Dussehra In Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Dasara 2025: पांडवांनी शमीवरून शस्त्रे उतरवली, भाताची कणसे सोनेरी तुरा धारण करू लागली; गोवा, कोकणातील 'निसर्गस्नेही दसरा'

Goa Dussehra Celebrations: गोवा आणि कोकणात दसऱ्यातील विधी परंपरा आपल्याला निसर्गस्नेही जीवन व्यतीत करणाऱ्या कष्टकरी समाजाशी नाते सांगणारी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अ‍ॅड. सूरज मळीक

भारतातील लोकमनाचे जीवन निसर्ग आणि पर्यावरणावर अवलंबून असल्यामुळे देशभरातील वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सण उत्सवांप्रसंगी वृक्ष वनस्पतींच्या विविध घटकांना महत्त्वाचे स्थान लाभलेले पाहायला मिळते.

आश्विन महिन्यात साजरा केला जाणारा दसरा हा सण भारतभर अनेक राज्यांत विविधांगी परंपरेने थाटामाटात साजरा केला जातो. गोवा आणि कोकणात दसऱ्यातील विधी परंपरा आपल्याला निसर्गस्नेही जीवन व्यतीत करणाऱ्या कष्टकरी समाजाशी नाते सांगणारी आहे.

मान्सूनचा पाऊस सुरू होण्याअगोदर लागवड करून आषाढ, श्रावण भाद्रपद हे तीन महिने ज्या भातशेतीची काळजी घेतली जाते ते कष्ट सार्थकी ठरतात ते आश्विन महिन्यात.

शेतमळ्यातील हिरवी असलेली रोपे आता पिवळ्या रंगात परिवर्तित व्हायला लागतात. पाऊस निरोप घ्यायला लागतो तेव्हा भाताची कणसे सोनेरी तुरा धारण करतात. सूर्याच्या किरणांनी आणि वातावरणातील गारव्यामुळे मानवाच्या मनात उत्साह संचारलेला असतो.

भूतलावरील प्रत्येक वनस्पतीला ठरावीक वेळेत फुले येतात. गावतवर्गीय वनस्पतीलादेखील लहान लहान फुले बहरतात. हे अतिशय प्रेक्षणीय असते ते दसऱ्यापासून सुरू दसऱ्याच्या कालखंडात. त्यामुळे दसरा हा विविध फुलांची माळ बनवून देव देवतांना अर्पण करण्याबरोबर आपली वाहनेदेखील सुशोभित केली जातात.

हा आनंद व्यक्त करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा विशेष उपयोग केला जातो. या दिवसात बहरलेली ही फुले आपल्या पिवळ्या व केसरी भडक रंगातून पट्टेरी वाघ व बिन पट्टेरी वाघ नामक फुलपाखरांना विशेष आकर्षित करतात.

धरित्रीचा कणकण फुलांनी, फळांनी व धान्यांनी नटलेला असतो आणि त्यामुळे तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची ऊर्मी कष्टकऱ्यांच्या तनामनात निर्माण झालेली असते. गोवा-कोकणात त्याचप्रमाणे घाटमाथ्यावरती शेतकऱ्यांचे प्राबल्य होते.

आपल्या कष्टाने भात शेतीतील जे उत्पन्न लाभलेले आहे त्याला सृष्टीतील कणाकणात वास करणाऱ्या दैवी शक्तीचे अधिष्ठान कारणीभूत आहे, अशी त्यांची दृढ भावना असते.

त्यामुळे आश्विन शुक्ल पक्षाचा जेव्हा प्रारंभ होतो, त्या दिवशी सकाळी कष्टकरी समाज ग्रामदेवीच्या मंदिरातल्या गर्भगृहात घटस्थापना करतात. कुंभ हे धरित्रीचे प्रतीकात्मक रूप गर्भाशय मानून, काही ठिकाणी नऊ प्रकारच्या धान्याला रुजत घातले जाते, तर काही ठिकाणी मौसमी फुलांच्या दरदिवशी एक एक करून नऊ माळा अर्पण केल्या जातात.

गोवा, कोकण आणि घाट माथ्यावरच्या कृषिप्रधान असलेल्या गावांत दसऱ्याला ग्रामदेवतांची प्रतीकात्मक रुपे मानलेल्या तरंगांचे मेळ ढोल-ताशासारख्या वादनात मिरवणूक काढतात.

कोल्हापूरजवळच्या रत्नागिरीतील जोतिबा हे दैवत बहुजन समाजातल्या बऱ्याच जातीजमातीचे कुलदैवत मानलेले आहे. लोक संस्कृतीचे संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मते वारूळ आणि नाग या प्रतीकांच्या संदर्भातच जोतिबांचे रवळनाथ हे पर्यायी नाव विचारात घ्यायला हवे. कारण जोतिबाची जणू रेणुका म्हणजेच धरित्री आहे. त्याचप्रमाणे तशीच रवळनाथाने सहचारिणी सातेरी ही गोमंतक - दक्षिण कोकणात भूमिका या नावाने सुपरिचित आहे.

आंध्रमध्ये रेणुका ही वारूळ रूपात पुजिली जाते आणि गोमंतक - दक्षिण कोकण भागात सातेर ही रोयण म्हणजेच रवळ रुपात पुजली जाते. रवळ म्हणजे वारूळ. रवळ हे पद सातेरीचे द्योतक असून रवळनाथ हा तिच्या पती म्हणजेच नाथ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दसऱ्याच्या उत्सवात

रवळनाथ, सातेरी, भूमिका, माउली, शांतादुर्गा आदी देवतांच्या प्रतीकात्मक तरंगांची मेळामेळ पाहायला मिळते. या भेटीतून शिवलग्न सोहळा साजरा होत असल्याची भावना दृढ आहे. या सणातल्या विविध विधीद्वारे प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध आणि सृष्टीच्या रहस्याचे हे तत्त्व अधोरेखित केले जाते.

महाभारतात पांडवांनी अज्ञातवासाच्या कालखंडात आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती आणि दसऱ्या दिवशी ती बाहेर काढली होती. यामुळेच शमी वृक्षाला पवित्र मानले जाते. कुबेराने सोन्याच्या मुद्रांचा वर्षाव वृक्षावरती केल्याकारणाने आपटा किंवा कलमवृक्षाची पाने सोने म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा आहे.

सोने म्हणून लुटण्याची परंपरा आम्हांला वृक्षांशी जवळ आणतात. मानवी जीवन सुंदर करण्यात त्याच्या परिसरातल्या निसर्ग सांतेरीचे महत्त्वाचे स्थान आहे. वृक्षवेली, पशुपक्षी यांचे अस्तित्व अबाधित ठेवून, आपले जगणे समृद्ध करण्यास इथल्या कष्टकरी समाजाने प्राधान्य दिले होते.

गोवा-कोकणातल्या घाटमाथ्यावर व जंगल समृद्ध भागात जीवन व्यतीत करणाऱ्या म्हशी आणि बकऱ्यांचे पालन करणाऱ्या धनगर समाजाचा दसरा हा निसर्गस्नेही विचारांनी समृद्ध आहे. यामधून त्यांचे निसर्गाशी जुळलेले ऋणानुबंधांना दृढ होतात.

जमिनीवर कांबळ ठेवून त्यावर नारळ, सुपारीची पाने, तांदूळ, दगड ठेवून जैवसृष्टी निर्माण होण्यासाठी आधार ठरलेल्या मातीची पूजा ‘म्हालची पांढर’ नामक विधीतून केली जाते.

पशुपालक असणाऱ्या धनगर समाजात दसऱ्या दिवशी आपल्या पूर्वजांना नैवेद्य म्हणजेच ‘विसावे’ अर्पण करण्याची प्रथा आहे. या साठी दही व दूध विशेषत कुड्याच्या पानावर ठेवले जाते. चांदिवडा वृक्षाच्या पानांचासुद्धा उपयोग केला जातो.

त्यादिवशी धातूच्या पतव्याचे किंवा नदीतल्या दगडगोट्यांच्या तांदळ्यांचे पूजन केले जाते. देवतांनी युक्त असलेली पाटी बाहेर काढून झाडांच्या सावलीत मळावरती पूजा केली जाते. आश्विन महिन्यात जंगलात उपलब्ध असलेली रानटी फळे फुले यांचा उपयोग करून घरात मंडपी बांधली जाते.

पूर्वीच्या काळी त्यांच्या परिसरात उपलब्ध असलेल्या जैवसंपदेवर लोक अवलंबून असायचे. खाद्यान्न, वनौषधी म्हणून ज्या वृक्षवेलींचा वापर केला जायचा, त्यांना मंडपीच्या सजावटीत स्थान दिले जायचे. पुरुषांच्या गजानृत्याचे तर स्त्रियांच्या पारंपरिक लोकगीतांच्या सुरेल गायनावरती फुगड्यांच्या नृत्याचे सादरीकरण केले जाते.

काही ठिकाणी दसऱ्याला भाताच्या पिवळसर कणसांची पूजा करून घराच्या प्रवेशद्वारावरती आंब्याचा पानांबरोबर तोरण बांधण्याची परंपरा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जीवनात अडचणी येतायत? बृहस्पतीला करा प्रसन्न, होतील मनोकामना पूर्ण; सौभाग्य आणि समृद्धीसाठी करा 'हे' विशेष उपाय

India Tourism: भारत गरीब नाही, दुर्लक्षित...! 'या' खजिन्यामुळे भारत बनू शकतो जगातील पर्यटन महासत्ता; असं का म्हणाले जावेद अख्तर?

आला,आला पाऊस पुन्हा आला! 1 ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट' जारी

Asia Cup Controversy: पाकड्यांचे रडके चाळे सुरुच! फायनलआधीच 'या' स्टार खेळाडूची 'ICC' कडे केली तक्रार; टीम इंडिया अडचणीत?

Goa Tourism: गोवा फक्त 10 हजारांत! विमान तिकीट, हॉटेल्स आणि कोकणी जेवणाचा आनंद घ्या; सफर करा अविस्मरणीय

SCROLL FOR NEXT