

मडगाव: गोव्यातील राष्ट्रीय सॅपेकटॅकरो स्पर्धेसाठी आलेले भारतीय सॅपेकटॅकरो महासंघाचे अध्यक्ष तथा जागतिक महासंघाचे उपाध्यक्ष योगेंदर सिंग दहिया आणि त्यांचे सहकारी वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू तथा रेफ्री अंकित कुमार बलियान हे मंगळवारी (ता. ४) दिल्लीला परत जाणार होेते. सकाळी ११.२० वाजता त्यांचे विमान होते; परंतु त्यापूर्वीच त्यांचा (सोमवारी रात्री) बांबोळी येथे अपघातात दुर्दैवी अंत झाला, अशी माहिती गोवा सॅपेकटॅकरो संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांनी दिली.
कवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिया आणि बलियान हे दोघेही गोव्यात राष्ट्रीय स्पर्धेसाठी आले हाेते. ही स्पर्धा संपल्यानंतर गाेव्यातच सॅपेकटॅकरोचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर सुरू असून या शिबिराची पाहणी करण्यासाठी ते दोघेही गोव्यात राहिले होते.
मडगावात कोकण रेल्वे स्थानकाजवळच्या एका हॉटेलमध्ये ते दोघे उतरले होते. सोमवारी रात्री पणजीत डिनरसाठी ते गेले होते. डिनर आटोपून परत येताना ही भयंकर दुर्घटना घडली.
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर कवळेकर यांनी सहकाऱ्यांसह गोमेकॉत धाव घेतली. बांबोळी येथे भरवेगात असलेला टँकर चुकीच्या बाजूने येऊन या दोघांच्या गाडीवर आपटला. त्यामुळेच हा भीषण अपघात झाला, असे कवळेकर यांनी सांगितले.
बाबू कवळेकर यांनी जेव्हा ही माहिती दिली, त्यावेळी दाेन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन्ही मृतदेह विमानाने दिल्लीला नेण्यात येतील, असे कवळेकर यांनी सांगितले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच विमानातून कवळेकर दिल्लीला जाणार आहेत, अशी माहिती मिळाली.
सोमवारी रात्री दहिया आणि बलियान हे दोघेजण मारुती इग्निस (जीए-०८-व्ही-७६७४) या कारमधून ते पणजीहून मडगावला निघाले होते. टँकरने विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर घुसून कारला समोरून जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. टँकरचालक राहुल सरवदे याला जुने गोवे पोलिसांनी अटक केली.
या भीषण अपघातामध्ये मारुती इग्निस कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१ (बेपर्वाईने वाहन चालवून जीव धोक्यात घालणे) आणि १०५ ( सदोष मनुष्यवध) कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
योगेंदर सिंग दहिया आणि अंकित कुमार बलियान या दोघांचा बांबोळी येथे अपघाती मृत्यू झाल्यामुळे सॅपेकटॅकरो महासंघावर दु:खाचे सावट पसरले आहे. गोवा सॅपेकटॅकरो संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांनीही या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.