निळू दामले
खूप दूरदूरवरून इफ्फीसाठी अर्थात गोव्यातल्या चित्रपट महोत्सवासाठी लोकं आली होती. काही लोकं इतकी दूरवरून की पणजीत पोचल्यानंतर त्यांचा एक दिवस झोप काढण्यात खर्ची झाला. चार दिवस झाले असताना दोघं जण बारमध्ये भेटले. म्हणाले, काही सिनेमे चांगले होते आणि काही वाईट्ट होते. नावं घेणं योग्य नाही पण किती तरी सिनेमे अगदी बंडल होते, किती तरी सामान्य होते. त्यांची निवड कोणी आणि कां केली ते समजलं नाही.
सुधीर नांदगावकर मुंबईत महोत्सव करत असत. कधी कधी कंटाळवाणे, सामान्य चित्रपट दाखवत. अगतिक स्वरात, आर्जव केल्यागत म्हणत ''अहो पॅकेज असतं. ते आमच्या हातात नसतं. आमच्याकडे पैसे नसतात. एम्बसीकडून फिल्म्स घ्याव्या लागतात. ते देतील त्या घ्याव्या लागतात...''
गोव्यातला महोत्सव भरवणाऱ्यांकडं बरे पैसे असतात असं ऐकतो. ते पैसे उडवतात असंही ऐकतो. मग त्यांनी चांगले चित्रपट का निवडू नयेत? पैसे तर प्रत्येकाला कमीच पडतात. ते समजण्यासारखं आहे. पण जेवढे केवढे पैसे असतील त्यात चित्रपटांची संख्या बसवावी. संख्या कमी झाली तर काय हरकत आहे? कमी चित्रपटगृह लागतील. त्यात काय बिघडलं? दोनशेच्या ऐवजी समजा पन्नासच फिल्म दाखवल्या, काय बिघडलं? कचरा गोळा करण्यात काय अर्थ आहे?
सावरकर हे नेते किती मोठे होते हा मुद्दाच नाही. त्यांच्यावर केलेली फिल्म कशी आहे हा मुद्दा आहे. सरकारचे बहुतेक प्रॉडक्ट बंडल असतात कारण सरकारवर पक्ष आणि नोकरशाहीचा दबाव असतो. सावरकरांच्या ऐवजी दुसरी एखादी चांगली फिल्म दाखवता आली असती. समजा दुसरी मिळाली नसती तर एक फिल्म कमी झाली असती तर काय बिघडणार होतं.
इफ्फीमधे स्पर्धा असते. कसदार आणि दर्जेदार सिनेमांची स्पर्धा असायला हवी. इफ्फी हा काही प्रोत्साहनपर महोत्सव नाही. कोणी नवखा आहे, कोणी बिच्चारा गरीब असूनही फिल्म करतोय, कोणी मराठी नावाच्या मागास फिल्म जगातला आहे. तर त्यांचं प्रदर्शन शाळा-कॉलेजात करायला हरकत नाही. प्रोत्साहन तर द्यायलाच हवं, केलेल्या धडपडीचं कौतुक तर करायलाच हवं, पण त्यासाठी इफ्फी महोत्सव ही जागा नाही.
ओटीटी सुरू झाल्यापासून चित्रपट लोकांवर ओतले जाताहेत. पाच पन्नास ओटीटी आहेत. किती तरी म्हणजे किती तरी भंकस आणि रद्दड चित्रपट ओटीटीवर येतात. चित्रपटांबरोबरच वेब मालिकाही आहेत. कुठला तरी एखादा जॉनर लोकांना आवडतो आणि मग त्याच प्रकारच्या चित्रपटांची भरमार ओटीटीवर होते. शिवाय सेलफोनसाठीही प्रचंड दृश्य मजकूर येतोय.
म्हणूनच तर दर्जेदार चित्रपटांसाठी एखादा मंच आवश्यक आहे. ढिगातून चांगल्या गोष्टी निवडायला हव्यात, त्या चांगल्या का आहेत ते लोकांना सांगायला हवं. ते समजून घ्यावंसं वाटणाऱ्यांसाठी महोत्सव असतो, असायला हवा.
छापील आणि डिजिटल मजकूर, डिजिटल दृश्य कशी पाहायची असतात तेही लोकांना सांगायला हवंय. लोक काय वाट्टेल ते बघतात आणि कौतुक करतात. कानठळ्या बसवणारे आवाज, फोकस नसणं, रंगांचं रजिस्ट्रेशन झालेलं नसणं असे प्रकार थेटरातही चालतात आणि लोक ते पाहून चित्रपट ग्रेट आहे असं म्हणतात. हल्ली कॅमेरे स्वस्त झालेत. संकलनही सोपं व स्वस्त झालंय. प्रत्येक नागरिकाला वाटतं की तो ग्रेट डॉक्युमेंटरी किंवा फीचर करू शकतो. असे ग्रेट लोकं खूप पसरलेत. त्यापैकी काही ग्रेट लोक इफ्फीतही दिसले.
चित्रपटातले कसबी, जाणकार, नामांकित इत्यादींनी लोकांना चांगली चित्रपट निर्मिती कशी असते तेही सांगायला हवं. अलीकडं पडद्यावर आलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक अशी पद्धत रूढ होऊ पहातेय. कला अकादमीमध्ये एका साउंड इंजिनियरचं भाषण मी ऐकलं. उत्तम भाषण होतं. चित्रपटातला ध्वनी हा घटक किती आणि कसा महत्त्वाचा असतो ते कसबी इंजिनियरनं उदाहरणं देऊन सांगितलं. श्रोत्यांना चित्रपट कसा ऐकावा-पाहावा ते त्या भाषणानंतर अधिकच चांगलं समजलं असणार.
इफ्फीला येणारी माणसं हौशी असतात. त्यांच्याकडं उडवण्यासाठी पैसे नसतात. त्यांना अडीचशे रुपये कॉफीवर आणि शंभर रुपये एका समोशावर खर्च करणं आवडत नाही. एखाद दिवशी ठीक आहे. पण सात दिवस दिवसातून तीन वेळा कॉफी आणि समोसा खायचा म्हटला तर तेवढ्या पैशात कान्स महोत्सवालाही जाता येईल. इफ्फीच्या आतमध्ये लूट केली जाते. मडगाव, पर्वरी, फोडा अशा दूरच्या ठिकाणी महोत्सवातील माणसाला जायला सांगणं व्यवहाराला धरून नाही. महोत्सव मर्यादित क्षेत्रफळातच असायला हवा.
प्रश्नोत्तराचा तासाचंही तसंच, त्या सेशनला बसायचं तर पुढला चित्रपट हुकतो. त्या चित्रपटगृहातील पुढला चित्रपट लांबतो. बाहेर माणसं रांग लावून ताटकळत असतात. दुसरं असं की प्रश्नोत्तरं रंगू शकतात, त्यासाठी पुरेसा अवकाश हवा. प्रांगणातल्या मोकळ्या जागेत स्वतंत्रपणे त्याचं आयोजन करता येईल? किंवा एखादा हॉल त्या साठीच मुक्रर करतायेईल?
चित्रपटगृहात खूप जागा मोकळ्या असतात. सुरू होण्याच्या दोन मिनिटं आधीपर्यंत किती जागा मोकळ्या आहेत ते कळतं. तिकीट नसलेले किंवा दुसरा चित्रपट पसंत पडला नाही म्हणून बाहेर पडलेले प्रेक्षक मोकळ्या खुर्च्यांवर जायच्या विचारात असतात. त्यांना अडवलं जातं. हे बरोबर नाही.
मॅकिनेझ पॅलेस आणि कला अकादमीतली थेटरं जुन्या पद्धतीची आहेत. त्यांना अनेक दरवाजे आहेत. समजा तिथं आग लागली किंवा काही संकट आलं तर माणसं सुलभपणे बाहेर पडू शकतात. तिथं रांगांच्या मध्ये, आजूबाजूलाही माणसांना बसू द्यावं. मजा येते. महोत्सव ही धमाल असते, महोत्सव म्हणजे राष्ट्रपतीचं भाषण वगैरे नसतं. तशीच थेटरं निवडावीत. कला अकादमीच्या खुल्या जागेत रात्री एक सिनेमा दाखवावा. केरळात फूटबॉल मॅचेस मोठा पडदा लावून खुल्या मैदानातही दाखवतात. आमचं लहानपण गणेशोत्सवात मैदानात मधोमध लावलेल्या पडद्यावरचा सिनेमा पडद्याच्या दोन्ही बाजूंनी पाहण्यात गेलं. सिनेमाची गोडी सिनेमात असते, ऐटबाज थेटरात नसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.