पणजी: विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतासाठी लागणारा आराखडा मिळवून सुद्धा भाजपमध्ये विधिमंडळ गटनेतेपदाची निवड लांबत आहे. मात्र, भाजपच्या परंपरेनुसार केंद्रीय संसदीय समितीने नेमणूक केलेल्या विशेष निरीक्षकाच्या उपस्थित हे निवड होणार असून यासाठी विद्यमान मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. त्यांना नव्या विधानसभेतील अनेक आमदारांसह प्रदेश कमिटीमधील अनेकांचे समर्थन आहे. याबाबतची घोषणा विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर विशेष निरीक्षक जाहीर करणार आहेत.
अद्याप केंद्रीय संसदीय समितीने निरीक्षकांचे नाव जाहीर केले नसले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, केंद्रीय संघटन सरचिटणीस बी.एल संतोष यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते सोमवारपर्यंत गोव्यात येणार असून सोमवारीच विधिमंडळ सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तिथेच याविषयीचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, या पदासाठी अर्थात मुख्यमंत्रिपदासाठी ज्येष्ठतेचा आधार घेत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनीही आपला दावा सांगितल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
दरम्यान सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ जमविण्यात भाजपाला येईल यश आले असून भाजपचे स्वतःचे 20 आमदार आहेत. त्यांना एका आमदारांची आवश्यकता असताना चंद्रकांत शेट्ये, अंतिनीओ वाझ, आलेक्स रेजिनाल्ड या 3 अपक्ष आणि मगोपच्या (MGP) सुदीन ढवळीकर, जीत आरोलकर या आमदारांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या भाजपकडे पंचवीस आमदारांचे समर्थन आहे.
मगोपच्या पाठिंब्याबाबत मतभेद!
अपक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करता येणार आहे. त्यामुळे मगोपचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता नाही, असे भाजप आमदारांना वाटते. यात रवी नाईक, गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर व माविन गुदिन्हो यांचा समावेश आहे. दुसरीकडे मगोपला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा विचार सुरू आहे. आगामी लोकसभा व इतर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
अनेक आमदार, संघटनमंत्र्यासह प्रदेशाध्यक्षांचा पूर्ण पाठिंबा
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गेल्या तीन वर्षांपासून राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेसह आर्थिक घडी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना व्यवस्थित राबविण्यात त्यांना यश आले.
तौक्ते वादळ, सत्तरीतील महापूर आणि कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आणि आत्मविश्वास देण्यामध्ये मुख्यमंत्री सावंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
विधानसभेच्या निवडणुका सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय साधण्यात सावंत यशस्वी ठरले.त्यामुळे सध्या तरी ते गटनेतेपद व मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत.
भाजपच्या परंपरेनुसार केंद्रीय निरीक्षकच नेतृत्वाचा आणि विधिमंडळ गटनेतेपदाचा निर्णय घेतात. त्यानुसार आम्ही केंद्रीय निरीक्षकांची वाट पाहात असून ते सोमवारपर्यंत राज्यात येतील अशी अपेक्षा आहे. नव्या आमदारांना एकत्रित बोलवून बैठकीमध्ये हा निर्णय होईल. मात्र, 16 मार्चपूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही तयारी सुरू केली आहे.
- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.