Bhandari Community Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: 1850 च्या आधी मुंबई, गोव्यात कोळी आणि भंडारी होते, गाळीव इतिहास लिहिण्याचा प्रयत्न

Bhandari Community in Goa: १८५०च्या सुमारास कोकणातील चाकरमानी गिरणी कामगार म्हणून मुंबईत जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंडारी समाजातील लोकांचाही भरणा असतो. त्याही अगोदर मुंबईत जसे कोळी आणि भंडारी होते तसे ते गोव्यातही होते

गोमन्तक डिजिटल टीम

प्रकाश वजरीकर

दैनिक ‘गोमन्तक’च्या रविवार दि. २६ जानेवारी व दि. ०२ फेब्रुवारीच्या पुरवणीतील ‘गोमन्तक’चे संपादक- संचालक राजू नायक यांनी ‘मर्मवेध’ सदरातून भंडारी समाजाच्या वर्तमान स्थितीला अनुसरून इतिहास उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोवा विद्यापीठाच्या इतिहास विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ. पराग पोरोब यांच्या शोधनिबंधांच्या आधारे हे लेख लिहिलेले आहेत.

गोव्यातील बहुजन समाजाच्या प्रासंगिक विषयांना अनुसरून डॉ. पराग पोरोब यांच्या संशोधनावर आधारित लेखन या मर्मवेध सदरात कित्येक वेळा प्रकाशित झालेले आहे. मुळात संशोधकाचे विषय, संशोधनाची उद्दिष्टे, गृहीतके, माहिती, संकलनाची साधने, चिकित्सक परिमाणे व त्या आधारे काढलेल्या निष्कर्षांनाही विषय मर्यादा पडलेली असते. कुठलेही संशोधन ही निरंतर प्रक्रिया असते, हे जरी मानले तरी त्या संशोधनावर आधारित विषयवेध घेताना सामाजिक क्षेत्रात त्याचा प्रभाव आणि परिणाम कितपत होणार याचीही जाणीव शोधकर्त्यांना तसेच शोधनिबंधाचा किंवा प्रबंधाचा आधार घेणाऱ्यांनाही असते.

राजू नायक यांनी आपल्या पहिल्या लेखाची सुरुवातच लक्षवेधी सूचनेने केली आहे. गोव्यातील भंडारी समाज हा प्रमुख सत्तास्थानापासून अलग ठेवल्याने अस्वस्थ आहे. त्याला सत्तेचा अधिक हिस्सा हवा आहे, या प्रकारच्या विधानातून भंडारी समाजातली समकालीन राजकीय व्यवस्थेतली अवस्था दाखविण्याचा हा प्रयत्न म्हणजे राजकीय सत्तेचा हव्यास व्यक्त करणारा आहे. सत्तेचा अधिक हिस्सा शोधताना ही सत्ता वाटणी करणाऱ्या व्यवस्थेकडे हे बोट जाते आहे. पण जे राजकीय अधिकार-सत्तेत आहेत त्यातले व्यवस्थेतल्या निर्णय-सत्तेत कितीजण आहेत? त्यांना निर्णय-सत्तेपासून दूर ठेवत असेल तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी वलये भेदावी लागणार आहेत.

तेवढी कर्तृत्वशक्ती या सत्तेतील अधिकार शक्तीत आहे का? का ती अगतिकता दाखवण्यासाठी सत्तेचा अधिक हिस्सा मागण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे का, याचे चिंतन व्हावे. चिंतन आणि नियोजनबद्ध रितीने आखलेली कृती पुढील दोन वर्षात गोव्यात काहीतरी नवे घडविण्याच्या इराद्याने व्हावी, ही राजू नायक यांची इच्छा असावी. ही कृती एका संघर्षाच्या सावटाखाली घडता कामा नये. तर नियोजन प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी लागणारे मनुष्यबळ, बौद्धिक बळ, कार्यकर्त्यांचे बळ आणि समाजासाठी नि:स्वार्थी वृत्तीने संघटित करणाऱ्यांचे बळ वाढविण्याचे आवाहन समकालीन परिस्थितीत भंडारी समाजासमोर आहे.

इतिहासावरून भविष्य वाचण्याचा एक अनाहूत सल्ला या दोन्हीही लेखातून त्यांनी दिलेला आहे. पण इतिहासातील काही घटनांची नोंद घेताना डॉ. पराग पोरोब यांच्या शोधनिबंधाचा मूळ आधार ग्राह्य मानल्यामुळे काही अनुमान व निष्कर्षांबाबत भंडारी समाजाचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रातून गोव्यात स्थलांतराचा इतिहास आहे व हा समाज उपरा असल्याचा समज या लेखातून होण्याचा संभव आहे. वास्तविक, या समाजाची नाळ इथल्या लोकतत्त्वाशी जुळलेली आहे. इथल्या लोकदैवतांची, लोकवेदाची, ग्रामव्यवस्थेशी हा समाज जुळलेला आहे. आपल्या इथल्या मातीशी इमान राखणारा हा समाज आहे.

पद्मनाभ संप्रदायाची स्थापना ब्राह्मणांनी केली व नंतर भंडारी समाजातील आध्यात्मिक नेतृत्वाने ती तळागाळात नेली. एकोणिसाव्या शतकापासून या संप्रदायाची सुरुवात होऊन कोकणातील गिरणी कामगारांच्या अल्प पगारातून ही चळवळ आणि प्रबोधन करता करता ती भंडारींच्या स्थलांतरणाकडे (गोव्यात) येते. १८४३मध्ये दलदल झालेल्या पणजीचे राजधानी म्हणून होणारे रूपांतरण व मुरगाव बंदराचा होणारा आर्थिक विकास ही कारणे सोबत जोडल्याने कोकणातील (मुंबईतीलही) भंडारी समाजाच्या आध्यात्मिक स्थलांतरणाचाही इतिहास एकोणिसाव्या शतकातून सुरू होतो असा समज निर्माण होतो.

१८५०च्या सुमारास कोकणातील चाकरमानी गिरणी कामगार म्हणून मुंबईत जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंडारी समाजातील लोकांचाही भरणा असतो. त्याही अगोदर मुंबईत जसे कोळी आणि भंडारी होते तसे ते गोव्यातही होते हा इतिहास गाळून लिहावासा का वाटल्याचे कोडे उलगडत नाही. आपण शूद्रांमध्ये गणले जाऊ नये या स्वाभिमानी भावनेतून व आत्मसन्मानाच्या जाणिवेतून लोकलढा देणाऱ्या प्रबोधनाची चळवळ चालविणाऱ्या भंडारी समाजातील दूरगामी सुधारकांनीही हिंदू धर्मपीठातील शंकराचार्यांकडे दाद मागूनही त्याकडे नियोजनबद्ध रितीने दुर्लक्ष केल्याची, क्षत्रिय पदवी बहाल करण्यासाठी लावलेला विलंब हा बरेच काही सूचित करतो.

गोव्यातील (Goa) भंडारी समाज हा माती आणि पर्यायाने सातेरी. भूमिका संकल्पनेशी निगडीत असून मातीची म्हणजे सातेरीची पूजा करण्याची पद्धत हजारो वर्षांपासून असताना निवडक भंडाऱ्यांचा उल्लेख करून ‘भायले’ ठरविण्याचा इतिहास प्रमाण मानण्याचा खटाटोप होता कामा नये. भंडारी हा फक्त ताडी-माडी सूर व्यवसायाशीच निगडीत होता आणि आहे हा मुद्दा कित्येकांनी पुष्कळ वेळा सप्रमाण खोडून काढलेला असताना पुन्हा पुन्हा तोच मुद्दा (तोही अर्धवट) लावण्याचा हेतू काय, हे कळायला मार्ग नाही. भंडारी समाजाची शूद्र म्हणून केली गेलेली संभावना ही सामूहिक स्वाभिमान व पुरुषार्थाच्या आड आहे.

वेदाभ्यासापासून हा समाज दूर होता हे प्रतिबिंबित करताना या समाजाचा स्वतःचा लोकवेद आहे. त्यामधील सामाजिक भाषिक सांस्कृतिक पर्यावरणीय व भौगोलिक आदी संदर्भ हे भंडारी समाजाची मातीशी नाळ जोडणारे आहेत. त्यांची लोकतत्त्वाशी निगडीत असलेली स्वतःची समृद्ध परंपरा नाकारून त्यांना इतिहासातून गाळण्याचा तर प्रयत्न होत नाही ना? मागे इथल्या संस्कृतीरक्षणाचा विडा उचललेल्यांनी स्वयंघोषित राष्ट्रप्रेमींनी इथल्या ‘आदिवासींचा’ उल्लेख ‘गिरीवासी’ म्हणून करण्याचा नियोजनबद्ध प्रसार केला होता. याविरुद्ध आदिवासींनी दाखवलेली समयसूचकता ही लक्षणीय आहे. ‘भंडारी समाज स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेताना या समाजाला बिगर-ब्राह्मण राजकारण हे जातीचे स्थिर वैचारिक संघटन कधीच नव्हते’ या विधानामागची गोवामुक्तीनंतरची बहुजन समाजाची लोकतत्त्वीय अधिष्ठान असलेली समृद्ध वैचारिक श्रद्धेय चौकट ही ‘संघ’टितपणे कशी विस्कळीत करून टाकून लोकदैवतांचे आर्थिकीकरण करून लोकतत्त्वीय अधिष्ठानाची घडी विस्कळीत करण्याचे काम केले याचा गंभीरपणे विचार होऊ शकतो का?

हिंदू (Hindu) धर्माला आलेले जडत्व दूर करताना पद्मनाभ संप्रदायाने केलेल्या महान कार्याची यथोचित नोंद या लेखांतून घेतली आहे. त्याचबरोबर हा संप्रदाय राजकीय पक्षांना कसा आशीर्वादांसाठी उपयोगी पडतो याचाही अन्वयार्थ काढला जाऊ शकतो. पद्म पुरस्कार पदवीचा उपयोग व उल्लेख श्रेय घेण्यासाठी करता येतो का, याचे भान नसलेले कितीतरी होर्डींग्स दिसायचे त्यावेळी याची जाणीव व्हायची. गोव्याचे (कळंगुट) थायलंड झाल्याची खंत व्यक्त होताना या संप्रदायाची प्रबोधनाची व्यसनमुक्तीची एक समृद्ध परंपरा होती त्याची जागा आता पठडीतल्या हिंदुत्ववादाने घेतली का, यावरही निःपक्षपाती तटस्थ वृत्तीने विचार करताना इतिहासाचे पुनर्लेखन करणे गरजेचे आहे. या समाजातल्या एके काळी गोव्यातील तळागाळातील बहुजन समाजाचे लाभलेले प्रचंड लोकमत लोकश्रद्धेच्या (अंधश्रद्धेच्याही) विविध व्यासपीठांना बळकावू लागले आहे. गोवा मुक्तीनंतर गोव्यात स्थापन झालेल्या विविध संप्रदायांच्या मठांनी, विविध पथांच्या मठांनी, देवळांनी तसेच लोकश्रद्धेचा चतुर उपयोग करणाऱ्या धुरीणांनी गोव्यातील मोठ्या संख्येने असलेल्या भंडारी समाजातील निरागस श्रद्धेला अवास्तव कर्मकांडाची जोड देऊन त्यांची ‘कोकणे’ ही ओळख पुसून त्यांना ‘हिंदू’ करण्याचे हे धर्मांतरण जाणून घेणारा गोव्यातील भंडारी समाज आजच्या घडीला आपली अस्मिता, आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा अवस्थेत भंडारी समाजाचा गाळीव इतिहास लिहिण्याचा व तो बिंबविण्याचा प्रयत्न होता कामा नये, असे मला वाटते.

गोवा मुक्तीलढ्याचा इतिहास जसा अजूनही अपूर्ण आहे तसाच गोव्यातील विविध समाजांचा इतिहासही अपूर्ण आहे. पण तो एकांगी होता कामा नये. तो खुशामती करणाराही नसावा. ‘पात्रांव’ संस्कृतीत रमणाराही नसावा! तो सत्यासाठी आग्रह धरणारा असावा. या कामासाठी आपल्याला सत्याग्रही व्हावे लागेल. १९४६चा सत्याग्रह झाल्यानंतर काहीशी असफलता आल्यानंतर गोव्यात काही ठिकाणी खुशामती सुरू झाल्या, असे मत इतिहास लेखकांनी मांडलेले आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे या संकट निवारणासाठी उपकार मानले गेले. वाळपईत मुसलमानांनी (महमद खान) पोर्तुगीज झेंड्याखाली राहण्याची इच्छा व्यक्त केली, तसा टेलिग्राम पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला पाठविण्यात आला. मंगेशी देवालयात सत्यनारायण पूजा बांधली गेली. त्या पूजेसाठी हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांना लवकर कामावरून जाण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांना विनंती केली गेली व ती मान्यही झाली. खुशामती करणारे करतीलही. इतिहासलेखन प्रक्रिया खुशामतींची व बंडाचीही नोंद घेणारी असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT