दत्ता दामोदर नायक
प्राचीन भारतातील नागवंशाचा उल्लेख वेद, बौद्ध व जैन साहित्य, रामायण, महाभारत, कथासरित्सागर, पुराणे यामध्ये आढळतो. नाग, निषाद, पिशाच्च, असुर, दानव, राक्षस, वानर व किरात या वंशाचे लोक प्राचीन भारतात राहत असत. पुढे त्यांचा आर्य व द्रविड लोकसमूहाशी संकर झाला. आजच्या भारतीय समाजात नागवंशाचे लोक कोण याचे उत्तर देणे कठीण आहे.
नागालँडातील नागा व प्राचीन भारतातील नागवंश यांचा कोणताच अन्योन्य संबंध नाही. नाग हा शब्द (नग म्हणजे डोंगर) डोंगरावर राहणारे या अर्थाने आला असावा. नागवंशाच्या लोकांची वस्ती काश्मीर, पंजाब, उत्तर भारत, महाराष्ट्र, दक्षिण भारत, नेपाळ, सिलोन, कंबोडिया या प्रदेशांत होती असे उल्लेख सापडतात. नागवंशीय हे मूळ मंगोलियन वंशाचे व ते चीन, ब्रह्मदेशमधून आले असे मानले जाते. आंध्र प्रदेशांतील नागार्जुन, काश्मीरमधले अनंतनाग, महाराष्ट्रातले नागपूर, गोव्यातील नागेशी, नगर्से अशी भारतातील अनेक स्थळे ‘नाग’ शब्दावरून आलेली आहेत. त्यामुळे या प्रदेशांत नागवंशाची वस्ती होती असे मानण्यात येते.
कालिया, शेष, वासुकी, अनंत, तक्षक, कर्कोटक, ऐरावत, एलापात्र, धृतराष्ट्र हे नागातले उपवंश होते. नागा लोक यमुनेच्या खोऱ्यात इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर राहत असत. खांडववन हे नागवंशाचे मोठे वसतीस्थान होते. खण्डु म्हणजे खडीसाखरेसारखी गोड (वस्तू). नागवंश मध, मोह, ऊस यांचे उत्पादन करत असा अंदाज व्यक्त केला जातो.
मारूतीला लंकेत अनेक सुंदर नागकन्या दिसल्या असा रामायणात उल्लेख आहे. रामायण व महाभारत ही महाकाव्ये म्हणजे आर्याचा दक्षिण व पूर्व भारतातला वसाहतवाद अशा परिप्रेक्ष्यातून पाहता येईल. महाभारतातील श्रीकृष्णाच्या एकूण राजकारणाचे सूत्र उत्तर भारतातून नागवंशाला हाकलून लावणे हेच होते. श्रीकृष्णाचे नागवंशीयांशी असलेले वैमनस्य यमुनेच्या तीरी असलेल्या कालिया या नागांतल्या उपवंशापासून सुरू होते.
महाभारतातील खांडववनाचे दहन हे नागवंशाच्या हत्याकांडाचे क्रूर कांड आहे. खांडववनातील नागवंशीयांचे कृष्णार्जुनानी निर्दालन केले. तक्षक कुरुक्षेत्री गेल्यामुळे वाचला. तक्षकाच्या पुत्राचे रक्षण त्याच्या आईने स्वतःचे प्राण देऊन केले. मय नावाच्या नागवंशीयाला कृष्णार्जुनानी अभय दिले. मयाने इंद्रप्रस्थात मयसभा उभारून या उपकारांची परतफेड केली. नागवंशीय लोक वास्तुशिल्पकलेत पारंगत होते. आर्य लाकडी घरांत राहत असत तर नागवंशीय दगडी घरांत राहत असत.
नागाचे चिन्ह असलेला ध्वज (Totem) वापरत असल्यामुळे या वंशाला नागवंश संबोधले जाते. सर्प किंवा नाग या प्राण्याशी अन्यथा नागवंशीयांचा कोणताच संबंध नाही.
पांडवाचे व नागवंशीयांचे वैर पांडवाच्या चौथ्या पिढीपर्यंत चालले. कर्णार्जुन युद्धात तक्षकाचा पुत्र अश्वसेन कर्णाच्या बाणावर स्वार होऊन अर्जुनाला विषारी डंख करण्याचे कारस्थान करतो. कृष्णाच्या लक्षात ही गोष्ट आल्यामुळे कृष्ण रथाच्या घोड्याचे पाय दुमटून रथ खाली घेतो. त्यामुळे कर्णाचा बाण अर्जुनाच्या कंठाला न लागता त्याच्या मुकुटाला लागतो व अर्जुनाचा प्राण वाचतो. अभिमन्यु तक्षक-पुत्र बृहदकाला ठार मारतो.
खांडववनाचा सूड नागवंशीय अर्जुनाचा नातू परीक्षिताची हत्या करून घेतात. परीक्षिताचा पुत्र नागवंशीयांचे हत्याकांड करतो. यालाच ‘सर्पसत्र’ यज्ञ असे प्रतीकात्मक रूपाने म्हटले जाते. हे हत्याकांड तक्षशिला या शहरात झाले असे मानण्यात येते. नागवंशाची गुणसूत्रे असलेल्या आस्तिक ऋषीच्या मध्यस्थीनंतर जनमेजय हे सर्पकांड थांबवतो. आस्तिक हा वासुकी या नागवंशीय व जरत्कारू ही ब्राह्मण स्त्री यांचा पुत्र असतो.
क्षत्रिय व नागवंशीय यांच्या सख्याच्या, रोटीबेटी संबंधाच्या कथा आढळतात. देवांचा राजा इंद्र हा तक्षकाचा मित्र मानला जातो. कृष्णाचे इंद्राकडे असलेले वैर या संदर्भात लक्षात घ्यावे. अर्जुन व नागवंशीय राजकन्या उलुपी विवाहबद्ध होतात. त्यांच्या पुत्राचे नाव इरावन. भीमाला नागवंशीय जीवदान देतात.
नल - दमयंती आख्यानात कर्कोटक या नागवंशीयाचे नल राजाशी सख्य होते व कर्कोटक नलाला त्याचे राज्य मिळवून देतो.
मूळ कथेत नल राजा वणव्यात सापडलेल्या कर्कोटकाला वाचवतो. कर्कोटक एकम्, द्वितीयम् - अशी अंकमोजणी करत आपल्याकडे यायची विनंती नलाला करतो. नलाने ‘दश’ (दहा किंवा चाव हे दोन अर्थ ) म्हणताच कर्कोटक नलाला चावतो व त्याच्या शरीरात घुसलेल्या कलीला हाकलून लावतो.
पुराणात कद्रु व विनता या नागवंशीय बहिणीच्या भांडणाची कथा आहे तशीच जीमूतवाहन हे गरुडाचा ध्वज अरुणाचा (Totem) लोकांकडून नागवंशीयांचे रक्षण करतो ही कथाही आहे. नागवंशीय व बौद्ध तथा जैन धर्मीय तसेच नागवंशीय व हिंदू धर्मातील शैव व वैष्णव पंथ यांनी वेळोवेळी सख्य केलेले आहे. शिवाच्या गळ्यात नाग असणे, विष्णूने शेष नागावर शयन करणे या प्रतीकात्मक गोष्टी आपल्याला आढळतात. भारतीय शिल्पकलेत नागरूपाला प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे.
नागपंचमी हा सण श्रावण शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीच्या सहिष्णुतेचे हे प्रतीक आहे. हिंदू धर्माने नागाला पूज्य मानले आहे. म्हणजेच इतिहासाच्या उत्तरार्धात आर्य व नाग वैमनस्य संपले आहे यांचे द्योतक आहे.
कल्हणााच्या राजतरंगिणीत व बाणभट्टाच्या ‘कादंबरी’ त नागवंशीयांचा उल्लेख सापडतो. गिरीश कर्नाडच्या ‘नागमंडल’ नाटकात नागवंशीय राजा हे मुख्य पात्र आहे.
नागवंशीय हा प्रगत वंश असला पाहिजे. वास्तुशिल्प, नगरनियोजन, नौकानयन यात तो पारंगत होता. काश्मीरमध्ये एका झऱ्याला सुश्रावस नागाचे नाव दिले आहे. तिसऱ्या शतकात विशाङ हा ब्राह्मण सुश्रावस या नागवंशीय राजाच्या चित्रलेखा नावाच्या राजकन्येशी लग्न केले.
तक्षशिला हे शहर तक्षक या नागांच्या उपवंशाने वसवले असे मानले जाते. नगर हा शब्द नागावरून आला असावा असा कयास आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अस्पृश्य कोण होते?’ या आपल्या पुस्तकात नागवंशीयांचा उल्लेख केला आहे. हा वंश आदिवासी वा असभ्य नव्हता. त्याचा सांस्कृतिक दर्जा उच्च होता असे डॉ. आंबेडकर म्हणतात. पुढे नागवंशियांचा समावेश भारतीय दलितांत, त्यातही महार समाजांत झाला असे काही अभ्यासकांचे मत आहे.
स्वस्तिक या चिन्हाला हिंदूधर्मियांनी नागवंशीयांकडून घेतले असे मानले जाते. स्वस्तिक म्हणजे नर व मादी या दोन सर्पांचे एकीकरण होय.
राजा हर्षवर्धनाच्या ‘नागानंद’ नाटकात जीमूतवाहनाची कथा आहे. गुणाढ्याने पैशाच भाषेत लिहिलेल्या ‘बृहत्कथा’मध्ये नागवंशांचे उल्लेख सापडतात. क्षेमेंद्र या काश्मीर कवीचा ‘बृहत्कथामंजिरी’ हा ग्रंथ व सोमदेव भट्ट या काश्मिरी विद्वानाचा ‘कथासरित्सागर’ या दोन ग्रंथावरून आपल्याला गुणाढ्याच्या मूळ ‘बृहत्कथा’ या ग्रंथाची माहिती मिळते. कारण गुणाढ्याचा मूळ ग्रंथ अनुपलब्ध आहे.
जीमूतवाहनाच्या कथेत जीमूतवाहन वध्य शिलेवर गरुडाचे भक्ष्य (आहार) म्हणून बसतो यावरून शीलाहार या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. शीलाहार या वंशाचे नागवंशीयांशी नाते असावे असे मानले जाते. भोगावती शहर हे नागवंशीयांचे मानले जाते.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी मोहेंजोदोडोच्या अज्ञात लिपीचे कोडे सोडवणाऱ्यांना मोठे पारितोषिक ठेवले आहे. मोहेंजोदोडोच्या लिपीतून द्रविडी संस्कृतीवर उजेड पडेल, असा मुख्यमंत्री स्टॅलिनचा विश्वास आहे.
प्राचीन भारतातील नागवंशावर खूप संशोधन होण्याची गरज आहे. सध्या नागवंशावर उपलब्ध असलेली माहिती अपुरी आहे. प्राचीन भारतातील नागवंशीयांच्या इतिहासाचे उत्खनन झाले तर अनेक ऐतिहासिक सत्ये उजेडास येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.