

काँग्रेस ‘झेडपी’ निवडणुकीबाबत गंभीर आहे?
‘डोळ्यांना पाणी लावणे’ असा वाक्प्रचार आहे. काँग्रेस पक्ष झेडपी निवडणुकीबाबत खरोखर गंभीर आहे का? की केवळ लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रयत्न करीत आहे? असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्ते विचारायला लागले आहेत. झेडपी निवडणुकीत चांगला सकारात्मक निकाल लागला नाही, तर त्याचा विपरीत परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार याची भीती काँग्रेस पक्षाला सतावत असल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. आम आदमी पक्षाने झेडपी उमेदवार जाहीर केले, प्रचारालाही सुरुवात केली. गोवा फॉरवर्डनेही काँग्रेस पक्षाला झेडपी निवडणुकीच्या तयारीच्या बाबतीत मागे टाकले आहे. काँग्रेस अजूनही तळ्यात मळ्यात करीत आहे. अमित पाटकरजी लवकर काही तरी करा, अन्यथा ‘अब पछताए होत क्या जब चिड़िया चुंगी खेत?’ असे म्हणण्याची पाळी येणार असे आम्ही नव्हे, काँग्रेस कार्यकर्ते म्हणायला लागले आहेत.
एल्टन झाले सुपर अॅक्टिव्ह!
राजकारणात जो काम करतो, विकास करतो, तोच टिकतो. हे राजकारण्यांना माहीत आहे. विरोधी पक्षात असलेल्या आमदारांना विकास कामे हाती घेण्यात अडथळे येतात, काही त्या मतदारसंघातील सत्ताधारी नेते विरोधी आमदाराचा ग्राफ खाली खेचण्यासाठी सरकार दरबारी वजन वापरुन विकासकामांना अडथळे निर्माण करतात असा आरोप होतो. केपे मतदारसंघात गेल्या चार वर्षांपासून विकासकामे ठप्प पडली होती. माजी आमदार विकासकामात अडथळे आणतात असा आरोप आमदार समर्थक करत होते. मात्र आता एल्टन डिकॉस्टा यांनी विकासाची गती पकडली असून गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेले आंबावली क्रीडा मैदान पूर्ण करून खुले केले. एल्टन ने रस्ता डांबरीकरणाचे काम ही हाती घेतले आहे. एवढेच नव्हे रखडलेले पोलिस स्थानक इमारत, पालिका इमारत याच कार्यकाळात जनतेसाठी खुली करण्याचे चेलेंज एल्टनने घेतले असल्याचे कार्यकर्ते सांगतात. बेतूल पठारावर भव्य अशी उद्योग नगरी आणण्यासाठी आमदार प्रयत्न करीत आहेत. विकासाची गंगा केपेत आणण्यात एल्टन यशस्वी ठरले, तर मात्र बाबू कवळेकरांना भिवपाची गरज आहे.
वाघांनाही घर हवे!
सध्या राज्यात माझे घर योजनेची मोठी चर्चा आहे. सरकारकडून या योजनेची मोठी जाहिरातबाजी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मतदारसंघात कार्यक्रमांना उपस्थित राहत या योजनेला गती देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच आता व्याघ्र प्रकल्पाचा मुद्दा सार्वजनिक चर्चेत आला आहे. माझे घर योजनेखाली सरकार वाघांना घर देणार नाही का अशी खोचक विचारणा समाज माध्यमांवर केली जाऊ लागली आहे. माणसांना घर देता मग वाघांना का नाही? असा प्रश्न चर्चेत आणला गेला आहे. आता १५डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपर्यंत शब्द बदलून हा विषय चर्चेत राहील असे दिसते. ∙∙∙
चांगल्या कामाची चर्चा!
टॅक्सी व्यावसायिक अलीकडच्या दिवसांत भलत्याच कारणांसाठी चर्चेत आहेत. त्यातही काहीजण चांगले काम करून टॅक्सी व्यवसायाला चांगले नाव कमावून देतात. सावतावाडा-कळंगुट येथील प्रदीप पार्सेकर या टॅक्सी चालकाला टॅक्सीत आयफोन १७ मिळाला. त्याने तीन दिवस प्रयत्न करून त्या विदेशी पर्यटकाला शोधले आणि त्याचा मोबाईल परत केला. टॅक्सी व्यावसायिकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे जसे राज्याचे नाव खराब होते, तसेच अशा चांगल्या गोष्टीमुळे राज्यातील टॅक्सी व्यावसायिक प्रामाणिक असण्यावर शिक्कामोर्तबही होते.
दिगंबरपंतांचे आश्वासन...
गोव्यातील सर्व रस्त्यावरील खड्डे पंधरा दिवसात दूर होतील, म्हणजेच रस्ते दुरुस्त केले जातील, असे साबांखामंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले, जनतेने विश्वास ठेवला. पण त्यांची ही मुदत नेमकी कधी संपणार अशी विचारणा जो तो करत आहे. कारण अनेक महिने गेले, तरी रस्ते काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत. सुरवातीस त्यांनी खड्डयांचे फोटो पाठवा, चोवीस तासात ते बुजवू ,असे आश्वासन दिले होते. पण ते फोल ठरले. त्यांच्या मडगावलगतच्या घोगळ वसाहतीतील रस्ते गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या कामासाठी खोदले गेले, पण परत दुरुस्त केले नाहीत. मंत्र्यांनी मुद्दाम तेथे भेट देऊन पहाणी केली तर नेमके काय चाललेय ते कळून येईल, असे तेथील रहिवासी म्हणताना आढळतात.
धन्यवाद ! पीएम सर !
सुटी आवडत नाही, असा कर्मचारी, अधिकारी किंवा विद्यार्थी आपल्याला शोधून सुद्धा मिळणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पर्तगाळ मठाला साडे पाचशे वर्षे पूर्ण होतात, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या निमित्ताने वाहतुकीत बदल करावा लागणार, वाहतुकीवर मर्यादा येणार आहे. पंतप्रधान भेटीमुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्रास होऊ नयेत, म्हणून शिक्षण खात्याने शुक्रवारी शिक्षण संस्थांना सुटी जाहीर केली आहे. आता शाळा, महाविद्यालयांना आकस्मिक सुटी मिळणार म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक ही खूश आहेत. सरकारी आदेशाचे पोस्ट शिक्षकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर झळकत आहेत. मनोमनी विद्यार्थी व शिक्षक म्हणत असतील थँक्यू पीएम सर!
तांबड्या डोळ्यांचा पोलिस
गोव्यातील पोलिसांमध्ये विविध प्रकारचे पोलिस असून मडगाव पोलिस स्थानकाच्या जवळ असलेल्या एका पोलिस स्थानकात असाच एक पोलिस आहे, की त्याला त्या स्थानकातील सगळे ‘तांबड्या डोळ्यांचा पोलिस’ याच नावाने ओळखतात. आता डोळे लाल कसे होतात? त्याची वेगवेगळी कारणे आहेत. काहीजण या तांबड्या डोळ्यांकडे खऱ्या गोंयकारपणाच्या नजरेने (समजनेवालोंको इशारा काफी है।) पहातात. मात्र फक्त दहा तारखेला या पोलिसाचे डोळे लाल नसतात, असे सांगितले जाते. या पोलिसाकडे म्हणे कलेक्शनचेही काम देण्यात आले आहे आणि हे काम दर महिन्याच्या दहा तारखेला असल्याने त्या दिवशी तरी आपले डोळे तांबडे नकोत? म्हणून तो उपाय घेत असावा, असे सांगण्यात येत आहे.
धन्यवाद ! पीएम सर !
सुटी आवडत नाही, असा कर्मचारी, अधिकारी किंवा विद्यार्थी आपल्याला शोधून सुद्धा मिळणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पर्तगाळ मठाला साडे पाचशे वर्षे पूर्ण होतात, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या निमित्ताने वाहतुकीत बदल करावा लागणार, वाहतुकीवर मर्यादा येणार आहे. पंतप्रधान भेटीमुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्रास होऊ नयेत, म्हणून शिक्षण खात्याने शुक्रवारी शिक्षण संस्थांना सुटी जाहीर केली आहे. आता शाळा, महाविद्यालयांना आकस्मिक सुटी मिळणार म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक ही खूश आहेत. सरकारी आदेशाचे पोस्ट शिक्षकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर झळकत आहेत. मनोमनी विद्यार्थी व शिक्षक म्हणत असतील थँक्यू पीएम सर!
मिकींचा अनाहुत सल्ला!
एकेकाळी मिकी पाशेको हे गोव्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ होते. त्या काळात त्यांनी मनोहर पर्रीकर यांनाही त्यांनी धडा शिकवला होता. पण काळाचा महिमा अगाध असतो असे म्हणतात. तर आज ह्या मिकींकडे कसलेच पद नाही की त्यांना जवळ करणारा कोणताही पक्ष नाही. तरीही ते आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या वल्गना करताना दिसतात. केवळ ते एकटेच नव्हेत तर त्यांच्या सौभाग्यवती नाही ते निवडणुकीत उतरवणार आहेत. मात्र त्यांचा पक्ष कोणता असेल ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर ते कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन शकतात. तर अशा या मिकींनी भाजपाला रोखण्यासाठी विरोधी आघाडी ऐवजी फोरवर्ड व आरजी यांनी काँग्रेस मध्ये विलीन व्हावे असा सल्ला दिला आहे व त्यामुळे सासष्टीत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर मिकींचा त्या पक्षात प्रवेश करून स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्याचा तर त्यांचा बेत नसावा ना अशी चर्चाही रंगू लागली आहे.
बंद दाराआड चर्चा...
आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत, पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प पुढे नेण्यासाठी हालचाल होत आहेत. २०१७ पासून, या पुनर्विकास प्रकल्पाचे भिजत घोंगडे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी, म्हापसा मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमदार जोशुआ डिसोझा यांनी बैठक घेतली. विशेष म्हणजे, पालिकेच्या सभागृहात बंद दाराआड ही बैठक झाली. माध्यमांना या बैठकीत प्रवेश नव्हता. त्यामुळे बैठकीत नेमके कुठले मुद्दे समोर आले किंवा या प्रकल्पात काय काय असणार आहे याची माध्यमांना माहिती मिळाली नाही. बैठकीनंतर आमदारांनी माध्यमांना मोजकीच आपणास हवी तीच माहिती दिली. पण मार्केटच्या विषयवार चर्चा होताना, यात एवढं गुपित ठेवण्यासारखे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. तसेही म्हापशातील सत्ताधाऱ्यांना माध्यमे नकोच, कारण माध्यमांकडून बारकाईने आकलन होते अन् नको त्या गोष्टीचा उलगडता होतो. त्यामुळे माध्यमांना दाखविण्यापूर्तेच केवळ चांगलंच सांगायचं, नकारात्मक गोष्टींचा येथील लोकप्रतिनिधींना ॲलर्जी आहे, हेच खरे म्हणायचे.. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.