

पणजी: राज्यात मागील काही वर्षांपासून काजू व आंबा उत्पादन घटत आहे. मात्र यंदा पडलेल्या कडक्याच्या थंडीमुळे पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली. कडक उष्म्यामुळे शेतकरी, बागायतदारांच्या आशा मावळल्या आहेत.
सर्वसाधारणपणे काजूला तीनदा मोहर किंवा फुलोरा येऊन पीक मिळत असते. यंदा हंगामाच्या सुरुवातीला पहिला मोहर अतिशय चांगला आला. पीकही चांगले मिळाले. परंतु आता दुसऱ्या पाड्यातील मोहर करपला आहे आणि तिसरा पाड्यातील फुलोराही चांगला येईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यताच अधिक असल्याचे मत शेतकरी तसेच कृषी अभ्यासक व्यक्त करत आहेत.
यंदा काजू हंगामाच्या सुरुवातीला राज्यातील वातावरण चांगले होते. थंडीही यंदा चांगली पडली. त्यामुळे फुलोरा करपला नाही. पहिला पाडा चांगला मिळाला, परंतु दुसऱ्या पाड्यात मोहर येण्याच्या कालावधीत आकस्मिक तापमानाचा पारा वाढला तर ढगाळ वातावरण राहिल्याने काजूचा मोहर करपला. परिणामी काजूच्या उत्पादनात घट झाली.
सद्य:स्थितीतही राज्यातील हवामान अस्थिर आहे. कधी तापमानाचा पारा वाढत आहे तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आशांवर पाणी फेरले आहे.
दरम्यान, यंदा काजू प्रतिकिलो १७० ते १७२ रुपये दराने खरेदी केली जात आहे. सरकारने काजूला २०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आंबा उत्पादन
वर्ष लागवडीखालील
क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये) उत्पादन (टनांत)
२०१९-२० ५०३४ ११००६
२०२०-२१ ५०६२ १०२८२
२०२१-२२ ५०६८ १०१६०
२०२२-२३ ५०७१ १०१८८
२०२३-२४ ५०९० १००७९
काजू उत्पादन
वर्ष लागवडीखालील
क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये) उत्पादन (टनांत)
२०१९-२० ५६४७८ २८६३०
२०२०-२१ ५६८२९ २७३६६
२०२१-२२ ५६८९० २६०३२
२०२२-२३ ५६९३४ २५८००
२०२३-२४ ५७००१ २४२४०
यंदा सुरुवातीला काजूचे उत्पादन चांगले होते, परंतु आता ते खूपच कमी झाले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास यंदाही समाधानकारक उत्पादन मिळणार नाही. परंतु काही प्रमाणात आंबा उत्पादन समाधानकारक आहे.
- सुनील हरवळकर, युवा शेतकरी
हवामानात सतत होणारे बदल काजू उत्पादनाला मारक ठरले. वाढते तापमान, धुके अस्थिर वातावरणामुळे उत्पादन घटत आहे. भविष्यात स्थिती अशीच राहिली तर उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
- दत्तप्रसाद देसाई, उपसंचालक (कृषी संचालनालय)
त्यामानाने आंबा पीक समाधानकारक
राज्यात काजूच्या तुलनेत आंब्याचे पीक समाधानकारक आहे. आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात वाढले आहे असे नाही, परंतु यंदा कोकणपट्ट्यात आंबा उत्पन्नाची झालेली दुरवस्था पाहता गोव्यात चांगली स्थिती आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. येत्या पंधरा दिवसांत बऱ्यापैकी आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. सध्या बाजारात हजार-बाराशे रुपयांना देखील मानकुराद आंबे उपलब्ध आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.