सुशांत कुंकळयेकर
सावर्डे: भाजपात असताना माजी मंत्री दीपक पाऊसकर यांचा ग्राफ एकदम खाली गेला होता. अशातच त्यांच्यावर नोकरभरतीत घोटाळा केल्याचा आरोप झाला. भाजप पक्षश्रेष्ठींच्या नजरेतून खाली पडलेले पाऊसकर याना भाजपने सावर्डेची उमेदवारी नाकारून ती गणेश गावकर यांना दिली. आणि इथेच पाऊसकर यांच्या नशिबाने उचल खाल्ली. (Sanvordem News Goa)
अपक्ष म्हणून रिंगणात उभे राहिलेले पाऊसकर यांना अकस्मात लोकांची सहानुभूती मिळू लागली. काही पंच सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. मतदान व्हायला केवळ दोन दिवस बाकी असताना सध्या पाऊसकरही मुख्य शर्यतीत पोहोचले असून, हा सामना एकतर्फी होणार नाही याचे संकेत मिळू लागले आहेत.
यावेळी सावर्डे मतदारसंघात भाजपचे गणेश गावकर, दीपक पाऊसकर आणि मणी लांबोर हे दोन अपक्ष, मगोचे बालाजी गावस, आपचे अनिल गावकर आणि काँग्रेसचे खेमलो सावंत असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. मणी लांबोर यांच्या रिंगणातील उपस्थितीमुळे या लढतीत खरा रंग भरला आहे. मणीच्या उपस्थितीमुळेच आता गावकर की पाऊसकर हा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वास्तविक 2012 पासून सावर्डेत गावकर विरुद्ध पाऊसकर हा सामना सुरू आहे. २०१२ मध्ये गणेश गावकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले पाऊसकर यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकत हा मतदारसंघ सर केला. मात्र, 2017 मध्ये मगोच्या उमेदवारी वर निवडणूक लढवीत पाऊसकर यांनी गावकर यांना चित केले. आता 2022मध्ये ते दोघे पुन्हा आमनेसामने आले आहेत.
दीपक पाऊसकर यांना भाजपने (BJP) उमेदवारी नाकारल्याने सध्या लोकांची सहानुभूती त्यांच्या बाजूला आलेली आहे. मंत्री असताना त्यांनी मतदारसंघात काही जणांना नोकऱ्या दिल्या तर काहींना नोकऱ्या देण्याचे सोपस्कार पूर्ण केले त्याचाही फायदा त्यांना होणार. मात्र त्यांच्यावर निष्क्रियतेचा जो ठपका बसला आहे तो त्यांच्या विरोधात जाणारा आहे.
भाजपवर खाणपट्ट्यात नाराजी
सावर्डे हा भाजपचा बालेकिल्ला. हल्लीच्या काळात फक्त दोनवेळा हा मतदारसंघ भाजपच्या हाताबाहेर गेला. लोकसभा निवडणुकीत अगदी विपरीत स्थिती असतानाही या मतदारसंघाने भाजपला पाठिंबा दिला. अशा या परिस्थितीचा भाजपचे गणेश गावकर याना निश्चितच फायदा होणार. मात्र त्यांचे फटकळ तोंड त्यांच्या आड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपने खनिज व्यवसाय सुरू केला नाही म्हणून खाणपट्ट्यात असलेली नाराजीलाही त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
कॉंग्रेसची तीन हजार मते, पण...
आपचे अनिल गावकर हे या मतदारसंघात ज्यांचे सर्वात अधिक प्राबल्य आहे त्या हिंदू एसटी समाजाचे प्रतिनिधी असल्याने या समाजाचा त्यांना काही प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो. सावर्डे मतदारसंघात काँग्रेसची (Congress) स्वतःची तीन हजारांच्या आसपास मते आहेत. मात्र काँग्रेसने बाहेरचा उमेदवार सावर्डेवर लादल्याने काँग्रेस मतदार कोणता निर्णय घेणार त्यावर त्यांचे उमेदवार खेमलो सावंत यांना किती मते पडतात ते अवलंबून असेल.
मगोचीही पारंपरिक मते
मगोचे बालाजी गावकर हेही शर्यतीत असून या मतदारसंघात मगोची काही पारंपरिक मते आहेत. त्याशिवाय गावस हे धारबांदोडा येथील माजी सरपंच असून विद्यमान पंच आहेत. ही सर्व परिस्थिती त्यांना फायद्याची ठरू शकेल. दुसरे अपक्ष उमेदवार मणी लांबोर हे धनगर समाजाचे प्रतिनिधी आहेत. ते कुळेचे सरपंच आहेत. त्यामुळे त्यांना या भागात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मात्र, त्यांनी भाजपची मते काढल्यास त्याचा फटका गावकर यांना बसू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.