गाव म्हणजे साहजिकच निसर्ग सौंदर्याने सजलेला... शहरातून दूर, शांत व प्रसन्न…अंत्रुज महाल म्हणजेच फोंडा तालुक्यातील अडकोळण. मार्शेलला जाताना गोव्यातील सुप्रसिद्ध बाणस्तारीचा बाजार, तिथे उतरून अंदाजे एक किलोमीटर आत जायचे. वाटेत दोन्ही बाजूंना झाडे, शेती. सारं काही प्रसन्नचित्त करणारं. आमचा गाव रेड्यांच्या जत्रेसाठी सुप्रसिद्ध. गावात श्री महिषासुरमर्दिनी देवी, वेताळ-बेताळ, श्री रवळनाथ, श्री गोपालकृष्ण आदी मंदिरे आहेत.
निसर्ग सौंदर्याने सजलेल्या गावात आमची नाईक वाड्यावरील वस्ती. कुळागरांच्या मध्ये आमचा नाईक वाडा. ग्रामदेवी श्री महिषासुरमर्दिनी. पूर्वी आमच्या गावातील घरे मातीची होती. जेवण सर्व मातीच्या चुलीवरच होत. गॅस वगैरे काही नव्हता. जमीन शेणाने सारवत होतो. सारवताना जमिनीवर एक वेगळेच चित्र तयार व्हायचे. घराच्या पाठीमागून कुळागरांना पाणीपुरवठ्यासाठी पाणी वाहून जायला वाट (पाट) होती.
कुळागरात पाणी न्यायला आम्ही वाट करून पाणी अडवायचो. मग ते पाणी सुपारीच्या झाडाचे पान (पोवळी) घेऊन अडवलेल्या पाण्यात माड, सुपारी व इतर झाडांना शिंपायचो. आता काहींनी यंत्रे लावली आहेत. काजू मोसमात गावातून काही अंतर चालून जंगलात काजू कुळागरात जायचो. काजू गोळा करून मग काजूचे फळ व बी वेगवेगळे करायचो. कोळमी (खास काजूचा रस काढण्यासाठी असलेली जागा) वर काजूफळांचा रस काढायचो, शेवटी शुध्द निरा प्यायचो.
काजू रस डब्यात भरून गावातील दारू तयार करण्याच्या भट्टीवर नेऊन द्यायचो. प्रत्येक डब्याच्या बदल्यात आम्हाला एक कार्ड दिले जायचे. हंगामाच्या शेवटी सर्व कार्डे नेऊन द्यायची व त्याबदल्यात पैसे मिळायचे. काजूफळे शुक्रवारी बाणस्तारीच्या बाजारात नेऊन विकायचो. आमचे कोकमचे झाड होते, कोकम फळ पिकल्यावर ते काढून साल व बी वेगवेगळे करायचो. साल मग कोकमच्या रसात चांगली मिसळून त्या सुकायला घालणे वगैरे.
जंगलात जाऊन जंगली फळे, जसे करवंदे, चुन्ना वगैरे खायची वेगळीच मजा असायची.शेतीही करायचो. सोमवारी, शुक्रवारी गावातील काही गावकरी सोमवार-शुक्रवारचे व्रत करायचे. संध्याकाळी त्यांच्या घरी जायचो, आरती, प्रसाद घ्यायचो. सर्व एकत्र यायचे. अजूनही सर्व गावकरी गुण्यागोविंदाने नांदतात. मला अजूनही आठवते, गावात कितीतरी साप येत असत; मला तेव्हा मात्र सापांची अजिबात भीती वाटत नसे.
पूर्वी वानरमारी गावात यायचे, धनुष्य-बाण वगैरे घेऊन वानरांना, साळिंदरांना मारून न्यायचे. ते अजूनही आठवते. तेव्हा वन्यप्राण्यांची हत्या वगैरे माहीत नव्हते. मी शाळेत जायचो..ते दिवसच वेगळे होते. त्यांची तुलना शब्दांत व्यक्त करणे अशक्यच... आई-वडील पणजी येथे स्थायिक झाले असले तरी श्री गणेश चतुर्थी, दीपावली, श्री महिषासुरमर्दिनी देवीची जत्रा, मंगलकार्य वगैरे सर्व गावातच होते.
गावात जे सुख आहे ते शहरात मात्र नाही. गावातील जमिनींवर आता बिल्डर लॉबीची कुदृष्टी पडत आहे. परराज्यातील लोकही हळूहळू इथे तग धरून राहिलेत. माझे निसर्ग गावही बदलत आहे. काही बदल चांगले असतात, तर काही…हे सर्व लिहित असताना मात्र जफर गोरखपुरी लिखित, पंकज उधास यांनी गायलेले
‘दुख-सुख था एक सबका...’ या संवेदनशील गाण्याची आठवण झाली…
चंदन दामू नाईक-गांवकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.