पोस्टल मतदान कोणाला?
काणकोणात तीन उमेदवारांत अटीतटीची लढत झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने मताधिक्य मिळविण्यासाठी पोस्टल बॅलट मतदारांना टार्गेट केले आहे. काहींना हीच मते निर्णायक ठरतील असा कयास आहे. त्यामुळे या मतदारांना भाव आला आहे. सध्या त्याची पावणी सुरू झाली असून जास्त बोली लावणारेच या मतांचे धनी होणार आहेत. त्यामुळे सामान्यपणे काही भागात एका मतासाठी दहा ते पंधरा हजारांची बिदागी दिल्याचा बोलबाला काणकोणात आहे. अटीतटीच्या निवडणुकीत आत्मविश्वास ढासळलेल्या उमेदवारांनी या पोस्टल बॅलट मतांवर नजर ठेवून आहेत. त्यासाठी मतदारांना कितीही रक्कम देण्यास ते तयार झाले आहेत. त्यामुळेच आता मतदारांची चांदी झाली आहे अशी चर्चा काणकोणात जोरदार सुरू आहे. ∙∙∙
टोनींचा आशीर्वाद
निवडणूक आचारसंहितेमुळे (Code Of Conduct) सरकारला अधिकार नसल्याने पंचायतींचे चांगलेच फावले आहे. आचारसंहिता लागू असल्याचे कारणे देऊन कामानिमित्त गेलेल्यांना त्यांची बोळवण करत आहेत. तसेच बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या व्यवसायाकडे हातमिळवणी करून डोळेझाक केली जात आहे. बांबोळी गोमेकॉ इस्पितळाबाहेर वाहनांसाठी पार्किंग जागा केली आहे. पार्किंगसाठी आत व बाहेर जाण्यासाठी दोन प्रवेश आहेत. पार्किंगमध्ये आत जाण्यासाठी असलेली जागा अडवून बिनधास्तपणे ‘नॉनवेज’ खाद्यपदार्थांची मोबाईल व्हॅन उभी केली जात असून सांताक्रुझ पंचायतीने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. वाहनचालकांना पार्किंग करण्यास अडचणी होत आहेत. आमदार टोनी फर्नांडिस व पंचायत सदस्य या ठिकाणी अनेकदा फेऱ्या मारताना दिसतात. मात्र, या बेकायदेशीर मोबाईल व्हॅनला राजकारणी व पोलिस यांचा आशीर्वाद असल्यानेच हे सर्वकाही बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्या मोबाईल व्हॅन मालकाची मते मिळण्यासाठी आमदाराने त्याकडे डोळेझाक करून सूट दिली आहे. ∙∙∙
शिवजयंतीचा असाही विसर
दरवर्षीप्रमाणे फर्मागुढीत शासकीय पातळीवर शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. सरकारी पैसाही बऱ्यापैकी खर्च झाला, पण हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केला जातो, त्या स्थळातील बांदोडा पंचायतीला साधे निमंत्रण दिले नाही असे खुद्द सरपंचाने जाहीरपणे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वच बाबतीत एक आदर्श व्यक्तिमत्व. मग त्यांची जयंती साजरी करताना हा भेदभाव सरकारी यंत्रणा कशी काय करते असा सवालही पंच मंडळाने केला आहे. पूर्वी म्हणे हे निमंत्रण व्यवस्थित पोचते केले जायचे, पण अलीकडच्या काळात या खात्याला पंचायतीचा सोयिस्कर विसर पडला असल्याचा आरोप झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमातही असा भेदभाव...? ∙∙∙ (Postal ballot voters became the target to get the majority for Goa Election 2022)
फोंड्यातील अशीही लढत
राज्यातील काही लढतींपैकी एक फोंडा मतदारसंघ. या मतदारसंघातील लढतीकडे नागरिकांचे बरेच लक्ष लागून राहिले आहे. तसे पाहिले, तर या मतदारसंघात भाजप (Goa BJP), काँग्रेस व मगो या पक्षातच खरी लढत अपेक्षित होती. पण अपक्ष उमेदवार संदीप खांडेपारकर यांनी या लढतीत ‘ट्विस्ट’ आणले आहे. संदीप हे भाजपचे एक नेते. त्यामुळे भाजपचे उमेदवार रवी नाईक यांच्या मतांवर परिणाम होणार का अशी चर्चा रंगत आहे. काहीजण म्हणतात बराच परिणाम होईल, तर काहीजण म्हणतात रवींनी राजकारणात अनेक पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे त्यांची रणनीती वेगळी असेल. अर्थातच या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे थोडे थांबून पाहूया काय होते ते. ∙∙∙
बाबुश मोन्सेरात अस्थिर
मतदान झाल्यानंतर बहुतेक उमेदवार रिलॅक्स होण्यासाठी गोव्याबाहेर जाऊन आले आहेत. नेहमी रिलॅक्स होण्यासाठी देशाबाहेर जाणारे धूर्त व चाणक्य राजकारणी बाबुश मोन्सेरात हे ताळगाव व पणजी मतदारसंघातील मतांचा स्वतः सर्वे करू लागले आहेत. सामान्य मतदारांशी गप्पाटप्पा करून त्यांच्याकडून मतविभागणी झाली का याचा अंदाज घेत आहेत. गेली दोन दशके निवडणुकीची रणनीती आखण्यात तसेच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात हातखंडा असलेले मोन्सेरात (Babush Monsrrat) या निवडणुकीत मात्र हलले आहेत. वारंवार ते कार्यकर्ते तसेच मतदारांबरोबर विविध वाड्यांवर जाऊन मते जाणून घेत आहेत. यावेळी पराभूत झाले, तर त्यांची कारकीर्दच संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे मतदानाचा निकाल त्यांची पुढील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. जे त्यांच्या विरोधात गेले आहेत त्यांचीही गणिते त्यांनी करून ठेवली आहेत व विरोधकही त्याला राजकारणातून फेकण्यास टपलेले आहेत याची जाणीव त्यांना आहे. ∙∙∙
डांबरीकरणाच्या श्रेयाचा वाद
काणकोणमधील लोलये, पैंगीण, आगोंद व अन्य भागात निवडणुकीपूर्वी अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण होणार होते. त्यासाठी काही रस्ते झाडू मारून स्वच्छ करण्यात आले होते. सत्ताधारी भाजपची उमेदवारी सत्ताधारी आमदाराला सोडून अन्य उमेदवाराला दिल्याने डांबरीकरणाचे श्रेय विद्यमान आमदारांना मिळेल या भीतीपोटीच सत्ताधाऱ्यांनी डांबरीकरणच केले नाही. मात्र, त्याचा विपरीत परिणाम मतदानावर झाला अशी चर्चा सध्या काणकोणात सुरू झाली आहे. डांबर काळा आणि ही कृती करणारे काळ्या वृत्तीचे असावेत अशीच चर्चा आहे. मात्र, या निवडणुकीमुळे रस्ते खड्डे मुक्त होण्याऐवजी खड्ड्याची व्याप्ती वाढली आहे आता गेम संपली, आता तरी रस्ते काळे करा अशी नागरिकांनी मागणी केल्यास त्यांचे काय चुकले... ∙∙∙
‘प्रियोळ’चा आमदार कोण?
प्रियोळ मतदारसंघातून कोण विजयी होणार? याबाबत उमेदवार संदीप निगळ्ये, गोविंद गावडे, दीपक ढवळीकर यांच्या समर्थकांत चढाओढ लागलेली आहे. प्रत्येकजण आपलाच नेता विजयी होणार असे ठामपणे सांगत आहे. काहीजण गावडे १७ हजार मतांनी विजयी होणार असे गणित मांडत आहेत. एका ग्रुपवर तर फक्त गोविंदराव किती मते घेणार याबाबत पैज लावली आहे. तसेच कोण किती मते घेणार हे सांगितले आणि ते तितकीच मते घेऊन विजयी झाले, तर त्या विजेत्याला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देणार असेही जाहीर केले आहे. याशिवाय मिक्सर, विद्युत तवा, इस्रीही बक्षिसादाखल ठेवलेली आहे. दोघांनी तर प्रतिसाद म्हणून गोविंदराव १३८४२ व १७६५४ मते घेणार असे जाहीर करून टाकले आहे, पण गोविंदरावांनी इतकी मते घेतली तर इतरांचे काय होणार? त्यांचा पत्ताच समर्थकांनी कापला की काय, अशी चर्चा प्रियोळात कोपऱ्या कोपऱ्यांवर सुरू आहे. ∙∙∙
‘आरजी’वाल्यांचा करिष्मा!
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’ने सर्वत्र उमेदवार पेरले होते; मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही अशी ‘भविष्यवाणी’ सध्या (‘आरजी’वाले सोडून) सर्वचजण व्यक्त करीत आहेत. आमचे सरकार गोव्यात स्थापन होईलच, असा दावा ते ‘आरजी’वाले करीत असले, तरी त्या पोकळ वल्गना ठरतात की ती वस्तुस्थिती असेल याची जाणीव गोमंतकीयांना आहेच म्हणा! असे असले तरी त्या पक्षाला किमान वीस-चाळीस हजार मते मिळतील एवढे मात्र निश्चित. एवढी मते मिळवणे म्हणजे दोन-चार आमदारांना मिळणारी मते असे गृहीत धरून हे आरजीवाले सध्या भलत्याच ऐटीत गोमंतकीय जनमानसात स्वत:च्या पक्षाला अर्थात गटाला असलेले महत्त्व सांगत सुटले आहेत. दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखाच हा प्रकार आहे, असे यासंदर्भात खुद्द त्यांच्या विरोधकांतही बोलले जात आहे. काही का असेना, आरजीचे नेते मनोज परब हे सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आले असून त्यांनी यंदाच्या निवडणुकीत स्वत:चा करिष्मा दाखवला, हेही नसे थोडके! ∙∙∙
सायबाची पैज!
‘वारे येता तशे सूप धरूक जाय’ अशी कोकणीत एक म्हण आहे. युरी आलेमाव यांच्या निवडणूक मंचावरून बोलणारे एक वकील जाहीरपणे सांगत होते, की वारे युरीच्या बाजूने वाहायला लागले म्हणून आपण क्लाफासची ऑफर सोडून युरीचा हात धरला. कुंकळ्ळीतून अपक्ष निवडणूक लढलेल्या संतोष फळदेसाईंची साथ सोडून युरीच्या व्यासपीठावर चढलेले एक सेवानिवृत्त पोलिस साहेब आता युरी जिंकणार म्हणून पैजा लावण्याची भाषा करीत आहेत. युरी आलेमाव निवडणूक जिंकणार म्हणून मी पंचवीस लाख रुपये पैज लावतो असे हा साहेब ओसरीवर बसून डरकाळ्या फोडतोय. आता सायबाकडे पंचवीस लाख आहेत की नाही हा प्रश्न वेगळा. मात्र, सायबाने हे सूप धनाच्या वाऱ्याच्या बाजूने फिरविले. आता लोक म्हणायला लागले आहेत साहेब यु टू? ∙∙∙
खरेच परिवर्तन होणार
गोवा मुक्त झाल्यानंतरची ही सर्वस्वी आगळीवेगळी निवडणूक ठरेल असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे. काहीजण तर यावेळी परिवर्तन होणार असे छातीठोकपणे सांगताना आढळतात. ही निवडणूक वेगळ्या प्रकारची ठरेल हे खरेच. कारण नेमके काय होईल, सत्ता स्थापन कोण करेल याचा अंदाज करणे अशक्य झाले आहे. एक खरे की अनेक रथी महारथींचे भविष्य टांगणीला लागलेले आहे. कारण निकाल प्रतिकूल गेला, तर राजकीय संन्यासाखेरीज त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नसेल. ∙∙∙
पंचायत निवडणुकीसाठी पुरुमेंत
पावसाळ्यासाठी जी पूर्व तयारी केली जाते तिला गोव्यात पुरुमेंत असे म्हटले जाते. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे हल्लीच जी विधानसभा निवडणूक पार पडली, तिच्या माध्यमातून अनेकांनी पंचायत निवडणुकीची बेगमी केली असे आरोप होऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले. उमेदवारांनी लोकांमध्ये वाटण्यासाठी कार्यकर्त्याकडे दिलेल्या रकमा त्यांच्यापर्यंत पोचल्याच नाहीत, काही ठिकाणी त्या पोचल्या तरी ते प्रमाण अल्प होते. असे सांगतात की या कार्यकर्त्यांनी मधल्यामध्ये आपली पंचायत निवडणुकीची तयारी केली. म्हणतात ना तळे राखेल तो पाणी चाखेलच. ∙∙∙
तृणमूलचे डॉक्टर जायंट किलर ठरणार?
जर धनाच्या बळावर निवडणुका जिंकणे शक्य असते, तर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बांदोडकर नव्हे तर चौगुले, साळगावकर किंवा धेंपे यांच्यासारखे धनवान मुख्यमंत्री बनले असते असे आम्ही नव्हे, तर मतदारच म्हणायला लागले आहेत. मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न धनाढ्य उमेदवारांनी केल्याचा आरोप सगळेच करतात. आता अशा स्थितीत स्वकष्टाची रोटी खाणारे डॉ. जोर्सन फर्नांडिस यांच्यासारख्या उमेदवारांची डाळ शिजणार का? असा प्रश्न मतदारांना पडणे स्वाभाविक आहे. मात्र, कुंकळ्ळी मतदारसंघात डॉ. जोर्सन, युरी, क्लाफास व संतोष यांच्यासारख्या धनाढ्य उमेदवारांना पराभूत करून जायंट किलर बनणार असा आत्मविश्वास डॉ. जोर्सन समर्थक करतात आता या आत्मविश्वासात किती दम आहे हे निकालानंतरच कळेल. ∙∙∙
मुख्यमंत्र्यांचे बक्षीस कोण जिंकणार?
कुंकळ्ळीत भाजपचे क्लाफास डायस आपली जागा राखणार असा आत्मविश्वास भाजपावाले व्यक्त करतात. २०१२ च्या निवडणुकीत जे यश राजन नाईक यांनी संपादन केले होते, त्याची पुनरावृत्ती होणार असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते करतात. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे बक्षीस आपणच जिंकणार असा दावा प्रमुख कार्यकर्ते करायला लागले आहेत. ज्या बुथवर भाजपाला सगळ्यात जास्त मते मिळणार त्या बूथ नेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे ‘चॅलेंज’ मुख्यमंत्र्यांनी दिले होते. नगरसेवक विदेश म्हणतात चॅलेंज आपण जिंकणार, नगरसेवक राहुल म्हणतात मीच लखपती होणार, तर दीपक खरंगटे, जॉर्जिना व रूपा गावकर हेही म्हणतात बक्षिस त्यांचेच. आता पाहूया चॅलेंज कोण जिंकणार. ∙∙∙
मुख्यमंत्री हवा निष्कलंकित
म. गो. नेते सुदिनराव हे हल्ली भन्नाट वक्तव्ये करू लागले आहेत. विशेषतः मतदानानंतरच्या त्यांच्या निवेदनाकडे पाहता त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसते. आता त्यामागील कारण काय त्याचे उत्तर तेच देऊ शकतात. पण ते असो, त्यांनी नवा मुख्यमंत्री निष्कलंकित असावा असे निवेदन केले आहे. त्यामुळे मगोवाल्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काहीजण तर असेही सवाल करू लागले आहेत, जे कोणी निवडून येणार आहेत ते तर प्रथम निष्कलंकित असायला हवेत ना म्हणजे पुढची वाट सोपी होईल. ∙∙∙
ग्रामसभांची ऐसी-तैशी!
गोव्यातील बहुतांश पंचायतींच्या ग्रामसभा केवळ नावापुरत्या घेऊन त्यासंदर्भातील कायदेशीर सोपस्कार कसाबसा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रत्ययास आले आहे. बार्देश तालुकावासीयांनाही याची प्रचिती आलेली आहे. ग्रामसभांत स्थानिक ग्रामसभा सदस्यांच्या प्रस्तावांवरही चर्चा करून निर्णय घेणे हे कायदेशीरदृष्ट्या अपेक्षित असताना केवळ मागील ग्रामसभेचे इतिवृत्त संमत करणे व पंचायतीचे अंदाजपत्रक संमत करणे हे दोनच विषय काही पंचायतींनी हाताळले आहेत. त्यामुळे या ग्रामसभांची ऐसी-तैसी झाल्याची भावना संबंधित पंचायत क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबाव गटांकडून अभिव्यक्त होत आहे. हा विषय सध्या ‘गोवा कॅन’ने पंचायत संचालकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ऐकिवात आहे. ∙∙∙
विरोधासाठी विरोध
कोविडचा संसर्ग घटल्यानंतर सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांपासून पालक ते शिक्षक सर्वांनाच समाधान वाटले. आश्चर्य म्हणजे कोणी राजकीय पक्षानेही त्याला हरकत घेतली नाही. अपवाद फक्त महिला काँग्रेसचा. त्यात त्यांचाही दोष नाही. कारण सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे हीच त्यांना शिकवण. त्याची इमानेइतबारे अंमलबजावणी बिनाबाईंनी केली व एक शिक्षिका असलेल्या त्या तोंडघशी पडल्या. त्यात त्यांचीही चूक नाही, राजकारणामुळे त्यांना हा विसर पडला असावा. ∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.