पणजी : गोव्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. या सर्व रणधुमाळीत सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर. उत्पल पर्रीकरांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंड केलं आणि भाजपविरोधात तगडं आव्हान उभं केलं आहे. घरोघरी प्रचार करताना उत्पल पर्रीकर पणजीकरांना भावनिक साद घालत आहेत आणि लोकही तेवढ्य़ाच आत्मियतेने उत्पल यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. (Utpal Parrikar News Updates)
दरम्यान दैनिक गोमन्तकशी बोलताना उत्पल यांनी मनोहर पर्रीकरांसोबतच्या (Manohar Parrikar) आठवणींना उजाळा दिला. गोमन्तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसोबतचा एक किस्सा सांगितला आहे. परदेशात शिक्षणासाठी जाताना उत्पल यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयींनी उत्पल यांची आत्मियतेने चौकशी करत पाठीवर कौतुकाची थापही दिली होती. अमेरिकेत जाण्यापूर्वी वाजपेयींनी दिलेल्या प्रेमळ सल्ल्याची आठवण उत्पल पर्रीकर यांनी बोलून दाखवली.
उत्पल (Utpal Parrikar) म्हणाले, इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अमेरिकेतील उच्च शिक्षण हे काही परवडणारं नव्हतं. बाबा मुख्यमंत्री असले तरीही लाखोंचा खर्च परवडणारा नव्हता. यावेळी एका विद्यापीठाने फेलोशिप देत शिकता शिकता काम करण्याची मुभा दिली आणि अमेरिकेला जाणं निश्चित झालं. अमेरिकेला जाण्यापूर्वी बाबा म्हणाले, मी पंतप्रधानांना भेटायला चाललोय. तू अमेरिकेतून (America) शिकून परत कधी येशील माहित नाही. आपण दिल्लीला एकत्र जाऊ. त्यामुळे आम्ही दिल्लीला सोबत गेलो. यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी आत बोलावून घेतलं. आपली आपुलकीने विचारपूस केली आणि पाठीवर थाप देत म्हणाले, 'वापस जरुर आना', असं म्हणत उत्पल यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.