डॉ. मधु स. घोडकिरेकर
‘एकीचे बळ’ या महानाट्यासमोर या ‘आडकाठी’ एकांकिका तग धरू शकणार नाहीत, हे लक्षात येताच, एका वर्षाचे काम एका रात्रीत पूर्ण केले. तसेच, ‘एकीचे बळ’ या नाट्य प्रयोगासाठी आपले दोन कलाकार उपलब्ध होणार नाहीत, याची काळजी घेतली. परिणामी, पणजीतील आझाद मैदानाच्या हिरवळीवर होणारा प्रयोग तीस किलोमीटर दूर क्रांती नावाच्या फुटबॉल मैदानावर घ्यावा लागला.
बाईला वय व पुरुषाला उत्पन्न आणि ‘उटा’ला अंतर्गत ‘फुटी’बद्दल कुणी कधी विचारू नका. ‘आमच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत’ असे तुम्हाला कुणी सांगितले, तर समजा की, तो मुरलेला राजकारणी आहे. जनतेच्या मनाचा भेद केल्याशिवाय त्यांना मते मिळत नाहीत. या पहिल्या श्रावण गुरुवारी, ‘उटा’ने दिलेल्या हाकेला मान देत हजारोच्या संख्येने क्रांती मैदानावर जमलेल्या आदिवासी बांधवांमुळे तयार झालेल्या क्षितिजावर ‘उटा’चे नेहमीचे ‘मनभेदी इंद्रधनुष्य’ सहज डोकावून गेले. या आगळ्यावेगळ्या नाट्य प्रयोगाचे छोटेसे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करुया.
नाट्यप्रयोग म्हटला की, सर्वात आधी योजना करावी लागते ती रंगमंच व नेपथ्य, यांची. जुलैच्या अखेरपर्यंत नेहमी मनभेदासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आदिवासी नेत्यांमध्ये राजकीय आरक्षण विषयावर ‘एकमत’ झाले व २२ जुलैला ‘मनोमिलन’ चा सोपस्कार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. नाट्यवेड्या गोव्यात हौशी नाटक करण्याला निमित्त हवे म्हणून सत्यनारायण पूजेचे आयोजन करतात, त्याप्रमाणे तेथे एका सरकारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळारुपी सत्यनारायण पूजेला आम्ही हजर होतो. त्यामुळे तेथे आम्हाला ‘बीन बुलाये मेहमान’ असे म्हणता, सन्माननीय प्रेक्षक (हवे तर बघे म्हणा) बनण्याचे भाग्य लाभले.
आरक्षण देण्यात ‘आजचे मरण उद्यावर’ असे ‘तियात्री’ धोरण राबविणाऱ्या सत्ता पक्षाने छोटे मोठे ‘आडकाठी खेळ’ करून पाहिले, पण ‘एकीचे बळ’ या महानाट्यासमोर या ‘आडकाठी’ एकांकिका तग धरू शकणार नाही, हे लक्षात येताच, एका वर्षाचे काम एका रात्रीत पूर्ण केले. सत्तापक्ष व ‘उटा’ यांच्यातील श्रेयवादात समाज एकीचे दर्शन घडविण्याच्या प्रामाणिक इच्छेने आलेल्या बिचाऱ्या आदिवासीचा चक्क फुटबॉल केला गेला, असे हे नाट्यप्रयोगाची घंटा वाजेपर्यंतचे पहिले दृश्य होते.
आता क्रांती मैदानावर प्रत्यक्ष पडदा उघडला तेव्हाचे दृश्य, ‘उटा’ नेत्यांना मुळात उपलब्ध ‘वॉटरप्रूफ व्यासपीठ’, बाजूला पत्रकारांसाठी छोटीशे ‘वॉटरप्रूफ व्यासपीठ’ व समोर पर्यटन खात्याने चिखलकाला आयोजित करावा तसा मैदानाच्या लाल चिखलात ५०० खुर्च्या. प्रयोगाची सुरवात ‘जेन झी’च्या ‘बालनाट्य प्रवेशा’ने झाली, पंतप्रधानांनी ‘जेन झी’चे कौतुक केल्यानंतर ‘जेन झी’चे कौतुक करण्याची स्पर्धा लागली आहे.
पाऊस येताच छत्रीचा आडोसा घेत मैदानात उभ्या असलेल्या लोकांची प्रत्यक्ष जीवनात हीच स्थिती आहे व पुढेही तशीच असणार आहे. या नाट्यप्रयोगात, ‘ब्रॅन्डेड कपडे घातलेल्या एसटी वक्त्यांपेक्षा वरुणराजाच हिरो ठरला. वरुणराजाचा सामान्य लोकांसाठी संदेश थेट होता, आपली शक्ती दाखविण्यासाठी हे राजकारणी लोक तुम्हाला चिखलात उभे करतील, स्वतःसाठी मात्र चिखलापासून दोन फूट उंचीवर व्यवस्था करतील. आपल्या अस्तित्वासाठी ते स्वत: समाज फुटीचे कारण बनतील, स्वाभिमान -शिष्टाचार खुंटीला टांगतील पण तुम्हाला मात्र नेमकी उलटी प्रवचने देतील.
सत्तापक्षाने आपले दोन आमदार तेथे उपस्थित राहणार नाहीत, याची काळजी घेतल्याने, येथे मनोमीलनाचा अजून ‘प्रवेश’ झाला नाही. परिणामी, सर्व सोपस्कार म्हणून नटसम्राटातला ‘कुणी घर देता देता घर’ प्रवेश येथे ‘तोफदार पद्धतीने’ झाला. आता नाट्यसमीक्षा व्हायलाच पाहिजे. समीक्षेची सुरवात ‘लीड रोल’पासून होते, येथे आदिवासी मंत्री व सभापती अनुपस्थित असल्याने ‘लीड रोल’ गोविंद गावडेंकडे आला (मनोमीलन कार्यक्रमात सभापती ‘लीड रोल’ मध्ये होते). गोविंद गावडे हे रंगमंचावरचे ‘हिरो’ व राजकारणातला ‘हिरा’ हे सत्य स्वीकारण्यास यात समीक्षकांत ‘किंतु परंतु’ असणार. ते नेहमी शिवशाहीतल्या ‘राजें’च्या भूमिकेत असतात व तोच त्यांचा ‘यूएसपी’ आहे, क्रांतीमैदानावर ते पहिल्यांदाच ‘पेशव्या’च्या भूमिकेत दिसले. पेशवाईत ‘ध’ चा ‘मा’ चे प्रकरण खूप महत्वाचे आहे. तसे आपले पत्रकारबंधू कधी कधी ‘ध’ चा ‘मा’ करतात म्हणून गोविंद गावडेंनी त्याना ‘पोत्रेकार’ म्हटले होते, आज तशाच पत्रकारासोबत एक धनगर समोर आला, तर गोविंद गावडे त्याच्यावर धावून गेले.
गावडे त्याला ‘ध’(रयाला) की ‘मा’(रायला) जात आहेत, हेच कळत नव्हते. धनगर समाजातल्या नेत्यामुळे ‘उटा’चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वेळीप सरांचे स्थान हिरावले म्हणून काय, की तोच नेता कला अकादमीत येऊन गोविंद गावडेंच्या स्थानावर बसला म्हणून, सदर धनगर युवकांना पाहताच गावडेंच्या अंगात ‘पेशव्या’चा आत्मा शिरला, यांचे गूढ कळले नाही. मागाहून प्रकाश सरांनी, आपण स्वत: भाजप सरकारात मंत्री असताना धनगरांसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले व त्या ‘पेशवाई आत्म्याशी’ आपला सबंध नसल्याचे स्पष्ट केले.
नाट्यसमीक्षेत संवादावरही चर्चा होते. गोविंद गावडेंनी आर्कषक दिरंगाईस जबाबदार एका ‘थिंक टॅंक’चा उल्लेख केला, त्यावरून ‘उटा’ने त्या ‘थिंक टॅंक’ला टक्कर ‘अँटी थिंक टॅंक मिसाईल’ तयारच केली नाही. त्या ऐवजी, ‘उटा’ने मागील आठ -दहा वर्षे केवळ गोविंद गावडे या एकमेव ‘टॅंक (तोफ या अर्थाने)च्या भरवशावर आपले दिवस सारले व विषय विसरून गेले. आता कुठे त्यांना ‘अस्वल -माकड’ अशी नावे ठेवून दूर ऐकलेल्या ‘गोविंद शिरोडकर-कांता गावडे’ सारख्या जुन्या ‘थिंक टॅंक’च्या जवळ जाण्याची ‘ढोपर बुद्ध’ आली, ज्याचा परिणाम सर्वांसमोर आहे.
समीक्षेच्या समारोपाला ‘गारवा’ कवितेतले एक कडवे : ‘त्याला ‘ती’ आवडते, ‘ती’ला पण ‘तो’ आवडतो ! ‘ती’ला पाऊस आवडतो, ‘त्या’ला पाऊस अजिबात आवडत नाही!. पावसासकट ‘ती’ त्याला आवडायला हवी, असा तिचा हट्ट आहे!’.
रंगमंचावर नाटक कोणत्याही नावाने आणू द्या, विंगेत मात्र, भाजप-‘उटा’-गोविंद गावडे यांच्यात (उपरोक्त कवितेप्रमाणे) वेगळाच ‘ऊन -पाऊस’ खेळ सुरू असतो. अशा वेळी, बाहेर समाज चिखलात भिजला आणि रुतला काय, त्याची पर्वा कुणाला नसते की काय, असे चित्र दर्शवणारे दृश्य क्रांती मैदानावर पहायला मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.