अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa crime surge: काणकोणातील चावडी येथे फसलेल्या दरोड्याने रात्रीची गस्त ही किती महत्त्वाची आहे, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. शहराबरोबर गावातही ग्रामस्थांनीही सजग राहणे गरजेचे आहे.
Goa crime
Goa crimeDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे छोटं, शांत आणि पर्यटनावर अवलंबून असलेलं राज्य. पण त्याचे हेच वैशिष्ट्य आता त्याची कमजोरी ठरत आहे. देशभरातून येथे हजारो मजूर, तात्पुरते कामगार, बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार आणि विविध गट सतत ये-जा करत असतात. पर्यटनाच्या नावाखाली प्रवेश करणाऱ्या परदेशी आणि देशी नागरिकांच्या हालचालींवरही नियंत्रण ठेवणे नेहमीच कठीण ठरले आहे.

स्थलांतरितांच्या वाढत्या ओघामुळे गोव्यात कोण कामगार आणि कोण गुन्हेगार याचा पत्ताच लागत नाही. त्याचे पोलिसकार्ड न करताच, त्यांच्यासाठी निवास व्यवस्था केली जाते. त्यांचे गावांत, शहरांत व्यवहार सुरू होतात. हे सर्व बिनदिक्कत सुरू असते. पण जेव्हा एखादी चोरी होते, दरोडा पडतो किंवा खून होतो, तेव्हा सर्व यंत्रणांना जाग येते. पण, तोपर्यंत ते गोव्यातून पसार झालेले असतात. याला आपणच जबाबदार आहोत, हे सरकार, प्रशासन आणि त्यांना कामावर, भाडेकरू म्हणून ठेवणारे सामान्य लोक जबाबदार आहेत, हे मान्य करायला हवे.

९० टक्के लोक भाडेकरू ठेवताना किंवा त्यांना कामावर, घरी ठेवताना त्यांची काहीच माहिती घेत नाहीत. स्वस्तात मजूर मिळाले आणि घरभाडे, आगाऊ रक्कम मिळाली म्हणून पडताळणीकडे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम पुढे घडणाऱ्या घटनांनुसार बसतो. गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेवर गेल्या काही महिन्यांपासून गंभीर सावट पसरले आहे.

Goa crime
Goa Drowning Death: 'मी खेळायला जातो...' शब्द अखेरचे ठरले! धारबांदोडा येथेे दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; दुसऱ्या मित्राला वाचवण्यात यश

दरोडा टाकून गुन्हेगारांनी थेट बांगलादेशात पलायन केल्याचा अलीकडचा प्रकार हा केवळ एक गुन्हा नाही. ती आपल्या सुरक्षा यंत्रणेला दिलेली थेट चपराक आहे. अधिक भीतीदायक गोष्ट म्हणजे, खुनासारखे गंभीर गुन्हे करणारेही याच पळवाटेचा सहज फायदा घेऊ शकतात, हे आता समोर येऊ लागले आहे. याचा अर्थ एकच, सीमा आणि सुरक्षा व्यवस्थेतील भेगा आता धोकादायक पोकळ्यांमध्ये बदलत आहेत.

पर्यटनप्रधान, शांत आणि तुलनेने छोटे राज्य असल्याने गोव्यात विविध प्रदेशांतून लोकांचा सतत वावर असतो. स्थलांतरित कामगार, तात्पुरते मजूर आणि काही वेळा बेकायदेशीररीत्या राज्यात प्रवेश करणारे गट. या सगळ्यांचा मागोवा घेणे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांसाठी आव्हान ठरते. पण पोलिसांसमोरील आव्हानांचे गुन्हेगारांनी आता त्यांच्यासाठी संधीत रूपांतर केले आहे. गुन्हा करा आणि सहज सीमापार व्हा, ही कल्पना आता त्यांच्यासाठी धाडसी वास्तव बनते आहे. अशी मोकळीक मिळाल्यावर कोणाला कायद्याचा धाक वाटणार?

गुन्हेगार परदेशात पळून गेल्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय चौकटीत अडकते. पुरावे, कागदपत्रे, ओळख पटविणे, आणि दोन देशातील यंत्रणांचा मंद गतीने होणारा समन्वय यात वेळ वाया जातो. या सर्व काळात गुन्हेगार हाताबाहेर जातो, पुरावे कमकुवत होतात आणि न्याय व्यवस्थेचा वेग खुळखुळणाऱ्या चाकांसारखा वाटू लागतो.

समाजात मग एकच संदेश पोहोचतो, गुन्हा केला तरी सुटका शक्य आहे. शिवाय येथे गुन्हा करून इतर राज्यांत पळून जाणाऱ्याची संख्याही मोठी आहे किंवा इतरत्र गुन्हे करून गोव्यात लपण्यास येणारेही अनेक आहेत. त्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ किंवा उदो उदो करणारेही अनेक आहेत. त्याबाबत विचार करणेही गरजेचे आहे. ही अवस्था केवळ अस्वस्थ करणारी नाही; ती भविष्यातील गंभीर असुरक्षिततेला इशारा देणारी, आव्हान देणारी आहे.

गोव्यासारख्या छोट्या राज्यात गुन्हेगारांना सुरक्षित आश्रयस्थाने मिळू लागली, तर येथील शांततेचे आणि पर्यटनाच्या विश्वासाचे मोल काही दिवसांतच ढासळू शकते. भविष्यातील गोवा कसा असेल, येथे पर्यटक येतील का? मग पर्यटन व्यवसायाचे का होईल? या प्रश्नाचा डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे.

सीमेवरील तपासणी नाके शोभेच्या इमारती झाल्या आहेत, तेथे तपासणी होत नाही, त्यामुळेच गुन्हेगार सहजपणे पळून जाण्यात यशस्वी होतात. येथून मद्याने भरलेली वाहने कर्नाटक किंवा अन्य राज्यात पकडली जातात, तेथे गोवा बनावटीचे मद्य असा शिक्का मारला जातो. म्हणजे गोव्याची ही एक प्रकारची बदनामी होते, त्याचबरोबरच गोवा पोलिसांची बेअब्रू चव्हाट्यावर मांडली जाते.

एखाद्या गुन्ह्यानंतर थेट सीमापार होणे, मग ते रेल्वे मार्गाने असो, सागरी मार्गाने असो किंवा आंतरराज्य महामार्गांद्वारे गायब होणे, हे नित्याचेच झाले आहे. ही पळवाट गुन्हेगारांसाठी आता अगदी सुरक्षित मार्गासारखी झाली आहे. हे दृश्य अत्यंत चिंताजनक आहे, कारण जेव्हा गुन्हेगाराला पकडले जाण्याची भीती उरत नाही, तेव्हा ही बाब समाजासाठी अधिक धोकादायक बनते.

अशा प्रकारच्या मानसिकतेला पोषक वातावरण तयार झाले, तर कायद्याचा धाक डळमळतो आणि गुन्हेगारीला नवे इंधन मिळते. या सगळ्यातून जनतेला मिळणारा संदेश अत्यंत घातक आहे. गुन्हा केला तरी पळून जाणे शक्य आहे, या परिस्थितीने काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. गोव्याच्या सीमांवर पुरेशी कडक तपासणी आहे का? स्थलांतरित कामगारांच्या नोंदी किती काटेकोरपणे तपासल्या जातात? परदेशी नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली तांत्रिक साधने अद्ययावत आहेत का? दुर्दैवाने, या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नाहीत.

Goa crime
Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

गोवा हे छोटे राज्य आहे, पण त्याची पर्यटन क्षेत्रातली ओळख जागतिक आहे. एका बाजूला शांतता, समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य आणि पर्यटन; तर दुसऱ्या बाजूला वाढती गुन्हेगारी. अशा प्रतिमुळे गोवा बदनाम होत आहे. काश्मीरसारख्या ठिकाणी गोव्यात वास्तव्य करून गेलेले अनेकजण आहेत. काश्मीरमध्ये स्पष्टपणे कोकणी बोलणारे अनेकजण भेटतात, ते विश्रांतीसाठी गोव्यात अनेकवेळा येतात-जातात, ते सगळेच गुन्हेगार नाहीत, पण त्यात लपणारे काही गुन्हेगार असण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने गोव्यात होणारे मोठे महोत्सव, काले, जत्रा, उत्सव, फेस्त याचा विचार करून कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. समाज सुरक्षित ठेवणे, कायद्याचा धाक प्रस्थापित करणे आणि गुन्हेगारीच्या पळवाटा पूर्णपणे बंद करणे, यातच गोव्याच्या प्रशासनाची खरी कसोटी आहे. ही परीक्षा पार न पडली, तर गुन्हेगारी वाढेल आणि गोव्यातील शांततेचा पाया हादरेल.

Goa crime
Goa Drowning Death: 'मी खेळायला जातो...' शब्द अखेरचे ठरले! धारबांदोडा येथेे दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; दुसऱ्या मित्राला वाचवण्यात यश

नागरिकांची सुरक्षितता, राज्यातील स्थैर्य आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास, या तीनही गोष्टींचा प्रश्न आता उभा आहे. आता प्रशासनाने फक्त प्रतिक्रिया द्यायची वेळ नाही, तर दूरदृष्टीने विचार करून निर्णायक उपाययोजना करण्याची वेळ आहे. मुख्यमंत्र्यांची केलेल्या सूचना, मार्गदर्शनानुसार त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

काणकोणातील चावडी येथे फसलेल्या दरोड्याने रात्रीची गस्त ही किती महत्त्वाची आहे, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. शहराबरोबर गावातही ग्रामस्थांनीही सजग राहणे गरजेचे आहे. थोड्याशा भाड्यासाठी मिळेल तेथे आणि येईल त्याची तपासणी न करताच निवास व्यवस्था करणे धोक्याचे ठरेल, तेव्हा घरमालकांनी, भाटकरांनीही आपल्याला भाडे हवे की सुरक्षितता याबाबत विचार करायला हवा.

- संजय घुग्रेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com