America Iran conflict history Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

America Iran Conflict: "हे युद्ध आपण का लढतोय हे खुद्द अमेरिकेलाही नीट कळलेले नाही"; ‘घाशीराम’ जागतिक सत्तापटलावरचे

America Iran conflict history: आपल्या बुडाला आग लागली असतानाही दुसऱ्यांची घरे पेटवण्याचा चंग बांधलेल्या अमेरिकेने इराणविरोधात दंड थोपटून अजून एका युद्धात भाग घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कौस्तुभ नाईक

आपल्या बुडाला आग लागली असतानाही दुसऱ्यांची घरे पेटवण्याचा चंग बांधलेल्या अमेरिकेने इराणविरोधात दंड थोपटून अजून एका युद्धात भाग घेतला आहे. अमेरिकेच्या ह्या सततच्या युद्धावर जाण्याला आता अमेरिकन नागरिकही कंटाळले आहेत. हे युद्ध तर आपण का लढतोय हे खुद्द अमेरिकेलाही नीट कळलेले नाही.

अमेरिकेच्या ह्या दादागिरीमागे साम्यवादाविषयीची एक खोलवर रुजलेली भीती दडलेली आहे. जगभरात उदारमतवादी लोकशाही प्रस्थापित करण्याचा ठेका अमेरिकेने घेतला याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील भांडवलाचा प्रवाह सुरळीत चालू राहावा ही त्यांची धडपड होती.

शीतयुद्धाच्या समाजवादी विचारांची त्यांना एवढी धास्ती वाटे की आजही ते त्यातून बाहेर पडलेले नाहीत. सोव्हियेतला हूल देण्याच्या नादात नसती झेंगाटं अमेरिकेने आपल्यावर ओढून घेतली आणि त्याचा प्रभाव केवळ आजही दिसून येतो.

गेली अनेक दशके अमेरिकेतील उच्चभ्रूंनी ‘रेड स्कॅर’ या संकल्पनेचा वापर करून देशांतर्गत विरोध कायमचा चिरडून टाकला आहे. जेव्हा जेव्हा तिथल्या उपेक्षित आणि कष्टकरी वर्गाने आर्थिक न्यायाची किंवा हक्काची मागणी केली तेव्हा सर्व गोष्टींना थेट अमेरिकेची व्यक्तिकेंद्री जीवनशैलीस धोका ठरवून मोडीत काढण्यात आले.

आपल्याच देशातील कामगार वर्गाने नफ्यातील रास्त वाटा मागायला सुरुवात केली तर परदेशी बाजारपेठांमधील लूट अबाधित ठेवणे अशक्य होईल हे अमेरिकेला पक्के ठाऊक होते.

भांडवलशाही आणि साम्राज्यशाही टिकवण्याच्या या अट्टहासाचा फटका केवळ अमेरिकन कामगार वर्गालाच बसला नाही, तर त्याने संपूर्ण जगात अस्थिरता आणि हिंसेचे एक दुष्टचक्र निर्माण केले.

विजय तेंडुलकर यांनी जेव्हा ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक लिहिले, तेव्हा ते मुंबईतील कम्युनिस्ट चळवळ चिरडून काढण्यासाठी कॉंग्रेसने पद्धतशीरपणे वाढवलेल्या शिवसेनेवरील एक राजकीय भाष्य मानले गेले. या नाटकाचे मर्म हेच की प्रस्थापित सत्ताधीश नेहमीच आपले शत्रू संपवण्यासाठी असे ‘घाशीराम’ निर्माण करतात.

त्यांना मोकाट सोडतात व आपल्याला हवी ती हिंसा त्यांच्याकडून करवून घेतात. पण कालांतराने हेच घाशीराम एवढे मोठे होतात की ते थेट सत्ताधीशांनाच आव्हान देऊ लागतात आणि मग त्याच सत्ताधीशांना या घाशीरामांचा खात्मा करावा लागतो. जिथे जिथे अमर्याद सत्तेची केंद्रे तयार झाली तिथे असे घाशीरामही तयार झाले. भारतातही आपल्याला हे नजीकच्या काली दिसेल ह्यात शंका नसावी.

आजच्या जागतिक राजकारणात अमेरिका हा अशा ‘घाशीरामांचा’ सर्वात मोठा निर्माता आहे. सोव्हिएत युनियनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि आपली साम्राज्यवादी लालसा अबाधित ठेवण्यासाठी अमेरिकेने जगभरात केलेल्या क्रूर हस्तक्षेपांना कायम लोकशाहीच्या रक्षणाचा मुलामा दिला.

१९५३साली जेव्हा इराणचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान मोहम्मद मोसादेघ यांनी पाश्‍चिमात्य देशांच्या नियंत्रणाखालील ‘अँग्लो-इराणीयन ऑईल कंपनी’चे राष्ट्रीयीकरण करण्याचे धाडस दाखवले, तेव्हा त्यांची सत्ता उलथवून त्यांच्या जागी अमेरिकेने शहाची हुकूमशाही प्रस्थापित केली.

या शहाने पाश्‍चिमात्य बाजारपेठांना स्वस्तात तेल पुरवले, पण आपल्याच जनतेवर अनन्वित अत्याचार केले. याच क्रूर दडपशाहीचा स्फोट पुढे १९७९च्या इस्लामिक क्रांतीमध्ये झाला आणि अयातोल्लाह सत्तेवर आले. केवळ तेलाच्या मक्तेदारीसाठी अमेरिकेने एका धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा बळी घेतला आणि त्यातूनच आपला सर्वांत मोठा शत्रू निर्माण केला. अमेरिका इराण शत्रुत्वाचे मूळ ह्यात आहे.

याच वेडापायी अमेरिकेने अल-कायदासारख्या भस्मासुरालाही जन्म दिला. आज लोक इस्लामिक दहशतवादाच्या नावाने गेले काढतात पण त्याला जन्म देण्याचे श्रेय अमेरिकेला जाते.

अफगाणिस्तानात जेव्हा डाव्यांचे धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत आले तेव्हा १९८०च्या दशकात सीआयएने अब्जावधी डॉलर्स आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे अफगाणिस्तानातील मुजाहिदीनांना पुरवली. यामागे अफगाण जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा कोणताही उदात्त हेतू नव्हता. सोव्हिएत युनियनला जेरीस आणण्यासाठी खेळली गेलेली ही केवळ एक खेळी होती.

अमेरिकन सरकारने जाणीवपूर्वक या मूलतत्त्ववादी गटांना पोसले आणि त्यांना कट्टरपंथी बनवले. अमेरिकेने पोसलेल्या याच मुजाहिदीनांचे रूपांतर तालिबान आणि अल-कायदामध्ये झाले आणि त्याचाच शेवट ११ सप्टेंबरच्या ट्विन टॉवर्सवरील हल्ल्यात झाला.

अमेरिकन युद्धयंत्रणेचा हा सर्वांत मोठा विरोधाभास आहे की ती कायम स्वतःचे शत्रू स्वतःच निर्माण करते. मानवी सार्वभौमत्वापेक्षा भांडवलाचा प्रवाह वाहता ठेवण्यास, तिथल्या भांडवलदारांस नवीन बाजारपेठा व संसाधने मिळवून देण्यास प्राधान्य देऊन अमेरिकेने आजच्या अनेक जागतिक संकटांची बीजे स्वतःच पेरली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT