Goa Assembly 2022  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

परत जायला मी काय मोदी आहे? खरी कुजबूज!

खुर्च्या भरल्या नाहीत, असे कारण सांगून सभा सोडून जाण्यास मी थोडाच पंतप्रधान आहे: कन्हैया कुमार

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Election 2022

टॉनिक मायकल

मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये जाण्यास खूप उशीर केला. या अगोदर काँग्रेसचेच नेते नाराज नव्हते, तर पत्रकारही कंटाळले होते. याचे कारण ते जाणार जाणार असे सांगून माध्यमांनी तारीखही जाहीर केली होती. परंतु शेवटी लोबोंना सोमवारचा मुहुर्त सापडला, असे म्हणतात. मायकल आचारसंहिता लागू होण्यापर्यंत का थांबले असतील? याचे कारण त्यांच्या मतदारसंघात वाटण्यात आलेल्या नोकऱ्या. ते म्हणतात, सरकार स्थापन करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पर्रीकरांना पाठिंबा दिला. अशा वेळी मतदारसंघात काही प्रमाणात नोकऱ्या वाटायला म्हणजे टॉनिक वाटायची संधी हवीच होती. पाठीराखेही डोळे लावून बसले होते. त्यामुळे शेवटची फाईल क्लिअर होईपर्यंत थांबलो आणि उमेदवारांच्या हातात नियुक्तीपत्रे ठेवता आली. आता म्हणे, पक्षबदल करण्यास मायकल लोबो मनाने तयार झाले आहेत. ∙∙∙

मायकलचा दणका

आचारसंहिता लागण्यापूर्वी कोरोनाचे सावट असतानाही शनिवारी अनेक उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वत:चा प्रचार दिमाखात मिरवला. त्यात एक मायकल लोबो होते. त्यांनी शिवोलीमध्ये पत्नी दिलायला यांच्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रचार मोहीम राबवली. ते स्वत: कळंगुटच्या पर्रा भागात फिरले. त्यांनी ‘टुगेदर फॉर बार्देश’चा डंका वाजवला आहे आणि जयेश साळगावकर तसेच रोहन खंवटे जर त्यांच्यासोबत असते तर निश्‍चितच भाजपला हादरा दिला असता. सध्या म्हापसा, शिवोली, कळंगुट व साळगावमध्ये ते निश्‍चितच धमाका करण्याच्या तयारीत आहेत. साळगावमध्ये वारे परतायलाही सुरवात झाली आहे. ∙∙∙

याचसाठी केला होता अट्टहास

मायकल लोबो पुढच्या दोन दिवसांत काँग्रेसमध्ये (Congress) जाणार असल्याचे आता पक्के ठरले आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या सुकाणू समितीतील आपल्या निकटच्या मित्रांना शेवटी आपल्या निर्णयाची कल्पना दिली. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यानंतरचे ते एक सर्वांत ज्येष्ठ सदस्य ठरणार आहेत. ते तीन वेळा निवडून येणारे आमदार बनतील आणि उद्या त्यांचे सरकार आल्यास उपमुख्यमंत्रिपदावरही दावा करू शकतील. एवढे महत्त्वाचे पद भाजप त्यांना कधीही देणार नाही. कळंगुटमध्ये पन्नास टक्के ख्रिस्ती मते आहेत आणि भाजपमध्ये राहून ते गोव्याचे नेते कधीच बनू शकणार नव्हते. एक गोष्ट खरी आहे की, मायकल काँग्रेसमध्ये गेल्यावर त्या पक्षाचे खचलेले नीतिधैर्य पुन्हा उंचावेल आणि पक्षातील नेत्यांची जीवात जीव येईल. बार्देशमध्ये सध्या काँग्रेसला कोणी पुसत नाही. ∙∙∙

kanhaiya kumar statement against pm narendra modi

केदार नाईक यांची हवा

गोवा फॉरवर्डमधून (Goa Forward) साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांना भाजपमध्ये जाण्याची कोणती दुर्बुद्धी झाली कोण जाणे. परंतु सध्या त्यांचे फेरे उलटे पडले आहेत. रेईश मागूशचे सरपंच केदार नाईक यांनी अचानक तिथे उचल खाल्ली आहे. त्यांना मायकल लोबो यांचा नैतिक पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसची उमेदवारी सुकर झाली असली तरी, तेथे आपल्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे केदार यांनी अल्पावधीत राजकीय स्थान प्राप्त केले. केदार हे सरपंच म्हणून लोकप्रिय तर आहेतच, शिवाय एक गर्दी जमवणारे रसायनही आहेत. १४ ऑगस्ट रोजी भाजपच्या मेळाव्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी गर्दी जमवली. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपच्या अनेक नेत्यांनी धरला होता. परंतु भाजपच्या संघटनमंत्र्यांनी भंडारी समाजाचा उमेदवार हवा, असा आग्रह धरला आणि दिलीप परूळेकर यांच्यानंतर जयेश साळगावकर यांच्या नावाभोवती वलय निर्माण झाले. केदार नाईक हे विनम्र तसेच मवाळ व्यक्तिमत्त्व. त्यांची रेईश मागूश ही गोव्यातील एक श्रीमंत पंचायत मानली जाते. तिथे श्रीमंत दिल्लीकरांनी बंगले उभारले आहेत आणि ते केदार यांचा निवडणूक खर्च उचलायला तयार आहेत. त्यांच्या पत्नी दंतचिकित्सक असून उच्चभ्रू ख्रिस्ती समाजातील आहेत. त्या उच्चभ्रू समाज आणि चर्चचा पाठिंबा मिळवू शकतील. त्याशिवाय एकेकाळचे प्रसिद्ध पत्रकार जयप्रकाश नाईक यांचे ते सुपुत्र. जयप्रकाश यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून एकजण अमेरिकेत असतो. त्यामुळे या केदारने जयेशला निवडणुकीआधीच घाम फोडला तर नवल ते काय? ∙∙∙

पुत्रप्रेम आणि वजन!

कुडतरी मतदारसंघात खासदार फ्रान्सिस सार्दिन पुत्रप्रेमाने आंधळे झाले आहेत. गेल्या वेळी फ्रान्सिस सार्दिन यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड यांना पाठिंबा दिला नव्हता. त्‍यांचे पुत्र शेलॉम यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता सार्दिन हे शेलॉम यांना अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाला इशारे देत सुटले आहेत. काल त्यांनी मी गप्प बसणार नाही, अशी दर्पोक्तीही केली. वास्तविक कुडतरीमध्ये निवडणूक लढवायची असती तर शेलॉम यांनी गेल्या सहा महिन्यांत आपले वजन घटवण्याची आवश्‍यकता होती. त्यांना दोन वाडेही चालता येतील का, हा खरा प्रश्‍न आहे. याचे कारण सध्या उमेदवारांना घरोघरी फिरावे लागते. ती एक तर सवय मोडली असावी किंवा कुडतरीत यापुढे निवडणूक लढवायची नाही, असा त्यांनी संकल्प केला असावा. एकूण काय तर शेलॉम प्रचंड वजन वाढवून बसले आहेत. ∙∙∙

पणजीमध्ये काय करामत घडेल?

पणजीमध्ये उदय मडकईकर तसेच सुरेंद्र फुर्तादो या दोन्ही काँग्रेस उमेदवारांनी सध्या प्रचार गुंडाळून ठेवला आहे. याचे कारण काँग्रेसने अचानक एल्विस गोम्स यांच्या नावाची सुरू झालेली चर्चा. एल्विसचे नाव पुढे आल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचार थांबवला असला तरी दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास त्यांच्यासाठी काम करू, अशी ग्वाही दिली आहे. एल्विस यांचा पणजीमध्ये काहीच बोलबाला नाही. ते ४ हजार मतेही मिळवू शकणार नाहीत, असे काँग्रेस समर्थकांना वाटते. गिरीश चोडणकर यांना तेथे साडेपाच हजार मते पडली होती. त्याउलट यतीन पारेख यांनी सहा हजार पाचशे मते मिळवली होती. भाजपने येथे केलेल्या एका सर्व्हेक्षणात बाबूश मोन्सेरात पहिल्या पसंतीचे व त्यांची स्वत:ची पाच हजारांवर मते असल्याचे आढळून आले होते. परंतु काँग्रेसला वाटते, पणजीमध्ये उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहणार असल्याने भाजपची मते विभागली जाऊ शकतात. त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. यापूर्वी स्वत: मनोहर पर्रीकर भाजपशी तडजोड करायचे, असा भाजपवाल्यांचा सूर आहे. त्यामुळेच उत्पल यांनी येथे धाडस करू नये, असा सल्ला हल्लीच अमित शहा यांनी दिला आहे. परंतु उत्पल ठाम आहेत आणि काँग्रेसही सध्या कुंकळ्ळीच्या पडेल उमेदवाराला पणजीमध्ये मारून मुटकून उभा करण्याच्या तयारीत आहे. ∙∙∙

विजयाचा मंत्र

निवडणुका जिंकण्यास एखादा खास विजयाचा फॉर्म्युला आहे का? असे विचारल्यास आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो, ‘हो आहे.’ निवडणुका जवळ आल्या की राजकारणी निवडणुका जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करतात. सत्ताधारी नोकरीचे आमिष दाखवितात. विकासकामाचे गाजर दाखवितात. उमेदवार धनाचा वर्षाव करतात. गावातील रस्त्यांवर डांबर पडते. या विजयी फॉर्म्युलावर भाष्य करताना एका व्यक्तीने छान पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केली आहे. ‘पाऊस आला की मातीचा वास येतो आणि निवडणुका आल्या की डांबराचा वास येतो.’ हे एक कडवे सत्य मोजक्याच शब्दांत त्याने मांडले आहे. ∙∙∙

सरकारचा कोविड लकवा

राज्य सरकारच्या कोविडविषयक तज्ज्ञ समितीची बैठक शनिवारी झाली. पुढच्या दहा ते पंधरा दिवसांत कोविडग्रस्तांची संख्या दुसऱ्या लाटेहूनही तीन टक्के जास्त असेल, असा अंदाज या बैठकीत व्यक्त झाला. परंतु संख्या वाढूनही रुग्णालयात जाण्याइतपत आजाराची तीव्रता नाही, असा एक दृष्टिकोन बैठकीत व्यक्त झाला. दक्षिण गोव्यात सध्या सरकारने कोरोना सेंटर सुरू केलेले नाहीत. केंद्र सरकारने आदेश देऊनही राज्य सरकार याबाबत उदासीन आहे. गोमॅकोतील विभाग पूर्ण भरल्यानंतरच आम्ही दक्षिण जिल्हा रुग्णालय सुरू करू, अशी भूमिका सरकारने जाहीर केली आहे, जी खोडसाळपणाची आहे. परिणामी अनेक वृद्धांना, ज्यांना इतर आजारही आहेत त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाट शुल्क भरून भरती व्हावे लागते. अशा अनेक रुग्णालयांमध्ये जेवणाचीही सोय नाही, त्यामुळे रुग्णांचे होल होत आहेत. वरून सरकार म्हणते, रुग्णालयात कोविडग्रस्तांना पाठवण्याची आवश्‍यकता नाही. सरकारच्या या दृष्टिकोनाचा फटका भाजपच्या एका नेत्यालाही बसला. त्याचे आई-वडील कोविडग्रस्त आहेत. ∙∙∙

मडगावातील बाबूनगरी

बाबू आजगावकर मडगावमध्ये उभे राहिले तर त्यांना आठ हजारांचे मताधिक्य देऊ, अशी गर्जना सध्या तेथील भाजप शाखेने केली आहे. एका हवाल्यानुसार, मडगावमध्ये झोपडपट्टीतील मतेच सहा हजारांच्या वर आहेत आणि हे लोक प्रामाणिकपणे मतदान करतात. बाबूनगरी म्हणून जी आहे, ती तर आजगावकरांनीच वसवली आहे. शिवाय दोन दिवसांपूर्वी कब्रस्तानचा प्रश्‍न यशस्वीरित्या सोडवल्याचा दावा बाबू करत आहेत. त्यामुळे त्या समाजाची मते आपल्याला मिळतील, अशी बाबू यांची धारणा आहे. परंतु दिगंबर कामत यांचेही या समाजामध्ये काम आहे. गेली २५ वर्षे कामत यांनी झोपडपट्टी भागात आपले स्थान निर्माण केले. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मडगावात कामत यांनी जोरदार प्रचार यंत्रणा उभी केली होती. त्यावेळी सारस्वत मते बरीचशी हलली, परंतु अल्पसंख्याकांची मते मात्र कामत यांच्या पारड्यात पडली. यावेळी भाजपच्या प्रयोगाला सारस्वत मंडळी मात्र बळी पडणार नाही, असे पक्के वाटते. इतर ठिकाणची त्यांची मतेही बिचकतील. भाजपला तो धोका आहेच. तरीही मडगावमध्ये यावेळी बाबू यांच्यासह घन:श्‍याम शिरोडकर वगैरे मंडळी कामत यांना घाम काढण्याचा प्रयत्न जरूर करतील. परंतु शेवटी त्यांनाच घाम फुटला नाही म्हणजे मिळवले... ∙∙∙

निधीसाठी आटापिटा

दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यायले जाते, असे म्हणतात. पण कदाचित राजकारणी त्याला अपवाद असावेत. अन्यथा तृणमूल कॉंग्रेसशी युती केल्यानंतर मगो कार्यकर्त्यांकडून ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यानंतर अन्य पक्ष त्या फंदात पडले नसते. आता अशी विरोधी युती झालीच तर या पक्षांना तृणमूल कॉंग्रेसमुळे फटका तर बसणार नाही ना? की त्या पक्षाकडून मिळणाऱ्या निधीसाठीच हा सारा आटापिटा आहे? अशी शंका उपस्थित केली जात आहे. ∙∙∙

लेटलतीफ

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युती झाल्याने मांद्रे मतदारसंघ विशेषतः चर्चेत आला आहे. येथे कॉंग्रेसचे सचिन परब की फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर युतीचे उमेदवार असतील? हा यक्षप्रश्न आहे. मतदारसंघात गेली पाच वर्षे काँग्रेसचा झेंडा फडकत आहे. मात्र, गट समिती, बूथ समिती अद्याप कागदावरच आहे. त्यानंतर मागून आलेल्या गोवा फॉरवर्डने गट समिती जाहीर करून बाजीही मारली. मग काँग्रेसचे अद्याप तळ्यात-मळ्यात का, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत. कित्येकांच्या नेमणुका झाल्या; मात्र अधिकृतपणे नाही. काँग्रेसचे कार्य तीन-चार नेत्यांमुळे खालावले आहे, असे कार्यकर्ते खासगीत बोलतात. त्यांना दूर करण्याचे धाडस पक्षश्रेष्ठी दाखवत नाहीत, तोवर मांद्रे काबीज करणे कठीण आहे. काँग्रेस नेते कधीच एकसंघ नसतात. त्यांच्या पायघड्या अन्य पक्षांच्या दावणीला बांधलेल्या असतात, हे कैकवेळा दिसून आले आहे. तूर्तास मांद्रेत काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ∙∙∙

परत जायला मी काय मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचा दौरा सुरक्षेच्या कारणावरून सोडला, की लोकांचा विरोध असल्यामुळे यावर देशभरात उलट-सुलट चर्चा सुरू असताना शुक्रवारी मडगावात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेले कन्हैया कुमार यांनी यावर अफलातून कोटी केली. मडगावात झालेल्या या सभेला सुरवातीला विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने ही सभा दीड तास उशिरा सुरू झाली. यावर कुमार यांना काही पत्रकारांनी विचारलेसुद्धा. यावर कुमार म्हणाले, खुर्च्या रिकाम्या होत्या. त्या भरण्याची वाट पाहात मी थांबलो होतो. खुर्च्या भरल्या नाहीत, असे कारण सांगून सभा सोडून जाण्यास मी थोडाच पंतप्रधान आहे?∙∙∙

रणरागिणी गेल्या कुठे?

राज्यात एकीकडे निवडणुकीचा जोर, तर दुसरीकडे कोरोनाचा कहर. यात बिचारी जनता महागाईच्या ज्वाळेत होरपळून जात असताना भाजपच्या रणरागिणी कुठे गायब झाल्या? अशी चर्चा सुरू आहे. आता निवडणूक आल्याने महागाईसंदर्भात काय बोलणार त्याची तयारी करून गेलेले बरे. एरवी रस्त्यावर चूल मांडून महागाईचे प्रदर्शन करणाऱ्या कुंदा, मंदा कुठे गायब झाल्या, की त्यांना महागाईचे चटके बसलेच नाहीत? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. केवळ राजकारण करण्यासाठी महिलांना एकत्र करून रस्त्यावर चूल मांडणाऱ्या रणरागिणींनी महागलेल्या भाजी, कडधान्य, तेलाविषयी आवाज काढून खऱ्या अर्थाने रणरागिणी असल्याचे दाखवण्याची मागणी महिला करत आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT