Smriti Mandhana father heart attack: भारतीय क्रिकेट संघाची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा (रविवार २४ नोव्हेंबर) सांगलीत संपन्न होणार होता. मात्र, लग्नसोहळ्यापूर्वीच स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने या संपूर्ण आनंदी वातावरणात मोठा गोंधळ उडाला असून, विवाहसोहळा तूर्त रद्द होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहस्थळावरील सेट-अप काढण्यास सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगलीतील स्मृती मानधनाच्या फार्म हाऊसवर लग्नसमारंभाची तयारी सुरू असताना तिच्या वडिलांची तब्येत अचानक खालावली. या अनपेक्षित घटनेमुळे पाहुणे आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
वैद्यकीय मदतीची गरज लक्षात घेऊन तात्काळ रुग्णवाहिका विवाहस्थळी बोलावण्यात आली आणि वडिलांना तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक रुग्णवाहिका आल्याने आणि वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाहस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, स्मृती मानधना आणि तिचे जवळचे नातेवाईक तातडीने त्यांच्यासोबत रुग्णालयात गेले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे विवाहसोहळ्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी चार वाजता सुरू होणारा मुख्य लग्नसोहळा आता रद्द होण्याची शक्यता आहे.
विवाहस्थळावरून आलेल्या माहितीनुसार, तेथील लग्नाचा सेटअप काढायला सुरुवात झाली आहे. स्मृती आणि कुटुंबातील सदस्य रुग्णालयात असल्याने विवाह समारंभासाठी उपस्थित असलेले काही पाहुणे देखील आता माघारी परतले आहेत.
स्मृती आणि पलाश यांचा विवाह सोहळा स्मृतीच्या सांगलीतील फार्म हाऊसवर अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार होता. भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडू गेल्या दोन दिवसांपासूनच सांगलीमध्ये दाखल झाल्या होत्या. सध्या स्मृती मानधनाचे कुटुंब वडिलांच्या उपचारावर लक्ष केंद्रित करत असल्याने, विवाहसोहळ्याच्या पुढील निर्णयाबद्दल अधिकृत माहिती लवकरच अपेक्षित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.