Goa Assembly 2022 : तृणमूल कॉंग्रेस आणि मगो पक्षाची नक्की युतीच? की सोयीची सोयरीक? Dainik Gomantak
गोवा निवडणूक

तृणमूल कॉंग्रेस आणि मगो पक्षाची नक्की युतीच? की सोयीची सोयरीक?

तृणमूल कॉंग्रेस (TMC) आणि गोव्यापुरतेच अस्तित्व असलेला मगो पक्ष (MGP) यांच्यात गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly) युती होणे विचित्र असले तरी अतार्किक निश्चितच नव्हे.

दैनिक गोमन्तक

Goa Assembly 2022 : आतापर्यंत पश्चिम बंगालमधला स्थानिक पक्ष अशी ओळख असलेला तृणमूल कॉंग्रेस (TMC) आणि गोव्यापुरतेच अस्तित्व असलेला मगो पक्ष (MGP) यांच्यात गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly) युती होणे विचित्र असले तरी अतार्किक निश्चितच नव्हे. मूल्यविहिन राजकारणातला आणखीन एक प्रयोग या निमित्ताने गोव्याला पाहायला मिळेल.

भाऊसाहेब बांदोडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने येत्या निवडणुकीसाठी कोलकात्यातून नव्या सकाळचे आश्वासन देणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसशी युती करण्याचे ठरवले आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस अजूनही एक प्रादेशिक पक्षच गणला जातो. कॉंग्रेस आणि मार्क्सवादी यांच्यात विभागलेल्या पश्चिम बंगालच्या राजकारणात मुसंडी मारताना ममता बॅनर्जी याना जनता दल ते भाजपा असा परीघ उपलब्ध होता. पण त्यानी स्वतःचा वेगळा पक्ष काढला आणि डाव्यांबरोबर कॉंग्रेसलाही एकहाती धूळ चारली. याचवर्षी मार्च- एप्रिल महिन्यात प. बंगालमध्ये जी विधानसभा निवडणूक झाली तिच्यात या तृणमूलचा मुख्य स्पर्धक होता भारतीय जनता पक्ष. कॉंग्रेस आणि डाव्यांच्या निर्णायक निर्गमनाचे हे संकेत असे म्हणता येणार नसले तरी ममता बँनर्जी याना राष्ट्रीय स्तरावर आपले नशिब आजमावण्याची उर्जा या निवडणुकीच्या निकालाने मिळाली.कोलकात्यापासून दूर असलेला गोवा त्यानी का निवडलाय, ह्याचा उहापोह गोमन्तकने याआधी याच स्तंभातून केलेला आहे.

एक राजकीय जुगार म्हणून तृणमूल गोव्यातील निवडणुकांकडे पाहातो आहे. हा जुगार खेळताना त्यानी काही स्थानिक नेत्यांना वश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गळाला आतापर्यंत लागलेला मोठा मासा म्हणजे लुईझिन फालेरो. त्याना मोठा मासा एवढ्याचसाठी म्हणायचे की ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. एरवी कॉंग्रेसमधल्या सुमार बकुबाच्या नेतृत्वानेही त्यांचे मोल ओळखून त्याना बाजूस फेकण्याची प्रक्रिया सुरू केली होतीच. फालेरो तृणमूलमध्ये गेले आणि त्याची बक्षिसी त्यानी राज्यसभेच्या खासदारकीतून प्राप्त केलीही आहे. पण त्यांच्यानंतर असा कोणताही नेता तृणमूलला मिळालेला नाही, ज्याच्या मागे काही हजार मतांची शिबंदी राज्यांतील प्रत्येक मतदारसंघात असेल. याचाअर्थ असा नव्हे की यापुढेही त्या पक्षाला कुणी मिळणार नाही. जसजसे भाजपा आणि कॉंग्रेसच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होत जाईल तसतसे काही मतदारसंघातले असंतुष्ट अन्य पक्षांबरोबर तृणमूलकडेही वळतील. तृणमूलने त्यासाठी करारबद्ध केलेल्या आयपॅक या यंत्रणेचे कार्यदर्शी विविध मतदारसंघातल्या असंतुष्टांशी संधान साधून आहेत. पण सद्यस्थितीत पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेले मनुश्यबळही नाही.

गोमन्तकने गेल्या सप्ताहात तृणमूलचे काम करण्यासाठी पश्चिम बंगालातून आयात होणाऱ्या तरुणांचे चित्र छापले आहे. गोव्यातील वीजखांबांवर ममता बॅनर्जींचे स्टीकर्स चिकटवण्याचे काम सध्या जोरांत चालले आहे. ते काम या आयात तरुणांचे जथे करतात. स्थानिकाना हे काम द्यायचे असेल तर किमान तिप्पट मेहताना द्यावा लागेल, म्हणून ही आयात सुरू आहे.

अशा परिस्थितीत जेव्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासारखा स्थानिक पक्ष तृणमूलशी युती करतो तेव्हा त्याविषयीचे आश्चर्य वाटून घ्यावे का? मगो पक्ष ढवळीकर कंपूच्या कब्जात गेल्यापासून त्याला तत्वनिष्ठेचा कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही. भाजपा आणि कॉंग्रेस हे अद्यापही देशाच्या राजकारणातले दोन धृव मानले जातात, मगोने सोयीनुसार दोघांशीही युती केली आहे. येनकेन प्रकारेण सत्तेत वाटा मिळवायचा ह्याच एका धोरणावर त्या पक्षाची व्यूहनीती आधारित असल्याचे गेल्या दीड दशकाचा इतिहास सांगतो. भाजपाने ढवळीकर बंधूंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा धसमुसळा अधिक्षेप केला नसता, तर येत्या निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकामेकास सांभाळताना दिसले असते. पण मनोहर पर्रीकरांच्या पश्चात गोव्यातील भाजपा अत्यंत सवंग राजकारण करतो आहे.

त्याला तशाच प्रकारचे राजकारण करत ढवळीकर बंधूंनी प्रत्युत्तर दिलेय. एरवी मगो पक्षाला देण्यासारखे तृणमूलच्या गोवा शाखेकडे आहे तरी काय? लुइझिन फालेरो मगोपच्या व्यासपीठावर चढले तर लाभापेक्षा हानीच अधिक व्हायची! गोमंतकीय जनमानसाला आकृष्ट करू शकेल असा नेता नाही, संघटना नाही आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची फौज नाही अशा तृणमूलचे धाकटे भावंड म्हणून मगो पक्षाने निवडणुकीस सामोरे जाणे पटणारे नाही. मगोपला बारा जागा मिळणार आहेत. चाळीस मतदारसंघ असलेल्या गोव्यांत एकेकाळी सत्तेवर असलेला मगो पक्ष काल परवा आलेल्या पक्षाकडून केवळ बारा जागांसाठी युती करतो आणि दुय्यम भूमिकेत पुन्हा एकदा जातो! या राजकारणापेक्षा अर्थकारणच अधिक दिसते. एक खरे की, ढवळीकर बंधूंच्या दंभाला तृणमूल गोंजारू शकतो आणि निवडणुकीसाठी लागणारा निधीही बिनबोभाट पुरवू शकतो. याची भरपाई करताना सुदिन ढवळीकर भाजपा- कॉंग्रेसच्या आणखीन काही असंतुष्टाना तृणमूलच्या तबेल्यांत नेऊ शकतात. भाजपाला शह देण्यासाठी ममता बॅनर्जी राष्ट्रीय स्तरावर जी मोर्चेबांधणी करू पाहात आहेत, तिच्यातले मगो पक्षाचे स्थान असलेच तर एका प्याद्यापेक्षा अधिक नाही. तृणमूल आणि मगो पक्षामधल्या युतीची गोळाबेरीज ही इतकी आणि इतकीच आहे. त्यातून मगोपने त्याच्या स्थापनेपासूनच्या प्रादेशिकतावादाला आता निर्णायक मूठमाती दिलेली आहे. भाजपाबरोबर युती केली व आत्मघात करून घेतला, असे ढवळीकर बंधू भावनाविवशतेचा आव आणून सांगतात; तृणूमलशी कोणत्या मुल्यांवर आधारीत आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची तसदी त्यानी घेतलेली नाही. त्याना नव्याने जुनाच अनुभव येऊ नये, ह्याच शुभेच्छा. स्वबळावर विधानसभा सर करायच्या वल्गना किती पोकळ होत्या हेही याच दमात पक्षाने सांगून टाकले आहेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT