Goa Drug Smuggling: कुरिअर-टपाल सेवांतून ड्रग्सची तस्करी; गोवा पोलिसांची कुरिअर कंपन्यांसोबत जनजागृती मोहीम

Courier Drug Smuggling: गोव्यात अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर कारवाई सुरू असतानाच, तस्करांनी आता कुरिअर आणि टपाल सेवांचा गैरवापर करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे
Courier Drug Smuggling
Goa Drug SmugglingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर कारवाई सुरू असतानाच, तस्करांनी आता कुरिअर आणि टपाल सेवांचा गैरवापर करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. अमलीपदार्थांची पाकिटे सर्वसामान्य वस्तूंमध्ये लपवून पाठविली जात असल्याने ती वाहून नेणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्यांनाही त्यामध्ये नेमके काय आहे, याची कल्पना नसते. या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी कुरिअर, टपाल सेवा आणि वितरण क्षेत्रातील प्रतिनिधींना सहभागी करून घेत अमलीपदार्थ तस्करीच्या नव्या पद्धतींबाबत जनजागृती सुरू केली आहे.

नुकतीच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोव्यात कार्यरत असलेल्या कुरिअर आणि टपाल सेवा पुरवठादारांच्या किमान ७५ प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत अमली पदार्थांची पाकिटे लपविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती, संशयास्पद पार्सलची लक्षणे आणि अशा प्रकारची माहिती तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. हा उपक्रम ‘नशामुक्त भारत अभियान’च्या तीन वर्षांच्या कृती आराखड्याचा भाग आहे.

Courier Drug Smuggling
Goa Politics: भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते भिडले, दाबोळीवर खर्गेंविरोधात घोषणाबाजी; पोलिसांची मध्यस्थी

अशी झाली पोलखोल

गोवा पोलिसांसमोरील एका अलीकडील प्रकरणाने या तस्करीच्या पद्धतीची गंभीरता स्पष्ट केली आहे. हॅशिश म्हणजेच चरस एका वाफेच्या इस्त्रीच्या तळाशी लपवून कुरिअरमार्फत गोव्यात पाठविण्यात आला होता. संबंधित पार्सल एका वाहनचालकाच्या माध्यमातून वितरित केले जात होते. पार्सलमध्ये अमलीपदार्थ असल्याची त्याला कोणतीही कल्पना नव्हती. अशा प्रकारच्या घटनांमुळे कुरिअर आणि टपाल यंत्रणांचा तस्करांकडून किती सहजपणे गैरवापर होऊ शकतो, याची जाणीव पोलिसांना झाली आहे.

गोव्यात कोणत्या अमली पदार्थांचा शिरकाव?

पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या विश्लेषणानुसार, गोव्यात सर्वाधिक जप्त होणाऱ्या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, एलएसडी, एमडीएमए किंवा एक्स्टसी आणि कोकेन यांचा समावेश आहे. कोकेनचा पुरवठा आंतरराष्ट्रीय मार्गाने होऊन दिल्ली आणि कर्नाटकसारख्या राज्यांतून गोव्यात पोहोचतो, तर गांजाची तस्करी प्रामुख्याने झारखंड आणि ओडिशातून होते.

Courier Drug Smuggling
Goa Bribery Case: 19 वर्षांपूर्वीच्या लाचप्रकरणी सरकार सर्वोच्च न्यायालयात; संध्या गुप्ता, राजेश वारंग यांना नोटीस

‘डेड ड्रॉप’ पद्धतीचा वापर

अमलीपदार्थ तस्करांकडून ‘डेड ड्रॉप’ पद्धतीचा वापर वाढत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या पद्धतीत खरेदीदाराकडून पैसे मिळाल्यानंतर त्याला अमली पदार्थ घेण्यासाठी एखाद्या ठरावीक ठिकाणाची माहिती किंवा निर्देशांक पाठविले जातात. त्यानंतर वितरण करणाऱ्या व्यक्तीमार्फत अमली पदार्थ संबंधित ठिकाणी पोहोचविले जातात. अनेकदा हे पार्सल घेऊन जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याला त्यातील वस्तूबाबत कोणतीही माहिती नसते. तस्करांना या पद्धतीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे त्यांना आपली ओळख लपविणे शक्य होते. पाठविणारा आणि घेणारा यांच्यातील प्रत्यक्ष संपर्क टाळला जात असल्याने तपास यंत्रणांसमोरही आव्हान निर्माण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com