Humility vs Ego In Professional Growth Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Humility vs Ego In Professional Growth: "मीच केले"चा अहंकार सोडा, इतरांचे श्रेय लाटण्यापेक्षा कष्टाची पावती द्या; सुसंस्कृत जगण्याचा मोलाचा धडा

acknowledging others contribution marathi suvichar: आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या काळात प्रत्येकालाच पुढे जायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कविता आमोणकर

दुसऱ्याच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्यापेक्षा त्याच्या योगदानाची योग्य दखल घेणे हा प्रामाणिकपणाचा भाग आहे. हा सुविचार जेव्हा वाचला, तेव्हा हा सुविचार केवळ एक सुंदर वाक्य नाही, तर तो आपल्या जगण्याचा, नात्यांचा आणि सामाजिक वर्तनाचा एक महत्त्वाचा आरसा आहे, हे मनोमन पटले. आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या काळात प्रत्येकालाच पुढे जायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे आहे.

या धावपळीत अनेकदा आपण स्वतःच्या कर्तृत्वाचा गाजावाजा करताना इतरांच्या कष्टांकडे, सहकार्याकडे किंवा अदृश्य योगदानाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. हे ''मीच केले'', ''माझ्यामुळेच हे शक्य झाले'' अशी भावना मनात डोकावू लागली की प्रामाणिकपणाची पातळी घसरू लागते आणि अहंकाराची सावली पडायला लागते. अशा वेळी दुसऱ्याच्या यशाचे श्रेय स्वतःकडे ओढून न घेता, ज्याने खरोखर मेहनत घेतली आहे, त्याच्या योगदानाची मनमोकळेपणाने दखल घेणे, हा खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाचा आणि मनाच्या मोठेपणाचा भाग ठरतो.

कोणतेही यश हे एका रात्रीत किंवा केवळ एका व्यक्तीच्या बळावर उभे राहत नाही. त्यामागे अनेक दिवसांची, महिन्यांची किंवा वर्षांची तपश्चर्या असते. रात्री-अपरात्री जागून घेतलेले कष्ट, अपयशाच्या काळात न डगमगता टिकवलेली जिद्द, पुन्हा पुन्हा उभे राहण्याची चिकाटी आणि अनेकदा कुटुंबीयांचे, सहकाऱ्यांचे, मार्गदर्शकांचे किंवा मदतनीसांचे असलेले भक्कम सहकार्य या सर्वांचा त्यात वाटा असतो. एखाद्या प्रकल्पाचा, कार्यक्रमाचा, व्यवसायाचा किंवा वैयक्तिक यशाचा मुकुट जेव्हा कोणाच्या डोक्यावर चढतो, तेव्हा त्या मुकुटातील प्रत्येक खड्यामागे कोणाच्या तरी घामाचा थेंब लपलेला असतो. या कष्टांचा आदर करणे म्हणजेच समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करणे होय.

आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जिथे आपल्याला हा प्रामाणिकपणा दाखवण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, घरातील एखादा सण, मोठा समारंभ किंवा कौटुंबिक कार्यक्रम घ्या. आपण पाहुण्यांचे स्वागत करताना, सुंदर सजावट पाहताना किंवा रुचकर जेवणाचे कौतुक करताना अनेकदा मुख्य यजमानांचे किंवा नियोजकांचे नाव घेतो. पण त्या कार्यक्रमाची तयारी करताना जो दिवसभर राबला, भाजी निवडण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत किंवा ताटांपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्ट सांभाळणारा मदतनीस किंवा घरातील एखादा शांतपणे काम करणारा सदस्य असतो, त्याच्या कष्टांची दखल आपण घेतो का? जेव्हा आपण पाहुण्यांसमोर स्पष्टपणे सांगतो की, "हा स्वयंपाक आणि ही सगळी व्यवस्था या व्यक्तीच्या अथक मेहनतीमुळेच इतकी छान जमून आली," तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान अवर्णनीय असते. त्यामुळे आपले महत्त्व अजिबात कमी होत नाही; उलट आपली कृतज्ञता आणि संवेदनशीलता अधिक ठळकपणे समोर येते.

असेच दुसरे उदाहरण कार्यालयीन किंवा व्यावसायिक जीवनातील घेता येईल. एखाद्या टीमचा प्रकल्प यशस्वी होतो, एखादी मोठी डील पूर्ण होते किंवा एखादा अहवाल उत्कृष्ट तयार होतो. अनेकदा प्रमुख व्यक्ती किंवा टीम लीडर संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेतात किंवा टीमच्या नावाखाली स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. मात्र, या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष डेटा गोळा करणारा, तासन् तास संगणकासमोर बसून मांडणी करणारा, तांत्रिक अडचणी सोडवणारा किंवा पडद्यामागून सतत साथ देणारा कनिष्ठ सहकारी असतो. जर वरिष्ठांनी किंवा नेतृत्वाने बैठकीत किंवा व्यवस्थापनासमोर त्या सहकाऱ्याचे नाव घेऊन त्याच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला, तर त्या सहकाऱ्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. एवढेच नाही, तर संपूर्ण संघात विश्वासाचे आणि आदराचे वातावरण निर्माण होते. "हा माणूस आपल्या कामाची कदर करतो," ही भावना टीममधील प्रत्येकाला अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देते.

रोजच्या जीवनातील आणखी एक छोटेसे पण बोलके उदाहरण म्हणजे अभ्यासाचे किंवा स्पर्धेचे. एखादा विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत चमकतो किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवतो. कधीकधी पालक किंवा शिक्षक स्वतःच्या मार्गदर्शनाचा इतका गाजावाजा करतात की विद्यार्थ्याचे स्वतःचे कष्ट मागे पडतात. याउलट, जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मित्राने किंवा मैत्रिणीने एखादा कठीण विषय समजावून दिला असेल, नोट्स शेअर केल्या असतील किंवा परीक्षेच्या आधी मानसिक आधार दिला असेल, तर त्या मित्राचे आभार मानण्यात कोणताही कमीपणा नसतो. उलट, माझ्या या यशात माझ्या मित्राची साथ खूप मोलाची ठरली, असे प्रामाणिकपणे सांगणारा विद्यार्थी अधिक प्रगल्भ आणि सुसंस्कृत ठरतो.

दुसऱ्याच्या कामाचे कौतुक केल्याने आपले महत्त्व कधीच कमी होत नाही; हा गैरसमज समाजातून दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याकडे अशी एक चुकीची समजूत रूढ झालेली दिसते की, दुसऱ्याला मोठे केले किंवा त्याच्या कामाची प्रशंसा केली, तर आपली किंमत कमी होईल, आपले स्थान धोक्यात येईल किंवा समोरचा आपल्यापेक्षा वरचढ ठरेल. प्रत्यक्षात याच्या अगदी उलट घडते. जो दुसऱ्याचे कौतुक करण्याइतके मन मोठे ठेवतो, तो स्वतःच अधिक उंचीवर जातो.

प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांचा आदर करणे ही चांगल्या विचारांची आणि सुसंस्कृत मनाची खूण आहे. प्रत्येकालाच सारखे यश मिळेल असे नाही; काहींचे प्रयत्न मोठे असतात, तर काहींचे छोटे. काहींना वेगाने यश मिळते, तर काहींना उशिरा. पण प्रयत्न करणे, प्रामाणिकपणे झटणे याला स्वतःचे एक मूल्य आहे. एखाद्याने केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही, तरी त्याने घेतलेली मेहनत वाया जात नाही. त्या प्रयत्नांचा सन्मान करणे म्हणजे माणसातील धडपडीला, त्याच्या उमेदीला दिलेली दाद असते. जेव्हा आपण दुसऱ्याच्या प्रयत्नांची दखल घेतो, तेव्हा आपण त्याला एक प्रकारची उभारी देत असतो. ''तू केलेला हा प्रयत्न चांगला होता, पुढच्या वेळी नक्की यश मिळेल,'' असे शब्द कोणाच्याही आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतात.

आपण जेव्हा आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी देतो किंवा जेव्हा जेव्हा एखाद्या यशाचा भाग होतो, तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे की, या यशात माझा खरा वाटा किती आणि इतरांचे कष्ट किती? जर प्रामाणिकपणे उत्तर शोधले, तर अनेक नावांची, चेहऱ्यांची आणि कष्टांची आठवण येईल. ती नावे केवळ मनात न ठेवता, ती शब्दांतून, कृतीतून व्यक्त करणे म्हणजेच प्रामाणिकपणाचा धर्म पाळणे होय. दुसऱ्याच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याऐवजी त्याच्या योगदानाची योग्य दखल घेतल्यास आपले जीवन अधिक समृद्ध, निर्मळ आणि अर्थपूर्ण होईल. कारण खरे यश हे दुसऱ्याला सोबत घेऊन पुढे जाण्यात आणि त्याच्या कष्टांचा सन्मान करण्यातच दडलेले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Ketu Gochar 2026: करिअर, पैसा आणि प्रगती! 25 नोव्हेंबरला राहु-केतु गोचर; ‘या’ 5 राशींसाठी सुवर्णकाळ

Sindhudurg News: बेकायदेशीर दारू विक्रीचा पर्दाफाश! मालवणमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त, एकावर कारवाई

Indian Super League: चर्चिल ब्रदर्सची अखेरपर्यंत कडवी झुंज, पण मोहन बागानचा 2-1 ने विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

राड्याचीच चर्चा..! IND vs PAK सामन्यातील 'त्या' 5 प्रसंगांनी वाढवलं मैदानावरचं तापमान; हर्षित राणाला घेरणाऱ्या पाकड्यांशी भिडला टीम इंडियाचा कॅप्टन Watch Video

Goa Politics: सासष्टीत काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीशिवाय पर्याय नाही; नावेली, बाणावली, नुवेत आव्हान अधिक कठीण

SCROLL FOR NEXT