Religious Harmony Goa Dainiak Gomantak
गोंयकाराचें मत

जामीन मिळालाय, निर्दोषत्व नाही ! - संपादकीय

Religious Harmony Goa: तो धार्मिक कलहाच्या उद्देशाने प्रेरित प्रयोगाचा एक भाग होता व खट्टर त्यातील मुख्य पात्र, हे उघड सत्य आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोण हा गौतम खट्टर? त्याला किती महत्व द्यायचे? पण, म्हातारी मेल्याचे दु:ख नसते, काळ सोकावतो. अलीकडे बरेच घटक गोव्याला प्रयोगशाळा बनवू पाहत आहेत, हे आम्ही याच स्तंभातून म्हटले आहे. यू-ट्यूबर तथाकथित इतिहास अभ्यासक गौतम खट्टरला व्याख्यान देण्यासाठी जे पाचारण करण्यात आले होते, तो धार्मिक कलहाच्या उद्देशाने प्रेरित प्रयोगाचा एक भाग होता व खट्टर त्यातील मुख्य पात्र, हे उघड सत्य आहे.

धार्मिक सलोख्यातून वेगळेपण जपलेल्या गोव्यात विचारी व्यक्ती कदापि द्वेषमूलक आगळीक करणार नाही, जी खट्टरने केली. सेंट फ्रान्सिस झेविअरसंदर्भात मांडणीच करायचीच होती तर ती सभ्यता जपूनही करता आली असती. पण, खट्टरने प्रक्षोभक वक्तव्ये करत सेंट फ्रान्सिस झेविअरना मानणाऱ्या असंख्य गोवेकरांच्या श्रद्धेवर घाव घातला. पुढे खट्टर अटकेच्या भीतीने फरार होता. बऱ्याच शोधानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तरीही त्याची रग जिरली नाही. जामिनावर सुटका होताच त्याने चतुरतेने शब्दच्छलाद्वारे भगतसिंगांपासून छत्रपती संभाजींच्या नामोल्लेखाद्वारे अप्रत्यक्षरीत्या स्वत:स त्यांच्या पगंतीत नेऊन बसवले; स्ववर्तनाच्या समर्थनाचा प्रयत्न केला, जो त्याने नावे घेतलेल्‍या थोर विभूतींचा अवमान आहे.

पत्रकारांनी वादग्रस्त वक्तव्याप्रति भूमिका विचारली असता खट्टर बिथरला. ज्या कारणासाठी कोठडी मिळाली, तेथून जामीनमुक्त होताच आपण त्याच भूमिकेवर ठाम आहोत हे कसे सांगावे? मग पत्रकारांना ‘डेकोरम’ राखण्याचे त्‍याने सल्ले दिले. पत्रकारांच्या प्रश्‍नांमुळे निरुत्तर झालेल्या खट्टरने उपदेश करणे म्हणजे ‘गिरे तो भी टांगे उपर’ झाले. ज्याचा निषेध अनेक घटकांनी केला आहेच. पत्रकार चुकत नाहीत असा आमचा मुळीच दावा नाही; पण खट्टरसारख्या वाचाळवीराने गोव्यातील पत्रकारांना डेकोरम शिकवावा इतकी वाईट पाळी अद्याप आमच्यावर आलेली नाही. स्वत:स उत्तरे द्यायला जमत नाहीत, किंवा द्यायचे धाडस नाही म्हणून त्याचे खापर गोमंतकीय पत्रकारांवर फोडण्याची मखलाशी करावी लागते. आपल्या स्वत:च्या परिघात, ‘जय श्रीराम’च्या घोषणा करणाऱ्यांच्या घोळक्यापुरतेच यांचे व्याघ्रत्व आणि वक्तव्य डरकाळी फोडणारे असते. पत्रकारांनी अडचणीचे प्रश्‍न विचारले की ते कुठल्या बिळात जाते ते सांगायची गरज नाही. खरी हिंमत असती तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देऊन मग गेला असता. हा पळपुटेपणा त्याच्या मागेपुढे उच्चारलेल्या नाऱ्यांचा, घोषणांचाही अपमान करणारा ठरला.

खट्टर म्हणतो त्या प्रमाणे त्याने पत्रकारितेचे शिक्षण घेतले असेलही; पण तो शिकला काय? गोव्यात येताना येथील सामाजिक अंतरंग त्याने अभ्यासले होते का? असल्यास ध्रुवीकरण हाच त्याचा हेतू असावा. कारण, राष्ट्रवादाच्या नावाखाली त्याने द्वेषमूलकतेची पोळी भाजली. गोव्याच्या इतिहासाबाबत त्याला काय माहिती आहे? येथील सौहार्द ठाऊक आहे? असो. पुढील वर्ष निवडणुकीचे आहे. असे किती खट्टर येतील आणि जातील, लोकांनी भेदाचा डाव आता समजून घ्यावा. खट्टरच्या भाषणापासून हिंदू व ख्रिस्ती धर्मीयांत दुही निर्माण होईल, अशी स्थिती असून सत्तातुरांना तेच हवे आहे. केंद्रात भाजप, राज्यात भाजप.

सत्ता हिंदुत्व विचारसरणीशी जवळीक साधणारी असताना खट्टरसारख्यांना खरे तर कामच उरू नये. पण, सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रखर मुद्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे धर्मांध उपयोगी पडतात. १९९३साली झालेल्या मुंबई बाँबस्फोटानंतर महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली होती. हिंदू विचारसरणीचे सरकार. पण, वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या कार्यकाळात एकही जातीय दंगल घडली नाही वा तेढ निर्माण झाली नाही. अर्थात, पुढे ती शिवसेना उरली नाही. परंतु वाचाळगीरी न करता कायद्याच्या आड येईल, त्याची गय केली जाणार नाही, या एका तत्त्वावर सारे सुरळीत चालवून तत्कालीन सरकारने दाखवून दिले होते.

आज गोव्यात ते का शक्य नाही? विरोधी बाकावर सात आमदार असतानाही ज्यांना भलतेच निमित्त पुढे करून अधिवेशने आवरती घ्यावी लागतात, गेली अनेक वर्षे जे अधिवेशनांचा कालावधीच कमी करून प्रश्‍नांना सामोरे जाणे टाळतात, त्यांना हे असल्या धर्मांधांच्या कुबड्या घेण्यावाचून अन्य पर्याय नसतो. लोकांना दैनंदिन जीवनात सतावणारे प्रश्‍न, प्रशासकीय अनागोंदीमुळे माजलेला भ्रष्टाचार, भू-माफियांसमोर घातलेली लोटांगणे, त्यांच्यासाठी केलेले भूरूपांतर, स्थानिकांना विश्‍वासात न घेता लादलेले प्रकल्प याविरुद्ध जो हल्लीच्या काळात गावागावांतून जनक्षोभ उसळला त्यावर उतारा म्हणून अन्य विषयांत क्षोभ निर्माण करणे गरजेचे होते. ती राजकीय गरज सामाजिक शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरली. अन्यथा खेटरांनी पूजा करण्याच्या लायकीच्या लोकांची गोव्यात कोणीही मिजास बाळगली नसती. पर्रीकरांनी मुतालिकांना वेळीच ओळखून गोव्याबाहेर रोखले, तसे या खट्टर प्रवृत्तींना रोखणे कठीण आहे का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gajkesari Yog 2026: चंद्र-गुरुचा अद्भुत मिलाफ! 'गजकेसरी योग' उजळणार 5 राशींचं भाग्य, धनलाभ आणि मानसिक शांती लाभणार; गुंतवणुकीसाठीही सुवर्णसंधी

खरी कुजबुज: सात कोटींचा रस्ता खोदला!

Goa Agriculture Export: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गोव्यातून कृषी निर्यात वाढणार; मोपावर लवकरच 'निर्यात पॅक हाऊस'

Road Accident: "जखमींना वाचवायला गेले अन् स्वतःच काळ बनून आलेल्या कारखाली चिरडले!" भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू; मदतीला धावणारी माणुसकी ठरली 'टार्गेट'

Goa Murder Case: कौले ठेवण्याच्या कारणावरुन कुऱ्हाडीचे मानेवर सपासप वार, दोन भावांच्या हल्ल्यात काकाचा तडफडून मृत्यू; खाजोर्डा हादरले!

SCROLL FOR NEXT