
कोणत्याही संकटाला सामोरे जाऊन यश कसे मिळवावे, याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारी उद्योजिका सर्वांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. नवदुर्गेचे तिसरे श्री चंद्रघंटा देवीचे रुप असलेली आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी पल्लवी साळगावकर.
पल्लवी साळगावकर यांना वूमन लिडरशीप पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी राबविलेले विविध उपक्रम अभिनंदनीय आहेत. युवा या संस्थेनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली. संस्थेच्या १२व्या संस्थापक दिनाच्या कार्यक्रमात त्यांना खास गाैरविण्यात आले आहे. समाजाप्रती केलेल्या कामाची दखल घेत मिळालेला सन्मान नेहमीच जबाबदारी अधिक वाढवतो, असे त्या नेहमीच सांगतात.
झांट्ये कुटुंबात जन्मलेली पल्लवी बालपणापासूनच आजूबाजूला पहायची कार्यमग्न असणाऱ्या साऱ्या कुटुंबीयांना. हाच वारसा घेत तिने धेम्पो महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून झेप घेतली ती थेट मुंबापुरीत. इथे तिने ‘सीए’चे शिक्षण काही वर्षे घेतले. त्यासाठी महानगरातील वसतिगृहात राहावे लागले. महत्वाचे हे की, यासाठी तीस वर्षांपूर्वी तिच्या आई वडिलांनी कोणतीही हरकत न घेता तिच्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.
संयुक्त कुटुंबात राहताना बालपणीच सभोवतालची चर्चा ऐकून व्यवसायाची बीजे मनात कुठेतरी रोवली गेली. ‘सीए’ चे शिक्षण काही वर्षांसाठी गोव्यातही घेतले. याच बरोबर तिने अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून उद्योजकता आणि त्यातील नवे प्रयोग यावर प्रशिक्षण घेतले होते.
लग्नानंतर जीनो फर्मास्युटिकल्समध्ये आर्थिक सल्लागार म्हणून नोकरी केली. याच दरम्यान २०१२ साली तिने ‘डेझर्ट्स फर्स्ट’ हे काही वेगळे पदार्थ बनवण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची प्रत आजही गोव्यात अनेक दुकानांत उपलब्ध आहे.
काही वेगळे करण्याची आवड आणिजीवनसाथीने त्याला दिलेली साथ यामुळे ‘डेझर्ट्स एन मोर’ या नावाने याच कंपनीत एक अन्न विभाग सुरू केला. आज, संपूर्ण गोव्यात सुपरमार्केटमध्ये किरकोळ विक्री करण्याव्यतिरिक्त स्वयं-चालित स्टोअर्स, फ्रँचायझी आणि एक्सप्रेस काउंटरच्या नेटवर्कमध्ये याच नावाने विक्री चालू आहे.
आधुनिक काळात त्यांनी स्वयंचलित मशीन द्वारा अनेक बेकरी प्रोडक्टस उदा.ब्रेड, केक, कुकीज असे पदार्थ बनवायला सुरवात केली. त्यासाठी सर्व सरकारी परवाने घेतले. तिला स्वत:चा नवा ब्रॅंड सुरू करताना आणि त्यात सातत्य ठेवताना असंख्य अडचणी आल्या. गोव्यात असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅंड शी स्पर्धा चालू आहे आणि राहील. कोणत्याही व्यवसायाप्रमाणे इथेही मुख्य अडचण येते, ती कुशल कामगार मिळण्याची.
कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याशिवाय महिलांना व्यवसाय करणे अवघड असते. पल्लवीला मात्र कायमच सारे कुटुंब सहकार्य करते. सकाळच्या वेळी जीनो फार्मास्युटिकल्सचे आर्थिक व्यवहार, त्यानंतर बेकरीचे काम आणि संध्याकाळी घरूनच सारे कार्यालयीन कामकाज करणे, अशी सर्वसाधारण दैनंदिनी असते.
‘लघु उद्योग भारती’ या संस्थेचे अध्यक्षपद, तसेच रोटरी क्लब, जी-१०० फूड इनोव्हेशन अशा अनेक संस्थांसाठी पल्लवीचे काम सदोदित सुरूच असते. वीस वर्षांपेक्षा जास्त काळ बिचोली अर्बन बॅंकेसाठी संचालक मंडळात कार्यरत आहे.
मध्यंतरी आलेला ‘कोविड’ काळ जगाबरोबर या कुटुंबाचीही परीक्षा घेऊन गेला. घरातून काम करण्याची सवय नव्हती, ती सुरू झाली. या काळात अनेक घरांत पूर्वी बेकरीत बनले जाणारे खाद्यपदार्थ उदा. केक, ब्रेड बनू लागले. आणि तेव्हा तिला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागले.
सुदैवाने आता पुन्हा सारे पूर्ववत झाले आहे, असेही तिने संगितले. मधल्या काळात ‘जीसीसीआय’च्या महिला विभागाची अध्यक्ष म्हणून तिने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान गोव्यातील शहरांत आणि गावोगावी चालवले होते.
याशिवाय महिलांना कायद्याचे ज्ञान, मासिक पाळी संदर्भातील स्वच्छतेची माहिती, याशिवाय कामाच्या ठिकाणी जर कोणी त्रास करत असेल, तर त्यापासून आपला बचाव करण्याची तंत्रे, त्यासंबंधी कायद्याचा आधार, यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या.
महिलांनी स्वत:चा व्यवसाय करावा यासाठी मार्गदर्शन , प्रोत्साहन, त्यासाठी असलेल्या सरकारी स्किम्स याची माहिती अनेकींना दिली आहे. येत्या काळात पल्लवीला आपल्या ‘डेझर्ट्स एन मोर’ या ब्रॅंडचा विस्तार करायचा आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याची, बाजाराच्या गरजा प्रमाणे उत्पादनात बदल करायचे आहे. एकाच वेळी अनेक कामे करणारी आणि सतत कामात राहणारी, काम करणे यातच आनंद मानणारी ही उद्योगी महिला सगळ्यांनी आदर्श घ्यावा अशी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.