मडगाव: उजो, उजो असा गजर करीत कानामागून आलेला आणि मुख्यतः काँग्रेससाठी तिखट बनलेल्या ''रिव्हॉल्युशनरी गोवन्स'' या पक्षाने आपल्या पाहिल्याच निवडणुकीत 9.54 टक्के मते मिळविली. भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षाच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेला मगो (MGP) आणि प्रसिद्धीचे वलय असलेल्या आप आणि तृणमूलपेक्षा ही सरस कामगिरी आहे.
निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकत 33.31 टक्के मते मिळविली आहेत तर 11 जागा प्राप्त झालेल्या काँग्रेसच्या एकूण मतांची टक्केवारी 23.46 टक्के आहे. तर पहिल्याच निवडणुकीत एक जागा मिळवून विधानसभेत पदार्पण करणाऱ्या आरजीच्या एकूण मतांची टक्केवारी 9.54 एवढी आहे. यावेळी निवडणुकीत 9 लाख 65 हजार 997 मतदारांनी मतदान केले होते. त्यातील 92 हजार 175 मते आरजीच्या उमेदवारांनी मिळविली आहेत.
या पाठोपाठ मगो (7.60टक्के), आप (6.77 टक्के), तृणमूल (5.21 टक्के), गोवा फॉरवर्ड (1.84 टक्के), राष्ट्रवादी (1.10 टक्के) व शिवसेना (0.18 टक्के) या पक्षांची कामगिरी आहे. एकूण 38 मतदारसंघात उमेदवार उभे केलेल्या आरजीचा सांत आंद्रे या मतदारसंघात विरेश बोरकर हा विजयी झाला असून वळपई मतदारसंघात आरजीचे सर्वेसर्वा असलेल्या मनोज परब यांना 6377 मते मिळाली आहेत. एकूण 31 मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना 2 हजारपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. पहिल्याच निवडणुकीत (Election) एव्हढी लक्षवेधी कामगिरी कुठल्याही नव्या पक्षाने केलेली नाही असे मत राजकीय घडामोडीवर भाष्य करणारे तज्ज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी केले.
भाजप (BJP) तिसऱ्यांदा सत्तेवर आला यापेक्षा आरजी तिसरा आला आहे ही बातमी महत्वाची आहे. आरजीची खरी शक्ती 2024 च्या लोकसभा आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीत कळून येणार आहे.
- डॉ. नंदकुमार कामत, राजकीय भाष्यकार
पोगो बिल, स्थानिकांच्या रोजगारासाठी परप्रांतीयांना विरोध हे भावनिक मुद्दे लोकांना आवडल्याने विशेषतः ख्रिस्ती बहुल भागात या पक्षाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. पण त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसून भाजपलाच फायदा झाला आहे.
- डॉ.मनोज कामत, राजकीय भाष्यकार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.