Kadamba History: षष्ठदेवांनी चंद्रपूर जिंकले आणि 960 साली गोव्याचा कदंब राजवंश स्थापन केला; विजयादित्याचा सदाशिवगड ताम्रपट

Kadamba Dynasty: ताम्रपटांवरचे शिलालेख हे तांब्याच्या ताम्रपटावर कोरलेले कायदेशीर दस्तऐवज. ही ताम्रपटावर कोरण्याची प्रथा भारतीय उपखंडात व्यापक आणि दीर्घकाळ चालत आली आहे.
Kadamba copper plate inscriptions from Goa
Vijayaditya’s copper plate inscriptionDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

ताम्रपटांवरचे शिलालेख हे तांब्याच्या ताम्रपटावर कोरलेले कायदेशीर दस्तऐवज. ही ताम्रपटावर कोरण्याची प्रथा भारतीय उपखंडात व्यापक आणि दीर्घकाळ चालत आली आहे. ताम्रपटावर कोरलेले कायदेशीर दस्तऐवज देणगीच्या कृतीची नोंदणी आणि नोंद करत असत. म्हणजेच अनुदान किंवा देणगी, सामान्यतः जमीन किंवा सवलतीचे राज्यांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली जमिनीच्या मालकीची माहिती आणि कर आकारणीबद्दल नोकरशाही माहिती देत.

तांब्याच्या पाट्या अनिश्चित काळासाठी अबाधित राहू शकतात, लोहाप्रमाणे त्या गंजत नाहीत किंवा खराब होत नाहीत. उलट ताम्रपट एक संरक्षक थर विकसित करतो. असाच एक ताम्रपट कारवार येथील दिवाणी न्यायाधीश न्यायालयाचे लिपिक एच. व्ही. नाईक यांच्या संग्रही होता. नाईक यांचे कुटुंबीय कारवार मुख्यालयापासून चार मैलांवर असलेल्या सदाशिवगड येथे आहे आणि या ताम्रपटाच्या पाट्या तेथे वारसा म्हणून पडून होत्या. याच ताम्रपटाला ‘विजयादित्याचा सदाशिवगड ताम्रपट’ म्हणून ओळखले जाते.

या ताम्रपटाच्या गोलाकार कड्यात एकत्र गुंफलेल्या तीन तांब्याच्या पाट्या आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या पाट्याच्या आतील बाजूस आणि दुसऱ्याच्या दोन्ही बाजूंना कोरलेले आहे. शिलालेखाच्या पृष्ठभागावर उलटलेली शेपूट आणि त्याच्या समोर एक खंजीर असलेल्या सिंहाच्या आकृत्या आहेत.

वरच्या बाजूला स्वस्तिक आणि सूर्याच्या आकृत्या दिसतात. तसेच आख्यायिका श्रीविष्णुदासः आणि नंतर चंद्रकोर आहे. त्यावरचे लेखन बाराव्या शतकातील नागरीमध्ये आहे. या ताम्रपटांवरची लेखनाची सुरुवात शिवाला आवाहन करून होते. कदंब कुटुंबातल्या राजघराण्याची उत्पत्ती नेहमीच्या पद्धतीने सांगितल्यानंतर, पौराणिक नायक त्रिलोचन कदंबकडून, गोव्यातील कदंबांची संक्षिप्त वंशावळी दिली आहे.

चालुक्य राजकन्या मैलाला महादेवी यांच्या जयकेशिन दुसऱा याचे पुत्र शिवचित्त परमाडी आणि त्याचा धाकटा भाऊ विजयार्क किंवा विजयादित्य (द्वितीय) यांच्याशी येऊन ही वंशावळ थांबते. सदाशिवगड ताम्रपट विजयादित्याचा उल्लेख ‘गोव्याचा सत्ताधारी कदंब राजा’ म्हणून करतो.

देवी आर्या भगवतीला राजाने भेट म्हणून दिलेली जमीन नोंदवणे हा या ताम्रपटांचा उद्देश असावा. त्याच्या कुटुंबाच्या वर्णनावरून आणि संदर्भावरून असे दिसते की, या भेटीचा लाभार्थी गोविंद नावाचा भारद्वाज गोत्रातील ब्राह्मण होता, जो विज्ञानात व खगोलशास्त्राच्या अभ्यासात पारंगत होता. देणगीच्या कुटुंबाचे चार पिढ्यांचे वर्णन या ताम्रपटात आहे. ही या कुटुंबीयांना भेट म्हणून मालमत्ता मारुवटुगाडालूचा समावेश असलेल्या अरुविगे गावाच्या हद्दीत वसलेली होती.

या तांब्याच्या ताम्रपटावर कोरलेली तारीख अशा पुढील शब्दात व्यक्त केली आहे; ‘शक ११०२ , कार्तिक शु. १२, रविवार’. यानुसार ही भेट १४ ऑक्टोबर ११७९ रोजी देण्यात आली. ताम्रपटाचे महत्त्व त्याच्या अद्वितीय असण्यात आहे.

शिवचित्त परमाडी आणि विजयादित्य (द्वितीय) या दोन भावांच्या संयुक्त राज्यकारभाराचा उल्लेख करणारे शिलालेख तसेच त्या दोघांपैकी फक्त ज्येष्ठ असलेल्या पूर्वीच्या राजवटीचा उल्लेख करणारे अनेक शिलालेख सापडले आहेत. परंतु विजयादित्याचा स्वतंत्र शासक म्हणून उल्लेख करणारा कोणताही शिलालेख आजपर्यंत समोर आलेला नाही.

हळशी शिलालेखाच्या दुसऱ्या भागात विजयादित्याच्या राजवटीच्या वर्षाचा संदर्भ आहे. पण आधीच्या भागावरून हे स्पष्ट होते की, त्याचा भाऊ परमाडी त्यावेळी राज्य करत होता. त्यामुळे हा ताम्रपट पहिला आणि आतापर्यंत सापडलेला एकमेव शिलालेख आहे, जो विजयादित्यला स्वतंत्र राजा असल्याचे श्रेय देतो. याचे कारण असे दिसते की, या वेळेपर्यंत परमाडी कदंब राजा जिवंत नव्हते.

हळशी शिलालेखानुसार, विजयादित्य हा विष्णूचा भक्त होता आणि त्याला ‘विष्णुचित्त’ हे नाव होते. परंतु सध्याच्या या ताम्रपटातील शिक्क्यावरून असे दिसून येते की त्याने स्वतःचे वर्णन ‘विष्णुदास’ म्हणून करणे पसंत केले म्हणजे ‘भगवान विष्णूंचा नम्र सेवक’. शिलालेखात दोन ठिकाणांची नावे कोरलेली आहेत; एक म्हणजे मरुवाटुगाडालू किंवा मारुवटुगाडालू नावाचा प्रदेश आणि दुसरा त्यात वसलेले अरुविगे गाव.

मारुवटुगाडालू हा ‘मारु’, ‘वटु’ आणि ‘गाडालू’ या शब्दांनी बनलेला एक पूर्णपणे कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ ‘समुद्राला लागून असलेला किनारी प्रदेश.’ असा होतो ‘आरुविगे’ हे सध्याच्या काळातील ‘आरेगे’ या गावासारखेच नाव आहे. कारवारच्या आग्नेय दिशेस ४ मैलांवर, अंकोल्याच्या रस्त्यावर आरेगे गावात आर्यादुर्गा नावाच्या देवतेला समर्पित एक मंदिर आहे. ही देवता कदाचित देवी आर्या भगवतीचे प्रतिनिधित्व करते.

Kadamba copper plate inscriptions from Goa
Goa History: ..आणि पोर्तुगिज व्हॉइसरॉय थोडक्यात बचावला! छत्रपती संभाजी महाराजांची गोव्यातील पराक्रमाची गोष्ट

गोव्यातील कदंब हा भारतीय उपखंडातील एक प्रसिद्ध राजवंश होता. कदंब यांनी दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत गोव्यावर राज्य केले. त्यांनी शिलाहारांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि प्रथम चांदोर किंवा चंद्रपूर येथून राज्य केले. नंतर गोपकपट्टणला त्यांची राजधानी बनवले.

चालुक्यांचा एक सामंत म्हणून , चालुक्य राजा तैलप दुसरा याने कदंब षष्ठदेव यांना गोव्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त केले. सावईवेरे शिलालेखानुसार कदंब हे चालुक्यांचे सहयोगी होते; ज्यांना त्यांनी राष्ट्रकुटांचा पराभव करण्यास मदत केली. नंतर षष्ठदेवांनी शिलाहारांकडून चंद्रपूर शहर जिंकले आणि ९६०साली गोव्याचा कदंब राजवंश स्थापन केला.

Kadamba copper plate inscriptions from Goa
Goa Cultural History: परशुरामाने ‘शांतादुर्गा’ दैवत गोव्यात आणले? प्रदूषण फैलावणारी विधाने

राजा षष्ठदेवाने गोवा, गोपकपट्टण बंदर आणि कपर्दिकाद्वीप जिंकले आणि दक्षिण कोकणचा मोठा भाग आपल्या राज्यास जोडला. ज्यामुळे गोपकपट्टण त्याची उप-राजधानी बनली. पुढचा राजा जयकेशी (प्रथम) याने गोव्याचा आणखी विस्तार केला. ‘द्वैयाश्रय’ या जैन संस्कृत ग्रंथात त्याच्या राजधानीच्या विस्ताराचा उल्लेख येतो.

गोपकपट्टण बंदराचे झांझिबार, बंगाल, गुजरात आणि श्रीलंकेशी व्यापारी संबंध होते असेही वर्णन त्यात आहे. गोपकपट्टण हे जुन्या गोव्याशी जोडलेले एक राजबिंडे व व्यावसायिक शहर होते. ‘व्यापारी केंद्र’ म्हणून या शहराची ख्याती जवळपास ३०० वर्षांहून अधिक काळ अबाधित होती. १३२०च्या दशकात खिलजी सेनापती मलिक काफूरने ते लुटले. कदंब चांदोरला परत गेले, परंतु मुहम्मद बिन तुघलकने चांदोरवर विजय मिळवला तेव्हा ते गोपकपट्टणला परतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com