Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

चर्चा रिकाम्या खुर्च्यांची! खरी कुजबूज...

दैनिक गोमन्तक

चर्चा रिकाम्या खुर्च्यांची

फोंड्यातील केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या जाहीर प्रचार सभेला प्रचंड गर्दी लाभली होती. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले फोंड्यातील उमेदवार रवी नाईक यांच्या प्रचारासाठी ही सभा होती. सभा सुरू झाली आणि बऱ्याच खुर्च्या खाली असलेल्या दिसल्या. सभेला सुरवात झाली तरी म्हणावी तशी गर्दी नसल्याने आयोजकही चुळबुळत होते. मात्र हळूहळू रिकाम्या खुर्च्या भरायला सुरवात झाली, आणि राजनाथ सिंग आल्यावर तर तुडुंब गर्दी जमली. या गर्दीमुळे एका अर्थाने रवी नाईक यांचे समर्थक खूष झाले. कारण जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद लाभल्याने यावेळेला फोंड्यात नक्कीच इतिहास घडेल आणि कधी नव्हे ते कमळ फुलेल असा दावाही रवी नाईक यांच्यासह सर्वच वक्त्यांनी केल्याने सभेत उत्साह संचारला. पाहुया काय होते ते कारण घोडा मैदान जवळच आहे ना...! ∙∙∙

‘मामी’च्या नावाने प्रचार

सांताक्रुझ मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून आला आहे त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार टोनी फर्नांडीस यांना धोका आहे. काँग्रेस उमेदवार रुदॉल्फ फर्नांडिस यांच्यासोबत सध्या त्यांच्या आई व्हिक्टोरिया फर्नांडीस नाहीत. सांताक्रुझमध्ये त्यांना ‘मामी’ म्हणूनच मतदार ओळखत होते. ‘मामी’ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निवडून आणण्याची विनंती त्यांचे पुत्र रुदॉल्फ मतदारसंघात प्रचारावेळी करत आहेत. टोनी फर्नांडिस यांनी लोकांना न जुमानता भाजपमध्ये गेल्याने मतदारांमध्ये रोष आहे. सांताक्रुझ मतदारसंघ काँग्रेसचाच राहिला आहे त्याचे रुपांतर भाजपमध्ये करण्याचे भव्यदिव्य टोनी यांना करावे लागणार आहे. यावेळी त्यांच्या जोडीला प्रचारासाठी बाबुश मोन्सेरात यांची साथ नाही. काँग्रेसची तिकीट मिळण्यासाठी इच्छुक असलेले व ती न मिळालेले उद्योजक त्यांना पाठिंबा देत आहेत ती एक जमेची बाजू आहे. ∙∙∙

रेजिनाल्ड कुणाचे?

रेजिनाल्ड लॉरेन्स यांना काँग्रेसने (Goa Congress) उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविताना भाजपचा पाठिंबा मागितला होता हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यावेळी भाजपने कुडतरीत आमचा स्वतःचा उमेदवार आहे असे सांगून तिथे अँथनी बार्बोजा यांना उमेदवारी दिली. असे जरी असले तरी हाऊसिंगबार्डमधील येणाऱ्या तीन नगरसेवकांना याची माहिती नाही का? असे विचारण्यात येत आहे. मडगाव नगरपालिकेचे हे तिन्ही प्रभाग कुडतरी मतदारसंघात येत असून, हे तिन्ही नगरसेवक अँथनी यांना पाठिंबा न देता रेजिनाल्ड यांना देत आहेत. भाजप मंडळाचे काही पदाधिकारीही रेजिनाल्ड यांच्याबरोबर दिसत आहेत. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला आहे, रेजिनाल्ड खरेच अपक्ष की भाजपाचाच उमेदवार. ∙∙∙(gossip about Ravi Naik's goa election 2022 campaign meeting)

रेट वाढला

राज्यातील यंदाची निवडणूक बऱ्याच गोष्टींमुळे लक्षवेधी ठरलेली आहे. विधानसभा रिंगणात उभी असलेली पाच दाम्पत्ये, रिंगणात उतरलेले पर्रीकर पुत्र अशी अनेक त्यासाठी उदाहरणे देता येतील. ही निवडणूक आणखी एका कारणासाठी लक्षणीय ठरणार आहे, ती म्हणजे मतांसाठी देण्यात येणाऱ्या रेटमध्ये झालेल्या वाढीमुळे. पूर्वी मडगावात हे काम 500 रुपयांत व्हायचे; मात्र भाजपने बाबूंना मडगावातून उतरविल्यामुळे हा रेट प्रत्येक मतामागे 2 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तिथे केपेत तर एक वजनदार उमेदवार दर मतामागे 5 हजार देतो, असे सांगितले जाते. आता तिथे पणजीत आणि वाळपईत किती रेट चालू आहे ते मात्र कळू शकले नाही. ∙∙∙

अर्थपूर्ण फेरप्रवेश

अगदी काही महिन्यांपूर्वी दामू नाईक हे नाव ऐकले तरी ज्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडायची ते गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) माजी फातोर्डा गट अध्यक्ष सुजय लोटलीकर. ते गोवा फॉरवर्डच्या नगरसेविका श्वेता लोटलीकर यांच्याबरोबर बुधवारी पुन्हा भाजपात म्हणजे स्वगृही प्रवेशकर्ते झाले. का तर म्हणे, गोवा फॉरवर्डमध्ये त्यांची घुसमट होत होती. निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा स्वगृह प्रवेश बराच अर्थपूर्ण मानला जातो. काही वर्षांपूर्वी याच सुजयने असाच अर्थपूर्ण गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला होता. आता अर्थपूर्ण म्हणजे काय याचा अर्थ ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार लावावा एवढीच प्रार्थना!

छप्पर फाडके!

गोवा विधानसभेची (Goa Assembly Election) होऊ घातलेली निवडणूक ही मतदारांसाठी अलीबाबाची गुहा तर ठरणार नाही ना? असा प्रश्न विविध पक्षांनी जारी केलेले जाहीरनामे वा वचननामे पाहून पडल्याशिवाय रहात नाही. अपक्षांचाच केवळ नाही तर राजकीय पक्षांचासुध्दा भर महिलांवर दिसून येतो. सवलतीच्या दरात गॅस त्यांच्यासाठीची आर्थिक मदत पाहिली तर भविष्यात कोणी महिलांचा सर्व खर्च करण्याची घोषणा केली तर आश्चर्य वाटणार नाही. आता सत्तेवर आलेले हा सर्व खर्च कसा करणार असा प्रश्न करण्यात अर्थ नाही. कारण सर्वांचे जाहीरनामे अशा आश्वासनांनी भरून वाहत आहेत. परत भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. भविष्यात अशी सोय देणे शक्य आहे तर आताच ती सवलत देणे शक्य नव्हते का? असे लोक विचारू लागले आहेत. ∙∙∙

म्हापशात लोबोंचा करिष्मा!

भाजप सरकारातील माजी मंत्री मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बार्देश तालुक्यातीत इतर मतदारसंघांप्रमाणे म्हापशातील काँग्रेसजनांतही नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे, या मतदारसंघात इतर पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या हाताची बोटे मोजण्याइतपत अतिशय नगण्य, तर भाजप व इतर पक्षांमधून काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या त्याच्या दहा-पट झालेली आहे. माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना जाहीर पाठिंबा देऊन ते कांदोळकर यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होत असल्याची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेले संजय बर्डे यांनी सध्या काँग्रेस प्रक्षात प्रवेश करून कांदोळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा सारा मायकल लोबो यांचा करिष्मा असल्याचे काँग्रेसजनांत बोलले जात आहे. ∙∙∙

कांदोळकर समर्थकांचा संताप

प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जेरीस आणण्याचा प्रयत्न सध्या भाजपचे कार्यकर्ते करीत असल्याचा बोलबाला आहे. म्हापसा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर पैसे वाटप करीत असल्याच्या प्रकरणी खुद्द म्हापसा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून पोलिस तक्रार दाखल झाली आहे, असेही ऐकिवात आहे. त्या तक्रारीनंतर कांदोळकर यांच्या पाकिटात केवळ सहाशे ते सातशे रुपये सापडले आहेत, ही बाब उघडकीस आली आहे. पराभव समोर दिसून येत असल्याने भाजपवाल्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, कांदोळकर यांनी प्रचारच करू नये या उद्देशाने ते पोलिस चौकशीच्या ससेमिऱ्याला समोरे जाऊन त्यांना व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप सध्या म्हापसा गट काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर करीत आहेत. हा सारा खटाटोप विरोधकांची सतावणूक करण्याच्या उद्देशानेच भाजपकडून केला जात आहे, असाही आरोप कांदोळकर यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. ∙∙∙

मुकद्दर का सिकंदर

सर्वात शेवटी आपला निवडणूक जाहीरनामा प्रस्तृत करून भाजपने आपली चलाखी दाखवून दिली आहे. त्यांनी जाहिरनाम्याला संकल्पपत्र असे जरी संबोधलेले असले तरी मतदारांना भुलविण्याचाच तो एक प्रकार असल्याचे स्पष्ट होते. यावेळी काँग्रेसबरोबरच आप, तृणमूल यांच्याबरोबर गाठ असल्याने त्या सर्वांच्या जाहीरनाम्यातील घोषणा व आश्वासनांचा आढावा घेऊनच भाजपाने मतदारांवर अधिक सवलतींची खैरात करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षाला तीन मोफत गॅस सिलींडर वा दयानंद सामाजिक सुरक्षेतील मदतीतील वाढीची घोषणा हा त्याचाच एक भाग आहे. आता मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात ते निकालानंतरच उघड होईल. असे म्हणतात यावेळी भाजपच्या बऱ्याच दांड्या उडू शकतात. त्यामुळे हा सारा खटाटोप का? ∙∙∙

उमेदवारांमध्ये ‘सेटलमेंट’

राज्यात जोरात प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना कोविडसंदर्भात मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. मात्र, त्याची पर्वा कोणीच करत नाही. सर्वच राजकीय पक्ष त्याचे उल्लंघन करत असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे या पक्षांनी तक्रार न करण्याचे सेटलमेंट केले की काय असा प्रश्‍न उभा होत आहे. भाजप व काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभांना अलोट गर्दी होत असताना निवडणूक यंत्रणाही सुस्त बनली आहे. राजकीय पक्षांनी या सभांबाबत ‘तुम भी चूप हम भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे. सभेच्या ठिकाणी पोलिस यंत्रणा सज्ज असते मात्र या कोविड नियमांचे पालन न केल्याने त्या बंद करण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे पोलिय यंत्रणाही चिडीचूप आहे. कोणी तक्रार केलीच तर ती सभा पूर्ण होईपर्यंत कारवाईच होत नाही. सभांना होणारी गर्दी पाहून गोवा कोरोनामुक्त झाला आहे की काय असा प्रश्‍न लोकांमध्ये उपस्थित होत आहे. लोकांना सर्व नियम लागतात मात्र राजकीय नेत्यांच्या या सभा ते लागू होत नाहीत असेच चित्र दिसून येत आहे. ∙∙∙

गुप्त बैठकीचा फज्जा

निवडणूक जवळ येताच सर्वच पक्षांना समाजाची आठवण येते. अशीच एक घटना घडली ती नेत्रावळीत. एसटी समाज मोर्चाची एक बैठक नेत्रावळीत बोलाविण्यात आली होती. पण, राजकारण म्हटले की सर्वचजण येणार. त्यात भाजपा, काँग्रेस, अपक्ष सर्वच आले होते. त्यात एक कार्यकर्ता चांगलाच भडकला. निवडणूक जवळ आली की, समाज का आठवतो. इतर काळात समाज कुठे होता. आम्ही स्वतंत्र असून आमचा समाज राजकारणी लोकांच्या दावणीला बांधू नका, असा स्पष्ट इशारा देताच भाजपा समर्थनासाठी बोलाविलेली बैठक अर्ध्यावरच कोडमडली. ∙∙∙

लोबो, राजदीपचा गोविंदवर निशाणा

मायकल लोबो यांनी ताळगाव येथे टोनी यांच्या प्रचारादरम्यान कला अकादमीच्या डागडुजीसाठी 55 कोटी खर्च हा महाघोटाळा आहे. प्रत्यक्षात त्या खर्चात सात मजली इमारत झाली असती. एवढेच नव्हे, तर केवळ 22 कोटी खर्चून हे काम सहज होऊ शकले असते, असे मत लोबोंनी व्यक्त केले. आपल्या स्वतःच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवावरून आपण बोलत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच ज्या नोकऱ्या विकल्या गेल्या आहेत त्यासंबंधीची प्रकरणेही बाहेर काढू, असे ठामपणे त्यांनी सांगितले. दुसरीकडे ‘वासंती’ फेम राजदीप यांनी कोरोना काळात ज्या कलाकारांवर वाईट परिस्थिती आली त्यांना पाच-दहा हजार रुपये आर्थिक मदत कला संस्कृती खत्यातर्फे देण्याची योजना गोविंद गावडे यांनी जाहीर केली होती तेव्हा ‘ही भीक कलाकारांना नको’ अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी राजदीप यांची गाडी फोडली गेली. या संदर्भात त्यांनी एका व्हिडिओद्वारे गोविंदरावावर निशाणा साधत म्हटले की, ‘या संभाजीची तलवार आता आम्ही कायमची म्यान करणार.’ ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट काजू आणि बेकायदेशीर सिगारेट जप्त!

Goa Sunburn: सनबर्नच्या 100 कोटी मानहानीच्या दाव्यावर पार पडली सुनावणी; काय म्हणाले कोर्ट वाचा

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Digital Arrest पद्धतीने अहमदाबादच्या महिलेची पाच लाखांची फसवणूक; CBI अधिकारी असल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT