पणजी : विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यास भाजपला पाठिंबा देणार की अपक्ष राहणार या प्रश्नावर उत्पल पर्रीकर यांनी पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही स्थितीत भाजपला पाठिंबा मात्र देणार नाही, असा पुनरुच्चार उत्पल यांनी केला आहे. दैनिक गोमन्तकशी बोलताना उत्पल पर्रीकर यांनी गोवा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली रणनितीही स्पष्ट केली. (Utpal Parrikar News Updates)
भाजपने (BJP) तिकीट नाकारल्यानंतर आपण अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जनतेला साद घातलेली असून पणजीतील लोकांचा चांगला पाठिंबा आपल्याला मिळत आहे. मी जनतेकडे अपक्ष म्हणून मत मागायला गेलो आहे, त्यामुळे कुठल्याही पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण निवडून आल्यास पुढील पाच वर्षं अपक्ष आमदार म्हणूनच जनतेची सेवा करणार, असा पुनरुच्चार उत्पल पर्रीकर यांनी केला आहे.
गोव्याच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एका आमदाराची गरज असेल का असा प्रश्न उत्पल पर्रीकरांना विचारण्यात आला. या प्रश्नावरही उत्पल यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपला एका आमदाराची गरज असल्यास ते माझ्याकडे येणार नाहीत. ते त्यांचा तो आमदार शोधून काढतील, असा खोचक टोलाही उत्पल यांनी लगावला आहे. यासोबतच कोणत्याही परिस्थितीत भाजपची साथ देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पणजीत आपण लढा लढतो आहे. मनोहर पर्रीकरांनी दिलेला वारसा जपत आपण पणजीतून निवडणूक लढवतोय. जनतेच्या प्रश्नांसाठी हा लढा सातत्याने सुरुच राहिल असंही उत्पल यांनी स्पष्ट केलं. मनोहर पर्रीकर हयात असताना राजकारणात येण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र आता मनोहर पर्रीकरांच्या तत्वांना मूठमाती दिली जात असल्याने नाईलाज म्हणून राजकारणात यावं लागलं आहे, अशी खंतही उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी बोलून दाखवली.
गोमंतकीय तरुणांसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरी कऱण्यासाठी गोव्यातील तरुण गोव्याबाहेर जातो. त्यामुळे आईवडिल गोव्यात आणि मुलगा गोव्याबाहेर अशी परिस्थिती निर्माण होते. मात्र या तरुणांना गोव्यातच रोजगार उपलब्ध झाल्यास त्यांच्यावर गोव्याबाहेर जाण्याची वेळ येणार नाही. निवडून आल्यावर गोव्यातील तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नासाठी लढा देणार असल्याचंही उत्पल यांनी स्पष्ट केलं. गोव्यात रोजगारनिर्मिती करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान मनोहर पर्रीकरांना (Manohar Parrikar) बहुजन समाजाचा मोठा पाठिंबा होता. फक्त सारस्वतच नाही, तर सर्वच जाती धर्माचे लोक पर्रीकरांना मानत होते. त्यामुळे आपल्यालाही हा पाठिंबा मिळेल असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला. भाजपमधील एका मोठ्या वर्गाचा आपल्याला पाठिंबा असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आपल्या पाठिशी असल्याचा दावा उत्पल यांनी केला. उत्पल पर्रीकरांना आतापर्यंत अनेक नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यात काँग्रेसच्या उदय मडकईकरांचाही समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.