि भूमिका याबद्दल नैतिक प्रश्न निर्माण होतील. ड्रोन आणि मानवरहित प्रणालींच्या प्रसारामुळे युद्ध अधिक असीमित झाल्यामुळे लहान, स्वस्त तंत्रज्ञानाचे विषम परिणाम होतील.
याव्यतिरिक्त, एआय-चलित निर्णय घेण्याच्या आणि संज्ञानात्मक युद्धातील प्रगती, संघर्ष कसे सुरू केले जातात आणि सोडवले जातात, यावरील तांत्रिकतेमुळे वेगळ्याच जागतिक तांत्रिक शस्त्रास्त्र शर्यतीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
बहुचर्चित महाकाय राफेल लढाऊ विमानांचे विश्लेषण ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर होईलच. भारताने भविष्यातील युद्धतंत्रात स्वावलंबनासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्राधान्यतेतून, ड्रोन, एआय आणि सायबर-युद्ध क्षमता यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचे, पारंपरिक सैन्यासह एकत्रीकरण घडवावे. अनुकूलता, विकेंद्रित कमांड, सक्षम दळणवळण आणि मजबूत इलेक्ट्रॉनिक युद्ध अत्यंत महत्त्वाचे असले तरीही, तंत्रज्ञान सक्षमीकरणाचा फायदा घेत, जागतिक शांततेसाठी, मानव-केंद्रित दृष्टिकोन राखणेही अतिमहत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.