Goa Assembly 2022 : गोव्यातील ही खरी कुजबूज Dainik Gomantak
गोवा निवडणूक

ही आहे गोव्यातील खरी कुजबूज..!

गोव्यातील तापलेल्या राजकारणाला कुजबूज चा 'तडका'..

दैनिक गोमन्तक

Goa Assembly 2022 :

अस्वस्थ बाबुश

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे निवडणुकीत उतरल्यापासून विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांनी मुंबई ते दिल्ली वाऱ्या सुरू केल्या. मुंबईतील भाजप नेते त्यांना भेटले मात्र दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची भेटण्याची वेळ न मिळाल्याने ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. भाजपमध्ये असूनही त्यांनी आपल्या कार्यालयातील पक्षाचे चिन्ह हटविले आहे. मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यीकरण लोकार्पण कार्यक्रमावेळी ते व त्यांचे पुत्र महापौर सुद्धा अनुपस्थित राहिले होते. मंत्री जेनिफर मोन्सेरातही या कार्यक्रमाला दिसल्या नाहीत. त्यामुळे मोन्सेरात कुटुंब भाजपपासून दूर जात आहे असे पणजी व ताळगावात लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी बाबुश मोन्सेरात ‘गेम प्लॅन’ बदलण्यात तरबेज आहेत त्यामुळेच तर पडद्यामागील सूत्रधार म्हणून ते परिचित आहेत. तिसवाडीमध्ये अधिकाधिक आमदार निवडून आणून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ∙∙∙

शोलेचे ‘छोले’

एरव्ही राजकीय पटलावर वावरणाऱ्या आणि सध्या विविध राजकीय समस्यांना सामोरे जात असलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे एक कलात्मक रूप शनिवारी इफ्फीच्या उद्‍घाटन सोहळ्यात पाहायला मिळाले. मुख्यमंत्री सावंत यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर सूत्रसंचालक करण जोहरने त्यांना काही प्रश्‍न विचारले. यावेळी आवडता चित्रपट कोणता असा प्रश्‍न करणने सावंतांना विचारला. यावर त्यांनी ‘छोले’ असे उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर ऐकून प्रेक्षकही काही काळ बुचकळ्यात पडले. करणने खाण्याबद्दल तर विचारले नव्हते ना.., असे अनेकांना वाटले. मात्र, काही क्षणातंच त्याचा उलगडाही झाला. मुख्यमंत्री सावंत यांना ‘शोले’ असेच म्हणायचे होते. परंतु त्यांच्याकडून चुकून अपभ्रंश होऊन छोले उच्चारण्यात आले. विधानसभा तोंडावर आली असताना उमेदवारांच्या नावांची लवकरच घोषणा होईल. त्यावेळी सावंत यांनी बोलताना नावाचा अपभ्रंष करून दुसऱ्याच व्यक्तीला तिकीट देऊ नये म्हणजे झालं... अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झालीय. ∙∙∙

आयत्या सभागृहावर काब्राल

‘आयत्या बिळात नागोबा’ अशी मराठीत म्हण आहे. कुडचडेत त्यात थोडासा बदल करून लोक आता ‘आयत्या सभागृहावर काब्राल’'' असे म्हणू लागले आहेत. याचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी कुडचडेत झालेले सभागृहाचे उद्‍घाटन. वास्तविक हे सभागृह खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या खासदार विकास निधीतून बांधले असून शनिवारी सायंकाळी त्याचे सार्दीन हे उद्घाटन करणार होते. पण काब्राल यांनी सकाळीच जाऊन त्याचे उद्‍घाटन केले. सायंकाळी सार्दिन यांनी पुन्हा त्याचे उद्‍घाटन केले. लोक आता म्हणू लागले आहेत. जर काब्राल यांनी स्वतः काही प्रकल्प उभारले असते तर त्यांच्यावर अशी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे उद्‍घाटन करण्याची पाळीच आली नसती. खरं की नाही! ∙∙∙

‘पिंटी’चे खुली चॅलेंज

कुडचडेचे बाळकृष्ण होडारकर उर्फ पिंटी हे सयंमी व्यक्तिमत्व. काब्रालपासून फारकत घेतल्यापासून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. तरीही लोकं म्हणतात काब्राल आणि पिंटी एकच आहे. यावर खुलासा करताना पिंटीने जाहीर व्यासपीठावरून खुले चॅलेंज दिली आहे की, आपला आणि काब्रालचा कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचा कायदेशीर पुरावा कोणी आणून दिल्यास आपण राजकारणातून संन्यास घेईन. यापुढे जाऊन त्यांनी सांगितले की, जर संन्यास घेतलाच तर काब्रालसोबत आयुष्यात परत एक होणार नाही. हा शब्द आपण कुडचडेवासीयांना देतो असा स्पष्टपणे निर्वाळा दिल्यानंतर आहे कुणाची तयारी खुले चॅलेंज स्वीकारायची? ∙∙∙

पाटकर ‘शायनिंग’

कुडचडेच्या राजकीय रिंगणात सध्या कित्येकजण कबड्डी खेळण्यासाठी उतरले असले तरी सर्वात जास्त चर्चेत आहेत ते काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केलेले युवा उद्योजक अमित पाटकर हेच. त्यांनी कुडचडेत सध्या कार्यक्रम आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपूर्वी कुडचडेत सभागृह उद्‍घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी अमित खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्याच दिवशी सकाळी याच सभागृहाचे उद्‍घाटन नीलेश काब्राल यांनी केले. त्यावेळी त्यांनी जे भाषण केले त्यातील अर्धे अधिक भाषण पाटकर यांना उल्लेखून होते. पाटकरांचा काब्राल यांनी धसका घेतला आहे की काय? ∙∙∙

काँग्रेसचे संघटन गेले कुणीकडे?

मोठा गाजावाजा करून काँग्रेस पक्षाने गोवाभर ‘म्हारगायेचों जागर’ अभियान सुरू केले असले तरी प्रत्येक मतदारसंघात त्या पक्षाला सध्या कार्यकर्त्यांची टंचाई भासत आहे. थिवी मतदारसंघात राष्ट्रीय कीर्ती असलेले पक्षाचे गोवा विभागप्रमुख दिनेश गुंडूराव उपस्थित असतानाही तिथे मतदारसंघातील जेमतेम तिशेक पदाधिकारी व कार्यकर्ते होते. त्यामुळे पक्षसंघटना गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गट, महिला, युवा, सेवा दल, एनएसयूआय, अल्पसंख्याक विभाग, त्याशिवाय त्या मतदारसंघात वास्तव्य असलेले राज्य व जिल्हा समित्यांचे अशा विविध समित्यांचे पदाधिकारी व अन्य क्रियाशील कार्यकर्ते जमेस धरल्यास ही संख्या किमान तीनशे होणे अपेक्षित होते. काँग्रेसचे मतदार जास्त आणि‍ कार्यकर्ते कमी अशी परिस्थिती थिवीमध्ये आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT