Chhatrapati Sambhaji Maharaj Goa | Sambhaji Maharaj Portuguese war | Goa campaign history Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

छ. संभाजी महाराजांनी जुवे किल्ला ताब्यात घेतला, पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडाली; मराठी सैन्य साळ नदीकाठी ठाण मांडून बसले

Sambhaji Maharaj Goa Campaign: कोलवाळ आणि थिवीच्या स्थानांमधील मध्य किल्ला तसेच थिवीच्या दक्षिणेस तटबंदी बांधण्यात आली होती. या सर्व स्थानांना खंदक असलेल्या भिंतीने जोडले गेले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

छत्रपती संभाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसांत हा अवघ्या २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. १६८३च्या गोव्याच्या मोहिमेदरम्यान, पोर्तुगीज गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को डी टाव्होर काउंट डी आल्वोर यांनी बार्देशमधील संरक्षण सुधारण्याचे आदेश दिले होते.

कोलवाळ आणि थिवीच्या स्थानांमधील मध्य किल्ला तसेच थिवीच्या दक्षिणेस तटबंदी बांधण्यात आली होती. या सर्व स्थानांना खंदक असलेल्या भिंतीने जोडले गेले होते. पोर्तुगिजांनी गोवा शहराच्या (सध्याचे जुने गोवे) सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर काउंट दि अल्वोर याने बऱ्याचशा तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहीत होते, की गोव्यात शिरून पोर्तुगिजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल.

छत्रपती संभाजी महाराजांना पोर्तुगिजांच्या दुटप्पी धोरणाचा पहिल्यापासून अनुभव होता. मुघलांशी संधान बांधून कोकण काबीज करण्याचा त्यांचा बेत राजांनी आपल्या युद्धकौशल्याने हाणून पाडला होता.

मुघल व मराठे यांच्या लढाईत संभाजी महाराजांचा, खात्रीने पराजय होईल असे पोर्तुगीज गव्हर्नर काउंट द आल्व्होरला वाटत होते. पोर्तुगीज व मुघल यांच्यातील तहामुळे संभाजी राजांनीही आपले सामोपचाराचे धोरण बदलून चढाईचे धोरण स्वीकारले.

पोर्तुगिजांनी मुघलांशी हातमिळवणी केल्याने, मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी फोंडा कोट जिंकण्यासाठी फोंड्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराज यांना पोर्तुगिजांच्या संभाव्य धोक्याची कल्पना होती आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील फोंडा किल्ला आधीच सुरक्षित केला होता. फोंड्याचा वेढा उठविल्यानंतर संभाजी राजे पन्हाळयास जातील अशी पोर्तुगीज गव्हर्नर काउंट द आल्व्होरची समजूत होती.

पोर्तुगिजांनी मुघल आरमारास आपल्या हद्दीतून जाण्याची परवानगी दिली होती. मुघल आरमार धान्य घेऊन गोव्यातून कोकणात जाणार होते. ही मदत थांबावी म्हणून संभाजी महाराजांनी आपल्या सैन्यास गोव्याच्या परिसरात नेले होते.

गोव्याचा गव्हर्नर काउंट दि अल्वोर याला मराठ्यांनी पूर्ण जेरीस आणून सोडले होते. त्यातच २४ नोव्हेंबर १६८३ रोजी संभाजी महाराजांनी गोवा शहराच्या (सध्याचे जुने गोवे) बाहेरील वरच्या सांत ईस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला आणि बेसावध पोर्तुगिजांना काही समजायच्या आतच जुवे किल्ला ताब्यात घेतला.

यामुळे मध्ये फक्त मांडवी नदी आणि पलीकडच्या तीरावर राजधानी गोवे शहर अशी आणीबाणीची परिस्थिती पोर्तुगिजांवर आली. दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबर १६८३ रोजी सकाळी पोर्तुगीज प्रतिकारासाठी जुवे किल्ल्यापाशी आले, पण नेहमीच्या गनिमी काव्याने मराठ्यांनी त्यांना चकवून कचाट्यात पकडले. पोर्तुगिजांची इतकी वाईट अवस्था झाली, की ३०० सैनिकांपैकी एकही सैनिक धड अवस्थेत नव्हता. स्वतः पोर्तुगीज गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को डी टाव्होर मरता मरता वाचला.

पोर्तुगीज पळत सुटलेत हे पाहून गोवे शहर ताब्यात घ्यावे म्हणून, संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगिजांवर हल्ला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले.

या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचविले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळ नदीकाठी ठाण मांडून बसले, तर स्वतः राजांनी वेळ न गमावता साष्टी आणि बार्देशवर हल्ला केला आणि तीन बाजूंनी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाला घेरले.

आता फक्त तिसवाडीच पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिली होती. पण सुमारे १ लाखांचे मुघल सैन्य घेऊन शाह आलम कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजांना परत जावं लागलं.

पोर्तुगीज गव्हर्नर आधीच गोवा शहर सोडून गेला होता. त्याला खात्री होती की संभाजी महाराजांना पराभूत करणे अशक्य आहे. त्याला भीती होती की शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले, की संभाजी राजांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवावा. यासाठीच गव्हर्नरने आपला वकील शंभू राजांच्याकडे पाठवला होता. यानंतर काही दिवसातच संभाजी राजे यांनी पोर्तुगिजांबरोबर तहाची बोलणी केली आणि ते रायगडला परत आले.

गोव्यातील कित्येक लोक वर्षानुवर्षे पोर्तुगिजांचा जाच, त्रास छळ आणि अत्याचार सहन करत होते. कित्येक वर्षांनंतर आज ते स्वातंत्र्याचा आनंद घेत होते. इ.स. १६८४ मध्ये संभाजी राजांनी पोर्तुगिजांबरोबर तह केला.

त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्यांना सोडून दिले. तर पोर्तुगिजांनी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत.

औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगिजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक मंडळींनी त्यांना विरोधच केला होता. पण संभाजी राजे मात्र त्यांची मदत मिळवण्यात यशस्वी ठरले.

आणखी सतत ४ वर्षे मुघलांना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ रोजी कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्ख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट मुघल बादशाह औरंगजेबाने ११ मार्च १६८९ रोजी राजांची हत्या केली.

महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात शंभूराजाचं स्थान अद्वितीय आहे. गोव्यात पोर्तुगिजांना छत्रपती संभाजी महाराजांकडून बसलेला दणका एवढा प्रचंड होता, की गोव्यातील ३ तालुक्यांच्या पलीकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी नंतर केला नाही.

एवढ्या सततच्या धामधुमीतही ‘बुधभूषण’ आणि इतर काही संस्कृत रचना करणाऱ्या या तेजस्वी राजाच्या नावावरून ‘वास्को द गामा’ शहराचं नाव ‘संभाजीनगर’ करावं असा प्रस्ताव काही काळापूर्वी आला होता. स्वातंत्र्य मिळताच पारतंत्र्याच्या खुणा निष्ठुरतेने पुसाव्या लागतात आणि त्याजागी पारतंत्र्यात जाण्यापूर्वीच्या खुणा स्थापन कराव्या लागतात. वेळ निघून गेली, की वास्कोचे संभाजी नगर होत नाही. इतकेच नव्हे तर गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को गोव्याचा रक्षणकर्ता होतो व संभाजी महाराज आक्रमक!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT