Curchorem Sex Scandal Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

कुडचडे स्कँडल: केवळ गुन्हा नाही, समाजासाठी इशारा!

Curchorem Sex Scandal: कुडचड्यातील हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याची कथा नाही; तर समाज, पालक आणि तरुण पिढी यांना सावध करणारा एक मोठा इशारा आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

कुडचड्यातील हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याची कथा नाही; तर समाज, पालक आणि तरुण पिढी यांना सावध करणारा एक मोठा इशारा आहे. संवाद, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन यांचा समतोल साधला, तरच पुढील पिढी सुरक्षित आणि सजग समाज घडवू शकते.

राज्यात सध्या कुडचडे येथील सेक्स स्कँडल प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील महत्त्वाच्या २० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढे त्याच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर सेक्स स्कँडल उघडकीस आल्याने हा विषय समाजात गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, आरोपी महागड्या गाड्या आणि स्टायलिश राहणीमानाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींवर भुरळ घालत होता. Snapchat आणि Instagram सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो मुलींशी मैत्री करायचा, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा आणि नंतर फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करायचा. या प्रकारातील धक्कादायक माहिती समोर येत असून, समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेनंतर समाजात विविध मतप्रवाहही दिसून येत आहेत. काही जणांच्या मते आरोपीने वयाच्या आहारी जाऊन गंभीर गुन्हा केला आहे व त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर काही जण प्रश्न उपस्थित करतात की मुली या जाळ्यात कशा अडकल्या? काहीजण तर मुलीही तेवढ्याच जबाबदार असल्याचे म्हणतात. तर काहींच्या मते योग्य संस्कारांच्या अभावामुळेच तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागते. त्यामुळे या प्रकरणाने समाजात अनेक चर्चा आणि वाद निर्माण केले आहेत.

अशा घटनांनंतर पालक आणि मुले दोघेही काही काळ सावध होतात. पूर्वी समाजात जेव्हा एखादे मूल चुकीचे कृत्य करायचे, तेव्हा थेट पालकांच्या संगोपनावर प्रश्न उपस्थित केले जायचे. मात्र अनेकदा असा युक्तिवादही केला जातो की, मूल समजून घेत नसेल तर केवळ पालकांनाच दोष देणे योग्य नाही. तरीही कुडचड्यातील या प्रकरणाकडे बारकाईने पाहिले तर संगोपन आणि संवाद याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जाते.

आई-वडील आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांच्या प्रेमाचे प्रतीकही असते. पण मुलांच्या प्रत्येक मागणीची पूर्तता करणे हेच प्रेमाचे खरे रूप आहे का, हा प्रश्नही येथे निर्माण होतो. मुलांना लहानपणी जगाचे किंवा सामाजिक जीवनाचे पूर्ण ज्ञान नसते. त्यांचे मन अतिशय कोमल असते. विशेषतः १२ ते २० वर्षे हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा असतो.

या वयात शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर अनेक बदल घडत असतात. या बदलांचे स्वरूप मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वेगळे असतात. अनेकदा या बदलांबद्दल मुलांना संभ्रम वाटतो. आकर्षण वाटणे, कोणाशी मैत्री करावीशी वाटणे, आपल्या भावना व्यक्त करण्याची इच्छा होणे या गोष्टी या वयात नैसर्गिक असतात. पण अनेकदा मुले या बाबतीत पालकांशी बोलायला संकोच करतात.

या वयात मित्रमंडळी आणि समाजाचा प्रभावही मोठा असतो. इतर मित्र-मैत्रिणींचे जीवन, त्यांचे संबंध किंवा त्यांचे वागणे पाहून अनेकदा मुलांवर शिशी िीर्शीीीीश निर्माण होते. घरातील वातावरण आणि बाहेरील दबाव यांमध्ये अडकलेले मूल आपली वाट शोधण्याचा प्रयत्न करत असते.

आजच्या काळात सोशल मीडियाचा प्रभावही प्रचंड वाढला आहे. अनेक तरुणांचे जग likes, comments आणि followers याभोवती फिरताना दिसते. या आभासी जगात मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात काही वेळा तरुण चुकीच्या मार्गावरही जातात. त्यामुळे या वयात योग्य मर्यादा आणि मार्गदर्शन देणे अत्यंत आवश्यक ठरते.

कुडचड्यातील हे प्रकरण नक्कीच भयावह आहे. यामुळे युवकांच्या मनात आणि पालकांच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक पालकाच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण होतो-आपली मुले योग्य मार्गावर आहेत का? पण खरे पाहता, मुलांच्या वागणुकीबद्दल सर्वात जास्त माहिती पालकांनाच असते. अनेकदा केवळ ओरडून किंवा दबाव टाकून समस्या सुटत नाहीत.

या वयात मुलांना कोणीतरी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, एवढीच अपेक्षा असते. जर पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधला, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि योग्य मार्गदर्शन केले, तर मुलांनाही आपल्या मर्यादा समजतात. याशिवाय शैक्षणिक संस्थांमध्ये psychology, sociologyसारख्या विषयांना अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. मानवी वर्तन, मानसिक बदल आणि सामाजिक परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळाली तर ते स्वतःत होणारे बदल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात.

शेवटी, कुडचड्यातील हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याची कथा नाही; तर समाज, पालक आणि तरुण पिढी यांना सावध करणारा एक मोठा इशारा आहे. संवाद, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन यांचा समतोल साधला, तरच पुढील पिढी सुरक्षित आणि सजग समाज घडवू शकते.

मृणाली राऊत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाल फितीत अडकलेली माणुसकी, दोन महिने उलटले तरी 19 मृतदेह शवागारातच! - संपादकीय

Griha Adhaar Scheme: सरकारी नोकरीत असतानाही 'गृहआधार', लाभार्थींकडून 1.60 कोटी वसूल; आतापर्यंत सापडले 304 जण

Illegal Gambling Goa: होंडा येथे गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; 9 जणांना अटक, 52,300 रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्यही जप्त

'त्या' मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे आदेश, मुख्याधिकाऱ्यांचा निर्णय; हॉस्पिसियो शवागार भरले

सिंदोळी-सांकवाळातील झरे, नाले, विहिरींत इंधन आले कुठून? अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च परिसरात गूढ कायम; पुन्हा तपासणी होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT