डिचोली : भाजपने मये मतदारसंघात जो डाव खेळला आहे, तो त्यांच्याच अंगावर शेकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार प्रवीण झांट्ये यांना डावलून भाजपचे दिवंगत नेते व मयेचे माजी आमदार अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद शेट यांना उमेदवारी दिली आहे. खरे तर प्रेमेंद हे मगोपचे उमेदवार होते. त्यांची तशी ‘हवा’ही झाली होती. हे बघून भाजपने त्यांना आपल्या कळपात ओढून घेतले. हे करण्यामागे मगोपवर कुरघोडी करण्याचा भाजपचा हेतू होता. पण हा हेतू त्यांच्यावरच ‘बुमरॅंग’ होतो की काय, असे सध्याची परिस्थिती बघून वाटू लागले आहे. (Political Fight in Mayem Constituency News Updates)
शेट हे भाजपमध्ये (BJP) गेल्यावर विद्यमान आमदार प्रवीण झांट्ये यांनी मगोपचा आसरा घेतला. त्यामुळे आता झांट्ये विरुध्द शेट अशी लढत होणार असली तरी या लढतीत गोवा फॉरवर्डच्या संतोषकुमार सावंत यांच्या रूपाने तिसरा कोनही आहे. सावंत हे गेल्या खेपेला कॉंग्रेसच्या उमेदवारीवर मयेतून निवडणूक लढले होते. त्यांचा भाजपच्या प्रवीण झांट्ये यांनी सुमारे ५ हजार मतांनी पराभव केला होता. पण यावेळी कॉंग्रेसने (Congress) मयेची जागा युतीचा घटक पक्ष गोवा फॉरवर्ड यांना दिली. त्यामुळे कॉंग्रेस सोडून फॉरवर्डमध्ये गेलेल्या सावंत यांना लॉटरी लागल्यासारखे झाले आहे.
मये हा प्रामुख्याने मगोपचा (MGP) बालकिल्ला म्हणून पूर्वी ओळखला जायचा. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर या मतदारसंघातून १९८९ व १९९४ साली अशा दोनदा निवडून आल्या. नंतर हा मतदारसंघ भाजपने काबीज केला. भाजपचे अनंत शेट या मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आणि मागच्या वेळीही भाजपनेच विजय प्राप्त करून विजयाची हॅटट्रिक केली होती. मये मतदारसंघात मये, शिरगाव, नार्वे, चोडण, पिळगाव, सर्वण-कारापूर, वनमावळिंगे-कुडचिरे या सात पंचायती येतात. मये येथील तळे हे गोव्यातील एक प्रख्यात पर्यटन स्थळ. पण सध्या या स्थळाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. चोडण बेटावरही हाच प्रकार दिसतो आहे.
मगोपमधील बंडाळी झांट्येंना भोवणार?
मगोपतर्फे प्रवीण झांटये हे जरी रिंगणात उतरले असले तरी त्यांचीसुध्दा येथे कसोटी लागणार आहे. याचे कारण म्हणजे मगोपचेच एक ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद पिळगावकर हे अपक्ष म्हणून रिंगणात असल्यामुळे झांट्ये यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. मगोपची किती मते घेतात, यावर झांट्ये यांचे यशापयश अवलंबून आहे. पिळगावकर हे मगोपचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते.
भाजपच्या खेळीमुळे झांट्येंना सहानुभूती
वास्तविक मयेची ‘हवा’ झांट्ये यांना म्हणावी तशी अनुकूल नव्हती. पण भाजपने त्यांचा ‘पत्ता कट’ केल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळू लागली आहे. या सहानुभूतीचा फायदा ते किती घेतात ते बघावे लागेल. मयेत भाजपची एकगठ्ठा मते आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.