चोडणकर साहेब हवेत कसले बार काढताय? Dainik Gomantak
गोवा निवडणूक

चोडणकर साहेब हवेत कसले बार काढताय?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पोकळ गर्जना करण्यापेक्षा सरकारपक्षातील मंत्र्याच्या विरोधात त्यांच्यापाशी असलेले पुरावे आताच उघड करणे योग्य ठरेल, हा त्यांच्याही विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, याची जाणीव त्यांना आहे ना?

दैनिक गोमन्तक

गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी बुधवारी कथित सोपटे टॅक्सचा पर्दाफाश केला. डोंगर पोखरून उंदीर काढावा त्याप्रमाणे त्यानी एक ऑडियो रेकॉर्डिंग सादर केले आणि त्यातला आवाज आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopate) यांचा असल्याचे सांगितले. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. किंबहुना ते ऑडियो ध्वनिमुद्रण हाच पुरावा असल्याचे ते सांगतात. तांत्रिक करामतींनी हुबेहूब आवाजाची नक्कल करून ध्ननिफीत निर्मिणे आज अशक्य नाही. चोडणकरांच्या ध्ननिफितीची जेव्हा शास्त्रशुद्ध तांत्रिक तपासणी होईल तेव्हाच तिच्यातला खरेखोटेपणा समोर येईल. तोपर्यंत तरी त्यांचा आरोप हा फुसका बारच ठरतो. कदाचित त्यानाही असे हवेतच वायबार काढणे अपेक्षित असावे. अन्यथा त्यांनी ही ध्वनिफीत कधीच पोलिसांना दिली असती आणि चौकशीसाठी राजकीय दडपण आणले असते. आपल्या पक्षांतल्या शिल्लक आमदारांना घेऊन राज्यपालांकडे जात आमदाराच्या आगळिकीची तक्रार करण्याचाही मार्ग त्यांना उपलब्ध होता. पण त्यांनी नुसती हवा तापवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी, त्यांच्या आरोपाविषयी सांगायचे झाल्यास ''करवसुली'' न करणारा आमदार आज दुर्मिळ झाल्याचे जनसामान्यही जाणतात.

गिरीश चोडणकर म्हणे आता एका मंत्र्याच्या वासनाकांडाचे प्रकरण उघडकीस आणणार आहेत. मंत्र्यांचे नाव घ्यायची त्यांची प्राज्ञा अद्यापही नाही. वासनाकांडांतली कथित पीडिता परराज्यात सुखाने संसार करत असून जर आपल्यावर आगळिक झाल्याची तिची तक्रारच नसेल तर वासनाकांडातली हवाच निघून जाते. असे असतानाही जर गिरीश यांच्याकडे सज्जड पुरावे असतील तर त्यांनी मुदत बिदत द्यायची काय आवश्यकता आहे? एक घाव दोन तुकडे करण्यापासून त्याना कुणी अडवले आहे? येथेच गिरीश यांच्या मूळ हेतूबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतें. त्यांना राजकारणाची साफसफाई अपेक्षित आहे का? तसे असेल तर त्यांनी आपल्याकडले पुरावे उघड करावे आणि मंत्र्यावर नावानिशी आरोप करावे. पण त्याना नुसते हवेत बार काढून राजकारण करायचे आहे. यातून जमेल तशी कुरघोडी विरोधकांवर करायची आहे. अशा प्रकारच्या वायबारांतून त्यांच्याभोवती जमलेल्या गणंगांचीच तेवढी करमणूक होईल. संबंधित मंत्र्यांचे हे काही पहिलेच प्रकरण नव्हे, याआधीही त्यांच्या नावे बरेच प्रताप असल्याचे सांगितले जाते. पण जेव्हा कुणाच्याही चारित्र्याला जाहीरपणे हात घालायचा असतो तेव्हा सबळ पुरावे सोबत असावेच लागतात. गिरीश यांनी त्यांच्याकडे पुरावे असल्यास ते त्वरेने जाहीर करावेत, गोमंतकीयांची विवेकबुद्धी त्या मंत्र्याला सार्वजनिक जीवनातून निश्चितपणे हद्दपार करील.

विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम दोन अडीच महिने शिल्लक आहेत. दीड महिन्यानंतर कधीही आचारसंहितेची घोषणा होऊ शकते. चार होयबांना जमवून अंदाज पंचे आरोपांचा धूर सोडण्याची ही वेळ नव्हे. एव्हाना कॉंग्रेसने आक्रमक कार्यकर्त्याना घेऊन त्या मंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरायला हवे होते, मंत्र्यांसोबत सरकारला पळता भुई थोडी करायला हवी होती. सरकारच्या विषयासक्त प्रवृत्तीचे चारचौघांत वाभाडे निघायला हवे होते. मोर्चे, आंदोलनांनी गोवा ढवळून जायला हवा होता. कल्पना करा की आज मनोहर पर्रीकर असते आणि कॉंग्रेसच्या एखाद्या मंत्र्याचे असे काही प्रकरण उद्भवले असते तर त्यांनी काय केले असते! दिवसाची रात्र करून त्यांनी गोवा हादरवून सोडला असता. विरोधी पक्षाकडून निवडणुकीच्या तोंडावर एवढीही आक्रमकता अपेक्षित धरू नये? कसल्या, डोंबलाच्या मुदती देता? पुरावे असतील तर ते काय उबवायला ठेवले आहेत? की मुख्यमंत्री आपण होऊन संबंधित मंत्र्याला बाजूला करतील अशा भाबड्या आशेने इशाऱ्यामागून इशारे दिले जाताहेत? गिरीश जेव्हा सरकारपक्षांतील मंत्र्याच्या विरोधात अत्यंत गंभीर आरोप करतात तेव्हा पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत त्यांचे विरोधी पक्षनेतेही नसतात, हे कशाचे द्योतक आहे? संबंधित मंत्री दोषी असल्याचे दिगंबर कामत यांनादेखील चोडणकर पटवू शकत नाहीत, असाच अर्थ यातून निघतो.

दयानंद नार्वेकरांच्या विरोधात झालेल्या विनयभंगाच्या वेळचा उठाव गिरीश यांच्या स्मरणात असेलच. नार्वेकर हे काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यानी वेळीच सावध होऊन आपली तटबंदी मजबूत केली होती. हळदोणेच्या मुख्य चौकांत त्यांच्या समर्थकांची झालेली जंगी सभा आम्हाला आजही स्मरते. नार्वेकरांवरले आरोप त्यांच्या मतदाराना मान्य नसल्याचे वातावरण त्या सभेने निर्माण केले होते. पण जेव्हा प्रत्यक्ष मतदान झाले तेव्हा जनतेच्या सूज्ञ मानसिकतेने आपला कौल दिला आणि निवडणुकीचा अनुभव नसलेल्या नार्वेकरांच्या एकेकाळच्या समर्थकानेच त्यांचा पराभव केला. याचे कारण तसे वातावरण तप्त करण्यात विरोधी पक्षाला यश आले होते. एका बाजूने सार्वजनिक जीवनातील चारित्र्याची चाड असलेल्या सामाजिक शक्तींनी उपोषणाचे अस्त्र उपसून सरकारला नामोहरम केले होते आणि विरोधी पक्ष असलेल्या मगोपने विनयभंगाचा आरोप करणाऱ्या मुलीला बळ देत बोलते केले होते. सबळ पुरावा उपलब्ध असल्यामुळे प्रसारमाध्यमेही नार्वेकरांच्या विरोधात खंबीरपणे उभी राहिली होती. राजकारणातील चारित्र्याचा पुरस्कार करायचा असेल तर तेवढी कुमक गिरीश चोडणकर यांनाही जमवावी लागेल. ती जमवण्याची त्यांची क्षमता आहे काय, त्यांच्या पाठीशी सुसंस्कृत समाजातल्या शुचितेच्या जाणिवांनी उभे राहावे एवढी त्यांची राजकीय पुण्याई आहे काय, याचा शोध त्यांनीच घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT