

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपविरोधात एकच विरोधी आघाडी असेल की दोन, यावरचा संभ्रम अजूनही कायम आहे. जागावाटपाची गुंतागुंत वाढत असतानाच, काँग्रेसच्या स्थानिक ब्लॉक कमिटीच्या कार्यकर्त्यांनी 'रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी' सोबत कोणतीही युती नको, आम्ही स्वबळावर लढू, अशी भूमिका घेत काँग्रेस हाऊसमध्ये धाव घेतली, त्यानंतर आता मनोज परब यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे.
काँग्रेसमध्ये विरोध वाढत असतानाच, रिव्होल्युशनरी गोअन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. "युतीवरील चर्चा अंतिम टप्प्यात आहे," असे सांगत मनोज परब यांनी कार्यकर्त्यांना सध्या प्रसार माध्यमांवर फिरणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
"आत्तापर्यंत सर्वांनी दाखवलेला शांतपणा आणि संयम यामधून परिपक्वतेचं दर्शन घडलं आहे. असाच संयम बाळगा आणि पक्षाचं नाव राखा," असे आवाहन त्यांनी 'रिव्होल्युशनरी' कार्यकर्त्यांना केले आहे. एकंदरीत, एकीकडे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा 'आरजी'ला विरोध आणि दुसरीकडे मनोज परब यांचे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन, यामुळे विरोधी पक्षांच्या युतीवर मोठी अनिश्चितता कायम आहे.
बुधवारी (दि. २६) सेंट आंद्रे, सांताक्रूझ, शिवोली आणि थिवी ब्लॉक कमिटीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. व्हिरीयतो फर्नांडिस यांची भेट घेतली. सूत्रांनुसार, ही बैठक उग्र आणि वादळी ठरली.
कार्यकर्त्यांनी आगामी झेडपी निवडणुकीसाठी तुकाराम परब यांच्या रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीसोबत युती करण्याला कठोर विरोध नोंदवला. पाटकर यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या भावना आणि चिंता काँग्रेस हाय कमांडपर्यंत पोहोचवल्या जातील. या विरोधामुळे 'आरजी' पक्षासोबत युती करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.