Goan Identity Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: गोवा विधानसभा 'बिगर गोमंतकीयांच्या' हातात जाण्याची भीती खरी वाटायला लागलीय..

Goan Identity Crisis: मुक्तीपूर्वी म्हणजे वीस डिसेंबर १९६१ पूर्वी जे गोव्यात होते ते व त्यांचे वारसदार हेच खरे गोमंतकीय, या भूमिकेतच गोव्याचे अस्तित्व व गोमंतकीयांचे हित आणि भवितव्य आहे.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगुत

मुक्तीपूर्वी म्हणजे वीस डिसेंबर १९६१ पूर्वी जे गोव्यात होते ते व त्यांचे वारसदार हेच खरे गोमंतकीय, या भूमिकेतच गोव्याचे अस्तित्व व गोमंतकीयांचे हित आणि भवितव्य आहे.परवा ‘गोमन्तक टीव्ही’वरून प्रक्षेपित झालेली रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांची मुलाखत गोमंतकीयांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला हवा देऊन गेली. आज गोमंतकीय आपल्याच राज्यात परका झाला आहे यात शंकाच नाही.

निज गोंयकार गोव्यात हळूहळू ‘मायनस’ होताना दिसायला लागला आहे. आता गोव्यात मूळ गोमंतकीयांची संख्या ५० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. ‘व्होट बँक’वर नजर ठेवून असलेले पक्ष त्याकडे कानाडोळा करायला लागले आहेत.

निवडणूक जिंकायची असेल तर बाहेरच्या मतदारांशिवाय पर्याय नाही ही धारणा घेऊन वावरणारे राजकीय पुढारी प्रत्येक मतदारसंघात दिसायला लागले आहेत. शिवाय दिल्लीस्थित धनिकांच्या नजरा आता गोव्याकडे वळायला लागल्या असून त्यातून त्यांची गोव्यात लॉबी तयार व्हायला लागली आहे. यामुळे गुन्हेही वाढताना दिसायला लागले आहेत.

वास्कोसारखे गोव्यातील एक प्रमुख शहर उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यातील लोकांच्या हातात जात असल्याचे स्पष्टपणे दिसायला लागले आहे. गोव्यातील इतरही शहरे वास्कोच्याच वाटेने जाताना बघायला मिळत आहेत.

फोंड्याचेच उदाहरण घ्या. आज या शहरात बाहेरच्या लोकांचे लोंढ्याचे लोंढे येऊन वसाहत करत आहेत. त्यामुळे कोणतेही लहान मोठे काम करण्याकरता गोंयकारांना बाहेरच्या लोकांचा आधार घ्यावा लागत आहे.

बहुतेक व्यवसाय हे बाहेरच्या लोकांच्या हातात जायला लागले आहेत. अशी जर स्थिती राहिली तर आणखी काही वर्षांत गोवा विधानसभा बिगर गोमंतकीयांच्या हातात गेल्याशिवाय राहणार नाही असे जे माजी आमदार रोहिदास नाईक यांनी मागे ‘गोमन्तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते ते खरे वाटायला लागले आहे.

खरे तर याचा सर्व गोमंतकीयांनी विचार करायला हवा. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसले तरी या भीतीपोटीच रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचा जन्म झाला आहे हेही तेवढेच खरे आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी बरेच लोक या पक्षाकडे ’पोरांचा खेळ’ या दृष्टिकोनातून बघत होते. पण निवडणुकीत मिळालेली मते बघितल्यावर त्यांचा दृष्टिकोन बदलला. शिरोड्यासारख्या मतदारसंघात जिथे या पक्षाचे अस्तित्व औषधालासुद्धा सापडत नव्हते तिथे पाच हजारांहून अधिक मते प्राप्त करणे यातच या पक्षाला मतदारांनी दिलेले महत्त्व अधोरेखित होते. पण याचा फायदा विरोधी पक्षांना होण्याऐवजी भाजपला झाला हेही तेवढेच खरे आहे.

पण परबांनी गोमंतकीयांचे अस्तित्व कमी होण्यास जेवढा भाजप जबाबदार आहे तेवढाच काँग्रेसही आहे असे जे म्हटले तेही चुकीचे वाटत नाही. तसे पाहायला गेल्यास आज भाजप व काँग्रेसमध्ये विशेष फरक राहिलेलाच नाही.

काँग्रेसमुक्त म्हणता म्हणता भाजप आज काँग्रेसयुक्त झाला आहे. फक्त अल्पसंख्याकांना अजूनही भाजपपेक्षा काँग्रेस जवळचा वाटतो एवढाच काय तो फरक. पण दोन्ही पक्ष राष्ट्रीय असल्यामुळे त्यांना स्थानिकांच्या अस्तित्वाचे सोयरसुतक आहे, असे बिलकूल वाटत नाही.

हे अस्तित्व टिकून ठेवायला खरे तर स्थानिक पक्षाचीच गरज आहे. पण आज भाजपच्या अमर्याद शक्तीपुढे स्थानिक पक्ष गुडघे टेकताना दिसायला लागले आहेत. असे असूनसुद्धा गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीने आशेचा किरण दाखवला आहे हेही तेवढेच खरे.

दक्षिण गोव्यातून काँग्रेस पक्षाला हात देऊन मतदार विकाऊ नसतात हे तिथल्या मतदारांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाला दहा टक्के मते तसेच एका आमदाराला विधानसभेत पाठवून गोमंतकीय मतदार अजून जागृत आहेत हेही सिद्ध केले आहे.

पैशाचा पाऊस पाडूनसुद्धा तृणमूल पक्षाचा एकसुद्धा आमदार विधानसभेत पोहोचू शकत नाही आणि कोणताही खळखळाट न करता आरजी पक्ष बऱ्यापैकी बाजी मारून जातो यातूनच मतदारांची विचारसरणी स्पष्ट होते.

आता २०२७साली काय होईल हे सांगणे कठीण असले तरी प्रयत्न केल्यास गोमंतकीयांचे अस्तित्व राखण्याच्या मोहिमेत आरजी सिंहाची भूमिका बजावू शकतो यात शंकाच नाही. पण त्याकरता या पक्षाने काँग्रेस, आम आदमी, गोवा फॉरवर्ड या सरकारविरोधी पक्षांशी हातमिळवणी करण्याचे बघितले पाहिजे.

’एकला चलो’चा नारा आळवून विशेष काही साध्य होईल, असे वाटत नाही. त्याचप्रमाणे उद्दिष्ट फक्त भाजपचा पराभव एवढेच असता कामा नये. मुख्य उद्दिष्ट परबांनी सांगितल्याप्रमाणे गोव्याचे अस्तित्व राखणे हे असायला हवे. या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे.

मुक्तीपूर्वी म्हणजे वीस डिसेंबर १९६१ पूर्वी जे गोव्यात होते ते व त्यांचे वारसदार हेच खरे गोमंतकीय, अशी जी आरजी पक्षाची भूमिका आहे ती सर्व विरोधी पक्षांनी उचलून धरायला हवी यातच गोमंतकीयांचे हित व युवकांचे भवितव्य वास करत आहे हे या पक्षांनी विसरता कामा नये.

हे करताना फक्त राजकारणाचा विचार न करता दूरदृष्टीने गोव्याच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. असा विचार २०२७च्या निवडणुकीत झाला तरच गोव्याची वाटचाल एका नव्या क्षितिजाच्या दिशेने होऊ शकेल, अन्यथा गोमंतकीयांचे अस्तित्व हळूहळू पुसट होत जाईल एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT