सुलक्षा मनेष गावस
निरोगी पर्यावरणाचा संबंध मानवी आरोग्याशी, जीवनमानाशी आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा दिवा आपल्या सामूहिक जबाबदारीची जाणीव म्हणून प्रज्वलित करुया.
आपल्या प्रत्येक सणाला एक समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे; मात्र त्याचबरोबर त्याला एक भावनिक किनारही असते. दिवाळी येणार या नुसत्या विचारानेही मन मोहरून जाते. आकाशकंदील, पणत्यांची आरास, फराळाचा सुगंध, आपल्या माणसांच्या भेटीगाठी या सगळ्यांच्या कल्पनेनेच मन आनंदाने भरून जाते.
पहाटे अंगण झाडून पणत्या लावण्याची लगबग, साखरझोपेतून उठून एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा, अभ्यंगस्नान आणि रेडिओवरून ऐकू येणारे दिवाळी पहाटेचे कीर्तन किंवा ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गाणे... ही माझ्या आठवणीतील दिवाळी पहाट! आज तीच गाणी मोबाईलवर लावून मुलांना पहाटे पणत्या लावण्यासाठी उठवताना एक वेगळेच समाधान मिळते. कदाचित हा माझ्या मनातील बालपण जपण्याचा अट्टहास असेल किंवा त्या आनंददायी आठवणींचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न! हा दिव्यांचा वारसा पुढे नेताना एक विचारही पुढील पिढीच्या मनात रुजवणे महत्त्वाचे वाटते.
दिवा हा केवळ बाह्य अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर तो आपल्या अंतर्मनातील अंधार दूर करण्याची प्रेरणाही देतो. हा सण तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा आहे.आपले विचार, वर्तन, दिनचर्या आणि नातेसंबंध यांचे आत्मपरीक्षण करून, नकारात्मक प्रवृत्तींचा त्याग करण्याची प्रेरणा हा सण देतो. प्रत्येकाने आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावे आणि आपण कोणत्या अंधारावर मात करू इच्छितो, कोणत्या वाईट प्रवृत्तींचा त्याग करू इच्छितो, याचा थोडा विचार केला तर ही दिवाळी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नवं चैतन्य रुपी प्रकाश नक्की घेऊन येईल. या दिवाळीचे औचित्य साधून पाच वैचारिक दीप, आपण जनमानसात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करुया.
नवचैतन्य, सकारात्मकता आणि सामाजिक पहिला दिवा –सद्विचारदीप भीती, न्यूनगंड,आळसरुपी नरकासुर दहन या नरक चतुर्दशीला केले तर मनाला चैतन्याची उभारी येईल. आपल्याला मागे ओढणाऱ्या विचारांना दूर सारून क्षमाशीलता, स्वीकार व सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचा संकल्प करूया. द्वेषाची जागा समजूतदारपणाने घेतली, तर अनेक नात्यांमधील दुरावा कमी होऊ शकतो. हा दिवा मनाला भावनिक स्थैर्य व शांततेचा मार्ग दाखवेल. दुसरा दिवा – ज्ञानज्योती ज्ञानाचा प्रकाश माणसाला नवी क्षितिजे गाठण्याचे बळ देतो. ज्ञानप्राप्ती ही केवळ परीक्षेतील गुणांसाठी नसून विचारांना दिशा देण्यासाठी, विवेक विकसित करण्यासाठी, स्वतःला अधिक समृद्ध आणि समाजाला सक्षम करण्यासाठी असते.
तिसरा दिवा – सेवाज्योती ‘आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो,’ ही जाणीव मनात कायम तेवत राहिली पाहिजे. दुसऱ्यांच्या सुख-दुःखाशी जोडले जाणे, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे आणि कोणाच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे, यातून आपल्यालाही एक वेगळे मानसिक समाधान मिळते. या दिवाळीत कुणाचा एकटेपणा घालवता आला, सेवा करता आली तर त्या सारखे सुख दुसरे नाही. चौथा दिवा – स्वास्थ्य प्रभा ‘आरोग्यं धनसंपदा’ हा विचार आपल्या संस्कृतीने सातत्याने अधोरेखित केला आहे. अभ्यंग स्नान हा त्यातीलच एक विचार, फक्त तो विचार दिवाळी पहाटेपुरता मर्यादित राहता कामा नये.
उत्तम आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य यापुरते मर्यादित नाही, तर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यही याचा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती, सकारात्मक विचार आणि प्रसन्न मन या सगळ्यांची सांगड घातली तरच आरोग्याची खरी संपन्नता अनुभवता येते. स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेणे ही स्वार्थाची नव्हे, तर स्वतःप्रती असलेल्या जबाबदारीची भावना आहे. हा दिवा स्वतःला प्राधान्य देण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याची आठवण करून देईल.
पाचवा दिवा – प्रकृतिरक्षण ज्योत ‘निसर्ग राहिला तर आपण राहू,’ ही जाणीव केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न राहता आपल्या कृतीतूनही दिसली पाहिजे. निसर्गाशी असलेले आपले नाते जपणे, संसाधनांचा योग्य वापर करणे, प्रदूषण कमी करणे व पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे. निरोगी पर्यावरणाचा संबंध आरोग्याशी, जीवनमानाशी व भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा दिवा सामूहिक जबाबदारीची जाणीव म्हणून प्रज्वलित करूया. या दिवाळीत अंगणात दीप लावताना मनामनातून माणुसकीचा,संवेदनशीलतेचा व सकारात्मकतेचा प्रकाश अखंड तेवत ठेवण्याचा संकल्प करूया."शुभ दीपावली"
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.