Goa Konkani Theatre Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Konkani Theatre: कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीने टाकले सुवर्णमहोत्सवी पाऊल; 50 वर्षांचा सांस्कृतिक प्रवास

50 Years Of Konkani Theatre Competition: काही वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ८ जुलै १९७६ रोजी कला अकादमी गोवातर्फे पहिल्या कोकणी राज्य नाट्य स्पर्धेची पायाभरणी झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

विकास कांदोळकर

गेली पन्नास वर्षे कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकांची संख्या मोजत आत्मसंतुष्ट न होता, कोकणी अस्मितेच्या गुणवत्तेचा, सिद्धांतांचा आणि सौंदर्यशास्त्राचा आलेख तपासणे आज अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात गरज आहे, ती कला अकादमीसारख्या पायाभूत सुविधांचे ‘सरकारीकरण’ सोडून पुनरुज्जीवन करण्याची, जागतिक सिद्धांतांची ‘गोंय’च्या मातीशी योग्य सांगड घालण्याची आणि ‘गोंयकार’ कलाकार-प्रेक्षक यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याची.

काही वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ८ जुलै १९७६ रोजी कला अकादमी गोवातर्फे पहिल्या कोकणी राज्य नाट्य स्पर्धेची पायाभरणी झाली. आज ५० वर्षे पूर्ण होत असताना, ही रंगभूमी केवळ प्रादेशिक मनोरंजनाचे साधन न राहता, ती गोमंतकीय अस्मितेची, इथल्या मातीची आणि जागतिक रंगमंचाशी संवाद साधू पाहणारी एक सशक्त सांस्कृतिक हुंकार बनली आहे.

कोकणी भाषेला स्वतःचे हक्क मिळवून देण्यासाठी झालेल्या संघर्षाचा आणि या रंगभूमीचा जवळचा संबंध आहे. सुरुवातीच्या काळात स्वतंत्र संहितांच्या अभावामुळे इतर भाषांतील नाटकांचे अनुवाद केले जात. मात्र, स्पर्धात्मक आव्हानाने ‘गोंयकार’ लेखकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन स्वतंत्र कोकणी संहितांची संख्या वाढू लागली.

गेल्या पन्नास वर्षांत कोकणी नाटकांनी लेखन, सादरीकरण, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना अशा विविधांगी विषयांत प्रगती साधत, सुरुवातीस कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर सीमित असलेल्या कोकणी रंगभूमीला, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक तसेच जागतिक मानवी मूल्यांवर मत मानण्यास प्रवृत्त करत, सौंदर्यशास्त्र, नाट्य सिद्धांत आणि जागतिक आव्हानांचा वेध घेण्यास सिद्ध केले.

कोकणी रंगभूमीला वैचारिक समृद्धता मिळवून देण्यात पुंडलिक नाईक, एन. शिवदास, प्रकाश थळी, डॉ. प्रकाश वजरीकर, विष्णू वाघ, मुकेश थळी, यांसारख्या अनेक प्रतिभावान लेखकांचा समावेश आहे. या लेखकांनी कोकणी माणसाच्या जगण्याचे वास्तव, स्त्रीवादी दृष्टी, सामाजिक विषमता, अंधश्रध्दा, कौटुंबिक नातेसंबंध, संशोधन यावर भाष्य केले.

कोकणी स्पर्धात्मक रंगभूमी केवळ मनोरंजनात्मक नाही, तर ती जागतिक नाट्य सिद्धांतांच्या चौकटीत चपखल बसणारी आहे, असे दिसून आले. अंतोनिन आर्तो यांच्या ‘थिएटर ऑफ क्रुअल्टी’ची आठवण करून देणारे, समाजव्यवस्थेतील क्रूर वास्तव आणि मानवी मनातील अंधारे कोपरे कोकणी नाटककारांनी प्रेक्षकांसमोर अत्यंत उघडेपणाने मांडले आहेत, जे प्रेक्षकाला अंतर्मुख करते. ब्रेख्तच्या अलिप्ततेच्या सिद्धांताशी साधर्म्य दर्शवणारी पद्धत कोकणी स्पर्धात्मक नाटकांत हाताळली गेली.

ज्यामुळे नाटकाच्या मुख्य कथानकातून प्रेक्षकाला अलिप्त करून विचार करण्यास प्रवृत्त केले. कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीवर ‘स्तेनिस्लौसकी’ पद्धत पण दिसून येते. गोव्याच्या संस्कृतीला सौंदर्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हटल्यास अतिशोयक्ती ठरू नये. गोंयकारांचा ‘सुशेगाद’ स्वभाव जीवनाचा आस्वाद घेणारा एक संथ लयीतील जीवनानुभव असून तो कोकणी रंगभूमीच्या सौंदर्यशास्त्राचा पाया बनून राहिला आहे.

निसर्गाच्या रंगांशी जोडलेल्या गोव्यातील कोकणी नाटकांची प्रकाशयोजना करताना, मावळत्या सूर्याची लाली, नदीच्या लाटांची संथ लय, तसेच इतर निसर्ग सौंदर्य नकळत रंगमंचावर उतरते. ‘जागर’मधील मुखवटे आणि वेशभूषा, ‘रणमाले’ मधील आदिम सूर, आणि ‘कालो’ मधील संगीताची लय, या दृश्य आणि श्राव्य सौंदर्यशास्त्राच्या अप्रतिम रुपांचे अस्सल दर्शन आपल्याला कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीने दिले.

गोव्याच्या नाट्यचळवळीचे प्रमुख स्थान आणि जागतिक स्तरावर विशिष्ट ओळख असलेली पणजी येथील ‘कला अकादमी’, स्पर्धात्मक कोंकणी रंगभूमीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात एका मोठ्या संकटातून जात आहे. अलिकडेच सादर केलेल्या तांत्रिक ऑडिट अहवालात कला अकादमीच्या नूतनीकरणातील गंभीर त्रुटी आणि पाणी गळती, ऑडिटोरियममधील छताची पडझड, या सारखे ‘स्ट्रक्चरल’ दोष समोर आल्यामुळे कला अकादमी थिएटर बंद राहण्याचे संकेत आहेत.

कोकणी स्पर्धात्मक रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी ‘कला अकादमी’ तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आणि कलाकारांसाठी अनुकूल असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही रंगभूमीचा आत्मा हा तिथला कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील जिवंत संवादात असतो. कोकणी प्रेक्षक हा अत्यंत चोखंदळ आणि संवेदनशील आहे. सामान्य कोकणी प्रेक्षकांना संगीतमय, कौटुंबिक धर्तीवरील खिळवून ठेवणारी नाटके आवडतात.

त्यांनी स्पर्धात्मक कोकणी रंगभूमीवरील ‘प्रायोगिक’ नाटकांना उपस्थिती लावून भाषिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणे अतिशय महत्वाचे आहे. ‘गोंयकारपण’ आणि स्थानिक रंगभूमीची समृद्धता जपणाऱ्या कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीच्या विकासामुळे कलाकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजक, ध्वनीसंयोजक, रंगभूषाकार यांना हक्काचा रोजगार मिळून स्थानिक पातळीवर सांस्कृतिक अर्थव्यवस्था निर्माण होते.

कोकणी स्पर्धात्मक रंगभूमी गोव्यातील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम अनौपचारिक कोकणी-संस्कृती शिक्षण केंद्र आहे. नाटकांच्या माध्यमातून तरुणांमध्ये कोकणी भाषा, संवाद कौशल्य आणि संवेदनशीलता वाढून शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास होतो. नाट्य अभ्यासकाच्या दृष्टीने कोकणी रंगभूमीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी किंवा जागतिक रंगभूमीशी स्पर्धा करण्यासाठी, जागतिक रंगमंचावर होणाऱ्या विविध प्रयोगांची दखल घेणे आवश्यक आहे.

कसदार कोकणी संहिता इंग्रजी व इतर भाषांत अनुवादित करून त्या जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर केल्या पाहिजेत. गेली पन्नास वर्षे कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकांची संख्या मोजत आत्मसंतुष्ट न होता, कोकणी अस्मितेच्या गुणवत्तेचा, सिद्धांतांचा आणि सौंदर्यशास्त्राचा आलेख तपासणे आज अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षात गरज आहे, ती कला अकादमीसारख्या पायाभूत सुविधांचे ‘सरकारीकरण’ सोडून पुनरुज्जीवन करण्याची, जागतिक सिद्धांतांची ‘गोंय’च्या मातीशी योग्य सांगड घालण्याची आणि ‘गोंयकार’ कलाकार-प्रेक्षक यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याची. ‘गोंयकारपण’ जिवंत ठेवत, जेव्हा कोकणी नाटक जागतिक स्तरावरील रंगमंचाशी स्पर्धा करेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने या पन्नास वर्षांच्या तपस्येचे चीज होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT