डॉ. मधु घोडकिरेकर
जेव्हा दुर्घटना घडते व काळ घाला घालतो तेव्हा आपण यास कारणीभूत ठरलो, असे त्याचे शल्य कायमस्वरूपी सोबत राहते. अशातच मृतांच्या आप्तांनी संशय व्यक्त केला, की जो मनस्ताप तयार होतो, त्यात ‘त्याच्याबरोबर मी पण मेलो असतो तर बरे झाले असते’ ही नैराश्य निर्माण करणारी स्वयंदोषाची भावना तयार होते, जी आजन्म सोबत राहते.
मागच्या आठवड्यात मी, ‘अकाली-अपघाती निधनाच्या स्वकियांना आजन्म वेदना’ हा विषय हाताळला होता. या लेखास समाजमाध्यमात म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही, पण बऱ्याच जणांनी फोन करून, या विषयावर समाज प्रबोधन व्हायला हवे, असे सुचविले. या सूचनांचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत बरेच जास्त होते. ‘नेटकऱ्यां’ना हा विषय तेवढा महत्वाचा का वाटला नसावा, याचे कारण ‘आम्हाला (म्हणजे युजर्सना) तरी असा अनुभव आलेला नाही’ या मानसिकतेत ते असावेत.
परवा वास्कोतील जुळे सख्खे भाऊ कुळे परिसरात बुडाले तेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिक्रिया विचारली तर त्यांनी ‘आपण लोकाना सांगून सांगून कंटाळलो आहे’ अशी नेमकी प्रतिक्रिया दिली. काल मुख्यमंत्र्यांच्याच परिसरातील सहा युवक चक्क जलवनात अडकले. या युवकांतील एका युवकाच्या मातेने आपल्या अनुभवावरून इतर पालकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मागचा विषय पुढे नेऊया.
मी मृत्यूची आकडेवारी देणे शक्यतो टाळतो, त्या ऐवजी मृत्यूप्रमाण सांगतो. जेव्हा आम्ही अकाली मृत्यू म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ, आयुष्यमान सरासरीच्या बऱ्याच आधी मृत्यू असा होतो. आता अकाली मृत्यू हा नैसर्गिक असू शकतो किंवा अनैसर्गिक. (हल्लीच्या काळातील अकाली नैसर्गिक मृत्यूचे वाढते प्रमाण हा स्वतंत्र चिंतेचा विषय असून त्यावर वेगळ्या पद्धतीच्या जनजागृतीची वेगळी गरज आहे.)
अनैसर्गिक मृत्यूंत, घातपात, अपघात व आत्महत्त्या असे तीन प्रकार असतात. अपघाती मृत्यूत, वाहन (जमीन व आकाश) संबंधित अपघात व इतर अपघात असे सरळ दोन प्रकार असतात. आकाशातील वाहन अपघात म्हणजे विमान अपघाताविषयी आम्हा सामन्यांच्या हाती काही नसते, त्यामुळे त्यावर सावधगिरी बाळगण्यासारखे काही नसतेच. (माझ्या परिचयात असे काहीजण आहेत, विमान अपघातात कुणीच शिल्लक राहत नाहीत, म्हणून विमान प्रवास करीत नाही.) अपघात व आत्महत्त्या यात फरक करणे कधी कधी गोंधळाचे असते.
उंचीवरून घसरूनही पडू शकतो किंवा स्वतःहूनही उडी मारू शकतो. तीच गत पाण्यात बुडून मरण्याची. सहलीला गेलेल्याचा पाण्यात बुडून मृत्यू होतो, तेव्हा सामन्यत: अपघात असतो पण अपवादात्मक परीस्थितीत घातपात. पोलिस तपास ‘अपघात’ अशा शेऱ्याने संपतो पण तो खरेच ‘अपघात होता की आणखी काहीतरी’ अशी बोचरी शंका स्वकियांच्या मनात कायम स्वरूपी राहते, कसे ते स्वनुभावरून सांगतो.
हा अनुभव तसा जुन्या प्रकारणावरतीच आहे, पण आजचा विषय संदर्भ ‘सहली दरम्यान होणारे मृत्यू व त्यातून सहलीला गेलेल्या उर्वरीत सहकाऱ्याविरुद्ध निर्माण होणारे संशयाचे ढग’ असा आहे. माझ्या माहितीत, आधी रायबंदर होडी दुर्घटना (ज्यात आमची एक चुलत बहीण गेली) व नंतर मडकई होडी दुर्घटना, असे अपघात सोडल्यास एकत्रितपणे तीन चारजणांना एकाचा वेळी एकाच जागी जलसमाधी मिळाली असे होत, असे.
काल सत्तरीत घडलेला प्रकार ऐकला व सहा सात वर्षांपूर्वी कारवार येथील नागरमणी धबधब्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या (ज्यात माझा सख्खा मेहुणा गेला). देवाचे आभार की, कालच्या घटनेत असे काही झाले नाही, प्रसंग समान होता, मागाहून होणारे परिणाम समान झाले असते. त्यावेळचा प्रसंग असा होता, की चतुर्थी नुकतीच होऊन गेली होती, मेहुण्याच्या जुन्या कॉलेज मित्रांनी एक विकेंड सहल आयोजित केली होती. त्यावेळी त्याने त्याना ‘आपल्याला दुसरे काम असल्याने मी येऊ शकणार नाही’ असे कळविले होते.
त्यांचे ‘दुसरे काम’ प्रत्यक्षात माझेच काम होते. पुढील महिन्यात माझी एक राष्ट्रीय परिषद गोव्यात भरणार होती, त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या निवास व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी आम्ही एका पंचाताराकित हॉटेलला भेट देणार होतो. त्या कामासाठी तो दिवस बऱ्याच आधी ठरला होता , म्हणून त्यांनी त्यांना आपण उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. अर्थात याविषयी मला त्यावेळी या सहलीविषयी मला माहिती नव्हती.
अचानक त्या आधल्या रात्री गोव्यात मोठी पर्जन्यवृष्टी झाली व पावसात गाडी चालवायला नको म्हणून आम्हा दोघांमधील नियोजित कार्यक्रम मी रात्री आठ वाजता रद्द केला. लगेच त्यांनी आपल्या मित्रांना, मी पण तुमच्यासोबत येतो, असे कळविले. हे सगळे घडताना, त्याला ‘आपण उद्या मित्रांसोबत सहलीला जाणार’ असे आपल्या कुटुंबीयांना सांगेपर्यंत रात्री उशीरच झाला.
पुढे, जेव्हा दुर्घटनेची मागाहून चर्चा व्हायला लागली, हल्लीच्या काळात सोबत सहलीला न गेलेल्या या मित्रांसोबत तो तेथे पोहोचलाच कसा, यावर तर्कवितर्क जोडले जाऊ लागले. मला जरी सत्य माहीत होते पण ‘गावाची तोंडे बंद करणे’ माझ्या हातात नव्हते.
मला वाटते की, दुपारच्या दरम्यान तेथील धबधब्यावर पोहोचले.
याच्याकडे जेवणाचे डबे असल्याने, इतर मित्र आधी पाण्यात उतरले, त्यातील दोघेजण आंघोळ आटोपून वर आले व याच्याकडील जेवणाचे डबे आपणाकडे घेतले व हे पाण्यात उतरले. नेमके तेव्हाच एक पाण्याचा भला मोठा लोट धबधब्यावरून चालून आला व तेथे पाण्यात असलेल्या दहा-बारा जणांना सोबत घेऊन गेला, त्यातील चार पाचजण सुदैवी ठरले तर पाचसहा दुर्दैवी. तेथे गोव्यातील चार पाच सहल गट होते व त्यातील दोन गटांतील काहीजण पाण्यात होते.
हे एवढे पाणी काही मिनिटांसाठीच कसे आले, याचे समाधानकारक कारण कारवार पोलिसांनी कधी दिले नाही किंवा गोवा प्रशासकीय स्तरावरून तशी कर्नाटक सरकारकडे कुणी विचारणा केली नाही. असे सांगितले जाते, की दूरवर कुठल्यातरी धरणाची दारे तपासण्याचे काम चालू होते व त्यातून हे अचानक पाणी खाली आले होते, खरे खोटे देव जाणे. येथे मात्र, त्या मित्रांना गावात बोलावून जाब विचारायची खुमखुमी गावकऱ्यांना होती, पण तसे होऊ दिले नाही.
या घटनेचा बोध हा की वाहन, पाणी व आग यांच्या पाचवीला मृत्यू नेहमी पूजलेला असतो. जेव्हा आपण सहलीला निघतो तेव्हा त्यांना सोबत घेऊनच जात असतो. जेव्हा आपण एक दहाजण एकत्र जातो, तेव्हा कुणाचा काळ कुठे वाट बघत असतो, हे कुणालाच माहीत नसते. जेव्हा दुर्घटना घडते व काळ घाला घालतो तेव्हा आपण यास कारणीभूत ठरलो याचे शल्य कायमस्वरूपी सोबत राहते.
अशातच मृतांच्या आप्तांना संशय व्यक्त केला, की जो मनस्ताप तयार होतो, त्यात ‘त्याच्याबरोबर मी पण मेलो असतो तर बरे झाले असते’ ही नैराश्य निर्माण करणारी स्वयंदोषाची भावना तयार होते, जी आजन्म सोबत राहते. जलसफरीचे फॅड कमी करायचे असेल तर पाल्य व थोरा मोठ्यांचे पालक, यांना अशा दूरगामी धोक्याविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यावर दोषारोप करण्यापेक्षा आम्हा सर्वांच्या दारात अकाली मृत्यूचे धबधबे नित्य उभे आहेत, याचे वास्तव स्वीकारायला हवे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.