तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी Mamata Banerjee

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

तिसऱ्या आघाडीचा चौथा कोन

ममतादीदी (Mamata Banerjee)असोत की पवार यांच्या या खेळीचा अर्थ हा भाजपविरोधात (BJP) आघाडी तर उभारायची; मात्र त्या आघाडीचे नेतृत्व हे काँग्रेसकडे जाणार नाही, याची काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या हातातून ‘एनडीए’ची सत्ता हिसकावून घेत, 2004 पासून देशावर दहा वर्षे राज्य करणारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आता अस्तित्वातच कोठे आहे, असा सवाल करून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नवे राजकीय नेपथ्य स्थापन करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल काबीज करण्याचे मनसुबे बंगालच्या उपसागरात बुडवल्यापासून ममतादीदींकडे तमाम भाजप-विरोधक आशेने पाहत आहेत. त्यामुळेच त्यांच्या महाराष्ट्रावरील स्वारीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. आपल्या या दौऱ्यात ममतादीदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), तसेच शिवसेना नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. तेव्हाच अलीकडल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठ फिरवणाऱ्या ममतादीदी काँग्रेसला वगळून नवे राजकीय नेपथ्य तर उभे करू पाहत नाहीत ना, असा प्रश्न समोर आला होता. त्यावर ममतादीदींनी विचारलेल्या ‘यूपीए आहेच कोठे?’ या प्रश्नाने शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.

मात्र, स्वत: पवार हे सातत्याने काँग्रेसशिवाय भाजप विरोधी आघाडी अशक्य असल्याचे सांगत आहेत. त्यामुळेच ममतादीदी तसेच पवार यांच्यात या आघाडीसंदर्भात मतभेद तर नाहीत ना, असेही मुद्दे उगाळले जाऊ शकतात. मात्र, सध्या ममतादीदी या भाजपविरोधात जे कोणी ठामपणे भूमिका घेऊ इच्छितात, त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ममतादीदींनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात काही निवडक लेखक, पत्रकार यांच्याशीही संवाद साधला. त्यांच्या या वेळच्या चर्चेतून स्पष्ट झालेली महत्त्वाची बाब म्हणजे, जे कोणी भाजप आणि विशेषत: मोदी यांच्या विरोधात लढायला तयार आहेत, त्यांनी एकत्र यायला हवे. त्यांच्या बोलण्याचा आणखी एक सूर म्हणजे काँग्रेस अशा प्रकारच्या लढाईला तयार असल्याचे दिसत नसल्याने जे ‘आरपारच्या लढाई’ला तयार असतील, त्यांना एकत्र आणणे, हाच त्यांचा उद्देश आहे. मात्र, काँग्रेस नेते ममतादीदींच्या या ‘खेळी’मुळे कमालीचे अस्वस्थ झाले असून, हे ‘डावपेच’ भाजपला मदत करण्यासाठीच आखले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस गोटातून केला जात आहे.

अर्थात, ममतादीदी असोत की पवार; त्यांना काँग्रेसला समवेत घेतल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर भाजपला पराभूत करता येणे केवळ अशक्य आहे, हे पक्के ठाऊक आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला असला, तरी या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला १९ टक्के मते मिळाली होती, ही बाब भाजपविरोधात कोणतीही आघाडी करू इच्छिणारे नेते दुर्लक्षित करू शकणार नाहीत. तसे झाले तर ती बाब भाजपच्या पथ्यावरच पडेल, हे पवारांना पक्के ठाऊक आहे. पवारांच्याच निवासस्थानी काही महिन्यांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी आयोजित केलेल्या भाजप विरोधकांच्या बैठकीस काँग्रेसला आमंत्रण नव्हते, हे खरेच. मात्र, बैठकीनंतर पवार यांनीच काँग्रेसला वगळून अशी कोणतीही आघाडी शक्य नाही, हे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे मग ममतादीदींच्या ‘यूपीए आहेच कोठे?’ या प्रश्नाचा अर्थ वेगळ्या प्रकारे लावावा लागतो. उत्तर प्रदेशच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी तर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनीही काँग्रेसला सोबत घेतले होते. मात्र, या दोन्ही वेळेस काँग्रेस हे ‘महागठबंधन’वर ‘ओंझे’च ठरले होते. त्यामुळे राज्याराज्यांतील प्रबळ प्रादेशिक पक्षांनी भाजपविरोधात प्रथम एकत्र यावे, म्हणूनच ही सारी आखणी सुरू असल्याचे दिसते. त्यानंतर जर काँग्रेस या आघाडीबरोबर येऊ शकते, असे तूर्तास तरी म्हणता येते. दोन निवडणुकांतील जबरी पराभवानंतरही काँग्रेसचे दिवाणखानी राजकारण करणारे नेते ‘काँग्रेस हाच भाजपला पर्याय असू शकतो!’ अशा गमजा मारत आहेत. त्यामुळे ते कोणत्या नंदनवनात वावरत आहेत, तेच स्पष्ट होते. त्यामुळेच ममतादीदी असोत की पवार यांच्या या खेळीचा अर्थ हा भाजपविरोधात आघाडी तर उभारायची; मात्र त्या आघाडीचे नेतृत्व हे काँग्रेसकडे जाणार नाही, याची काळजी घ्यायची, असाच लावावा लागतो.

सध्या देशात विविध राज्यांत प्रादेशिक पक्षच भाजपशी खंबीरपणे लढा देत असल्याचे दिसत आहे. देशात गेल्या सात वर्षांत बहुमतशाहीच्या जोरावर लोकशाहीला तिलांजली देऊन भाजप ज्या मनमानी पद्धतीने कारभार करत आहे, ते बघता खरेतर जे काम काँग्रेसने करायला हवे, तेच काम राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्ष करत असल्याचे सध्या दिसत आहे. त्यामुळेच अशा सगळ्या भाजपविरोधी पक्ष, गट, समूह, कलावंत, लेखक यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ममतादीदी बंगालच्या बाहेर पडल्याचे दिसत आहे. शिवाय, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपला मोठा शह दिल्याने त्यांना या राज्यात पाय रोवण्यात काही रस दिसत नाही, असेही या खेळीतून सूचित झाले आहे. उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव ते काम करत असल्याने तेथेही त्या राजकारण करू इच्छित नाहीत. त्यामुळे आता विरोधी आघाडीचा किमान ‘चेहरा’ तरी ममतादीदी हाच दिसू लागला आहे. नेतृत्वाचा प्रश्न गौण आहे, प्रथम भाजपचा पराभव झाला पाहिजे, असे त्या स्वत: सांगत असल्या तरी महाराष्ट्रावरील या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्यांचे इरादेच स्पष्ट झाले आहेत.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपच्या विरोधात प्रादेशिक पक्षांची एकत्रित शक्ती उभी करू पाहात आहेत. महाराष्ट्राचा दौरा हा त्याच प्रयत्नांचा एक भाग होता. भाजपविरोधात आघाडी तर उभारायची; मात्र त्या आघाडीचे नेतृत्व हे काँग्रेसकडे जाणार नाही, याची काळजी घ्यायची, असा त्यांच्या हालचालींचा रोख दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT