पणजी: काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांच्यातील आघाडी ही महाविश्वासघातकी आहे. 2017मध्ये काँग्रेसला मिळालेल्या जनतेचा जनादेश नाकारून भाजपबरोबर युती करणाऱ्या गोवा फॉरवर्डला लोक कधीही माफ करणार नाहीत. भाजप, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डला पर्याय केवळ तृणमूल (TMC) आहे, असे मत तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या दहा वर्षांत गोव्याच्या पर्यावरणाचा नाश करण्यामध्ये भाजप सरकार आघाडीवर आहे. इथली शेती, झाडे, जमीन माती (खनिज) कुणी विकले, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डनेही राज्याच्या या विनाशाला हातभार लावला आहे, असा आरोप लुईझिन यांनी केला.
राष्ट्रवादीबरोबर युती शक्य : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी मंगळवारी मुंबईमध्ये देशाच्या राजकारणावर सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात युती होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. याबाबत स्थानिक नेत्यांना माहिती नसून याबाबतचे सर्व निर्णय पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर घेतले जातात, अशी माहिती फालेरो यांनी दिली आहे.
दीदींचे आता गोव्यात पक्ष विस्तारीकरण
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आपल्या पक्षाचा विस्तार करणे सुरूच ठेवले आहे. नवी दिल्ली आणि महाराष्ट्रानंतर आता ममता बॅनर्जी गोव्यात दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी असतील.
2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी गोवा फॉरवर्डने मदत न करता भाजपबरोबर हातमिळवणी केली. त्याचा परिणाम गोव्याच्या विनाशात झाला आणि आता तो पक्ष काँग्रेसबरोबर युती करत आहे. त्यामुळे जनता त्यांना जागा दाखवून देईल.
- लुईझिन फालेरो, तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.