Sumerians: सुमेरियन कोकणात आले होते का, इतिहास काय सांगतो? वाचा

Sumerians Colonies: मेसोपोटेमिया हा पश्चिम आशियातील टायग्रिस-युफ्रेटिस नदी प्रणाली व्यापणारा प्रदेश आहे; त्यात आधुनिक इराक, तुर्की, सीरिया, इराण, सौदी अरेबिया, कुवेत आणि जॉर्डनचे भाग समाविष्ट आहेत. ईसापूर्व ६०००पर्यंत, टायग्रिस-युफ्रेटिस नदीच्या खोऱ्यात शेतीची लागवड होऊ लागली.
Sumerians History
SumeriansX
Published on
Updated on

तेनसिंग रोद्गीगिश

थापर यांनी मेलुहांचे स्थान शोधण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला बरीच मदत करू शकतो. (संदर्भ : थापर, १९७५ : अ पॉसिबल आइडेन्टिफिकेशन ऑफ मेलुहा, दिलमुन आणि माकन, जर्नल ऑफ द इकॉनॉमिक अँड सोशल हिस्ट्री ऑफ द ओरिएंट, खंड १८, क्र. १) खास करून काठियावाडी क्षत्रियांना आपली ओळख निर्माण करण्यात व्यापार किती महत्त्वाचा होता आणि या व्यापारामुळे सुमेरियन किंवा मेसोपोटेमियन संस्कृतीचा आणि जातीयतेचा अंतर्भाव कोकणात कसा झाला असेल, याचा शोध घेताता. ‘खलाशी आणि सागरी लोक’ या संदर्भाच्या आधारे, थापर यांनी निष्कर्ष काढला की मेलुहा हे ‘किनारी क्षेत्र’ असावे.

ज्या मालाचा व्यापार होत असे, त्यावरून त्यांनी अंदाज बांधला आहे. मेसोपोटेमियाच्या साहित्यात रक्तशिळा (कार्नेलियन), कवच, हस्तिदंत आणि लाकूड या चार प्रमुख वस्तूंचा उल्लेख मेलुहातून आयात केलेल्या वस्तूंत आढळतो. (संदर्भ : पॉट्स, २०९ : बॅबिलोनियन सोर्सेस ऑफ एक्सोटिक रॉ मटेरिअल, लिक : द बॅबिलोनियन वर्ल्ड, १२४). रक्तशिळा (कार्नेलियन) राजपिपला खाणीतून किंवा नर्मदा नदीच्या मुखातून आले असल्याने, ते काठीयावाड तसेच काही उत्तरेकडील कोकणच्या बंदरांतून निर्यात केले असण्याची शक्यता आहे. शंख-शिंपले बहुतेक काठियावाडमधून निर्यात झाले असावेत. हस्तिदंती आणि लाकूड निश्चितपणे पश्चिम घाट आणि त्याच्या पायथ्याच्या प्रदेशातून आले होते, ते थेट द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत गेले. अशा प्रकारे, थापर यांच्या मते संपूर्ण पश्चिम किनारा मेलुहाचा विस्तारित अंतर्भाग असू शकतो. वर वर्णन केल्याप्रमाणे मेलुहा किंवा त्याच्या अंतर्भागात मेसोपोटेमियाच्या वसाहती कोठे आहेत?

‘सुमेरियन लोक सिंधूच्या किनाऱ्यावर आणि मैदानी प्रदेशात, सिंधू शहरांमध्ये थेट आले नाहीत किंवा ते स्थायिकही झाले नाहीत - किमान मोठ्या संख्येने तरी निश्चितच नाही’, असे मत विडाले स्पष्टपणे मांडतात. (संदर्भ : विडाले, २००१ : ग्रोइंग इन फॉरेन वर्ल्ड : फॉर अ हिस्ट्री ऑफ ‘मेहुला व्हिलेजिस’ इन मेसोपोटेमिया इन थर्ड मिलेनिअम बी.सी., मेलम्मु सिम्पोसिया ४, २६२). गोव्यातील सुमेरियन वसाहतींबद्दल धुमेंच्या पुराव्यावर चर्चा करण्याआधी ‘सुमेरियन’, ‘अकाडियन’, ‘बॅबिलोनियन’, ‘मेसोपोटेमियन’ यांसारख्या शब्दांमधील संबंध आपण समजून घेऊ.

मेसोपोटेमिया हा पश्चिम आशियातील टायग्रिस-युफ्रेटिस नदी प्रणाली व्यापणारा प्रदेश आहे; त्यात आधुनिक इराक, तुर्की, सीरिया, इराण, सौदी अरेबिया, कुवेत आणि जॉर्डनचे भाग समाविष्ट आहेत. ईसापूर्व ६०००पर्यंत, टायग्रिस-युफ्रेटिस नदीच्या खोऱ्यात शेतीची लागवड होऊ लागली. कारण झाग्रोस पर्वताच्या पायथ्याशी सिंचनाची सोय उपलब्ध झाली. सुमारे ईसापूर्व ४०००पर्यंत व्यापार उदयास येऊ लागला, त्यानंतर लवकरच शहरीकरण झाले. ईसापूर्व सुमारे ३५००च्या सुमारास सुमेरियन सभ्यता दक्षिण मेसोपोटेमियामध्ये आकार घेऊ लागली. हळूहळू प्रत्येक सुमेरियन शहर लहान शहर-राज्याचे केंद्र बनले. लवकरच हा प्रदेश दोन भाषा गटांच्या लोकांमध्ये विभागला गेला: दक्षिणेकडील सुमेरियन-भाषक आणि उत्तरेकडील सेमिटिक भाषक किंवा अक्काडियन. ईसापूर्व सुमारे २३३४मध्ये अक्कडच्या सर्गनने सुमेर आणि अक्कड या दोघांवर नियंत्रण मिळवून आधिपत्य केले.

अखेरीस उत्तर मेसोपोटेमिया पूर्णपणे सुमेरियन-अक्कडियन सभ्यतेच्या छत्रछायेखाली आले. जेव्हा अक्कडच्या सर्गनची राज्यावरील पकड ढिली झाली, तेव्हा स्थानिक अधिपतींमध्ये चढाओढ सुरू झाली. त्यांच्यात आणि वाळवंटातील अर्ध-भटक्या कुळांमध्ये दीर्घकाळ अंतर्गत कलह सुरू झाला. अशाच एका प्रमुख, हमुराबी या अमोरीने एका लहानशा राज्याची स्थापना केली. ईसापूर्व सुमारे १७९२मध्ये बॅबिलोनचे आतापर्यंत महत्त्वाचे नसलेले शहर एकदम नावारूपास आले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने आपला प्रदेश संपूर्ण मेसोपोटेमिया आणि त्यापलीकडे असलेल्या एका मोठ्या साम्राज्यात बदलला. हे अंतर्गत फरक आपल्यासाठी फारसे प्रासंगिक नसल्यामुळे, त्यांत फारसा फरक न करता आम्ही सुमेरियन, अकाडियन, बॅबिलोनियन, मेसोपोटेमियन, इत्यादी शब्दांचा वापर करत राहू. आम्हाला भारतीय उपखंड आणि मेसोपोटेमियाच्या विस्तृत प्रदेशातील गेल्या काही सहस्राब्दीत घडलेल्या परस्परसंबंधांकडे लक्ष द्यायचे आहे.

आता गोव्यातील सुमेरियन वसाहतींबाबत धुमेंच्या पुराव्याकडे पाहू. जरी त्यांनी या विषयावर विस्तृत चर्चा केली असली तरी, त्यातील बहुतेक अनुमाने आहेत ज्यांची पडताळणी करणे कठीण आहे. आपण ज्याला सुमेरियन क्यूनिफॉर्म लिपी आणि सुमेरियन देवतांची चिन्हे मानत असलेल्या दगडावरील कोरीव कामांची केवळ दखल घेऊ. सावईवेरे येथील एका गुहेतील एका भिंतीवर बारा सुमेरियन क्यूनिफॉर्म चिन्हे होती. त्याच गावात त्यांना दोन ‘ओरॅकल प्लेट्स’ सापडल्या. एका प्लेटमध्ये दोन शिंगे असलेला मुकुट दिसला. त्यांच्या मते ते देव अनुचे प्रतीक असावे. उजव्या बाजूला, माशाचे चित्र कोरले होते, तर शिलालेखात मेंढपाळाच्या काठीचे कोरीव चित्र होते, जे इनना देवीचे प्रतीक आहे. प्रियोळमध्ये त्यांना काही रेषा कोरलेला एक काळा दगड सापडला, जो त्यांच्या मते सुमेरियन ओरॅकल शिलालेख असावा. त्याच ठिकाणी त्यांना दोन ‘स्टेल्स’ (उभ्या दगडाचे स्लॅब) सापडले; त्यापैकी एकाला दोन शिंगे असलेला मुकुट होता, जे त्यांच्या मतानुसार सुमेरियन देव बेलचे प्रतीक आहे. धुमे यांनी अनुमान काढले की त्यांना सापडलेल्या इतर काही दगडी वस्तू ओरॅकल प्लेट्स किंवा स्टिल्स असू शकतात, परंतु त्या ‘लिंग’ म्हणून पूजल्या जात होत्या. पडताळणी केल्यानंतरच त्यांच्या सुमेरियन असण्याची पुष्टी केली जाऊ शकते. (संदर्भ : धुमे, २००९ : द कल्चरल हिस्ट्री ऑफ गोवा, ११८).

Sumerians History
Dhendlo Utsav: ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’! लोकगीतांच्या गजरात गोव्यात 'धेंडलो उत्सव' साजरा

अशा वस्तू आणि चिन्हे कोकणच्या उर्वरित किनारी भागातदेखील आढळतील. जर धुमे यांची सुमेरियन वंशाची संकल्पना बरोबर असेल, तर त्यामुळे कोकणमध्ये सुमेरियन अस्तित्वाची शक्यता उघड होते. हा पुरावा कितीही क्षीण असला तरी, आम्ही तशी शक्यता नाकारू शकत नाही. आत्तापर्यंत, फारच कमी पुरावे आढळले आहेत. मेलुहा गावाप्रमाणे गुअब्बा, आम्हाला कोणत्याही मोठ्या सुमेरियन वस्तीचे पुरावे मिळालेले नाहीत. आम्हाला व्यापार सूचित करणारे पुरावेदेखील आढळले नाहीत. काठीयावाडी चाड्डींच्या वेळी भरभराट झालेली कोकणपट्ट्यातील बंदरे पूर्वी अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. परंतु धुमेंचा शोध त्या दिशेने निर्देश करताना दिसत नाही. सावईवेरे आणि प्रियोळ हे दोन्ही प्रदेश किनारपट्टीपासून दूर आहेत. सुमेरियन अस्तित्वाचा पुरावा अद्याप कोणत्याही प्राचीन बंदर स्थळांवर सापडला नाही. आमच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे, गोव्यातील सुमेरियन उपस्थितीचा काठियावाडी चाड्डींच्या व्यापार उद्योगाशी काहीही संबंध असल्याचे दिसत नाही.

Sumerians History
Goa Opinion: ‘दुग्धपेढी’ची घोषणा म्हणजे खिशात नाही दमडी, गाव जेवणाची दवंडी!

सुमेरियन लोक कोकणात आले होते, हे खरे असल्यास, ते वेगळ्या संदर्भात असण्याची शक्यता आहे. कोकणात व्यापारानिमित्त किंवा अन्य काही कारणांसाठी आलेली ही काही सुमेरियन कुटुंबे असू शकतात. धुमेंनी सुचविल्याप्रमाणे हे मोठे गटदेखील असू शकतात. पण त्यांचा हेतू आम्हाला अजून कळायचा आहे. धुमे असे गृहीत धरतात की पद्दे आणि चित्पावन भट हे सुमेरियन वंशाचे आहेत. (संदर्भ : धुमे, २००९ : द कल्चरल हिस्ट्री ऑफ गोवा, ११९). हा एक तर्क आहे, त्याला ठोस पुरावा नाही. परंतु कोकणातील या दोन ब्राह्मण समुदायांची वैशिष्ट्ये आणि सारस्वत ब्राह्मण यांच्यातील वैशिष्ट्ये यातील फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com