Shri Karapurnivasini Shantadurga, Karapur  Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Navratri: वर्सल म्हणजे काय? कारापूरनिवासिनी श्री शांतादुर्गा देवस्थानाच्या व्यवस्थापनाची परंपरा जाणून घ्या

Shri Karapurnivasini Shantadurga, Karapur : श्री शांतादुर्गा देवीचे देऊळ डिचोली तालुक्यातील कारापूर गावात अगदी मध्यभागी वसले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Shri Karapurnivasini Shantadurga, Karapur

प्रा. विघ्नेश शिरगुरकर वांते, सत्तरी गोवा

(vighneshshirgurkar@gmail.com)

गोमंतकात जशी मुळ स्थानावरून विस्थापित झालेली दैवतं आहेत तशीच स्वयंभू दैवतं आहेत. ही स्वयंभू दैवतं कधी लिंग स्वरूपात शिव म्हणून प्रकट झालेली असतात तर कधी रोयण वा वारूळाच्या स्वरूपात देवी म्हणून प्रकट झालेली असतात.

ज्या ठिकाणी रोयणीचे पूजन होते त्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना सहसा होत नाही पण उत्सवमूर्ती किंवा देवीचा सोन्याचा वा चांदीचा मुखवटा रोयणीच्या समोरील भागावर बसवून रोयणीला देवी म्हणून सजवले जाते. आज आपण ज्या देवी विषयी चर्चा करणार आहोत ती आहे.

सांतेर(रोयण)रूपी स्वयंभू अर्थात कारापूरनिवासिनी श्री शांतादुर्गा देवी. देवीच्या पंचायतनात श्री शांतादुर्गा प्रधान देवता तर रवळनाथ, नारायण देव, रामपुरूष, महादेव ह्या इतर परिवार देवता आहेत. गावात इंद्रादेवीचेही देऊळ आहे.

इतिहास (Shri Karapurnivasini Shantadurga History)

'कारापूर' हे नाव या गावास काजरो या झाडावरून पडले असावे असे अनुमान काढला जाते. इथे या गावात काजऱ्याची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावरून या गावाला कारापूर हे नाव पडले असावे श्री शांतादुर्गा देवीचे देऊळ डिचोली तालुक्यातील कारापूर गावात अगदी मध्यभागी वसले आहे.

मूळ स्वरूपात इथे पुर्वी फक्त रोयण होती, मग छोटीशी घुमटी, नंतर छोटीशी देवळी व आता देवीचे भव्य असे मंदिर बांधून श्रीचरणी अर्पण केले आहे. ह्या मंदिराचे सर्व स्थापत्यविषरक काम प्रसिद्ध स्थापत्य अभियंता श्री कमलाकर साधले यांनी केले आहे.

महत्व (Shri Karapurnivasini Shantadurga Importance)

हे देवस्थान व देवस्थानातील समिती ही गावातील बाराजण अर्थात बारा बलुतेदारांनी बनलेली आहे. ही देवी गांवकर घराण्याची कुलदेवता तसेच गावची ग्रामदेवता आहे. गावकर हा देवीची वर्सल करतो. वर्सल म्हणजे काही ठराविक वर्षांनी एका घराण्याला देवस्थानातून येणारी संपूर्ण वर्षाची व त्या वर्षातील सर्व देवकार्याच्या यजमानपदाची व संबंधित व्यवस्थापनाची जबाबदारी.

पाच गांवकर घराण्यांना ही वर्सल वाटून दिलेली आहे व दर पाच वर्षांनी एका घराण्याला वर्सल येते. गावकर, गुरव, घाडी, मडवळ, हरिजन अशा जरी हे देवस्थान सरकारदरबारी मामलेदार कार्यालयांत नोंदणीकृत नसले तरीही देवस्थानच्या प्रशासन व व्यवस्थापनात कुठेही कमी नाही.

देवस्थानचे अध्यक्ष म्हणून कारापूर गावचे 'मोकासदार' गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री प्रतापसिंह राणे सरदेसाई कार्यरत आहेत. जवळपास गावच्या सर्व जमिनींची मालकी त्यांच्याकडे आहे. पण देवस्थान समिती श्री प्रतापसिंह राणे सरदेसाई यांच्या वतीने सर्व देवस्थानची देखभाल करते‌. गावात वास्तव्य करून असलेले मराठे कुटुंब गावच्या पौरोहित्याबरोबरच मंदिरातील नित्यपूजा व इतर देवकृत्ये नियमित पाल पाडतात.

वैशिष्ट्य (Shri Karapurnivasini Shantadurga Significance)

मंदिरात दर महिन्याच्या शुध्द पंचमीला देवीचा पालखी उत्सव असतो. देवीची पालखी देवळातून बाहेर पडून नारायण देवाच्या देवालयापर्यंत जाते व नारायण देवाची भेट घेऊन परत येते. या देवळात संपूर्ण श्रावण महिन्यात भरगच्च कार्यक्रम असतात. दररोज अभिषेक, पूजा व रात्रौ सुश्राव्य भजन असा हा धार्मिक -सांस्कृतिक कार्यक्रम असतो.

श्री शांतादुर्गा देवीचा दोन दिवसीय दिवजोत्सव दरवर्षी साजरा होतो. सायंकाळी कुलपुरूष वा कुलवंशाच्या मंदिराच्या प्रांगणात हा उत्सव साजरा होतो. रात्री ९ वाजता देवीची वाद्यवृंदासह नारायण देवाच्या देवालयापर्यत रथातून मिरवणूक काढण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता सौभाग्यवती स्त्रिया सुहासिनी म्हणून दिवसा पेटवून देवीला ओवाळून दिवजोत्सव साजरा करतात.

तद्नंतर देवाचा कौल अर्थात कौलोत्सवानंतर नाट्य सादरीकरण होऊन या उत्सवाची सांगता होते. या देवस्थानची एक महत्वाची प्रथा वा परंपरा म्हणजे चोरोत्सव. शिमगोत्सवात चोर दारोदारी हिंडतात व त्यांना शिरणी म्हणजे नारळाच्या खोबऱ्याचे तुकडे दिले जातात. शिरणी कधीही त्यांच्या हातावर ठेवली जात नाही तर ज्या घरात वा घरासमोर चोर आहेत त्या घरचा यजमान एका भांड्यातून ती शिरणी अंगणात फेकतो व घरात आतमध्ये धाव घेतो.

नंतर चोर ती शिरणी उचलून पुढच्या घरी जातात. या दिवसांत करवल्या देखील घरोघरी जाऊन शिमगोत्सव करतात. तरूण मुलांच्या मानेवर आंब्यांच्या पानांचे टाळे व अंगावर कमरेला एखादं वस्त्र असं करवलीचं स्वरूप असतं. या देवस्थानात तरंगोत्सवही होतो व सातही वाड्यांवर रवळनाथाची तरंगे फिरतात. गुढीपाडव्याच्या पुर्वी देवीचा कळस सर्व सात वाड्यांवर फिरतो.

नवरात्र विशेष (Navratri in Goa)

नवीन परंपरा निर्माण करणे व नवीन पायंडा पाडणे हे फार महत्वाचे असते. हाच विचार मनात डोळ्यासमोर ठेवून श्री शांतादुर्गा देवस्थान बाराजण समितीने हल्लीच मखरोत्सवाच्या आयोजनाचा शुभारंभ केला. देवीच्या उत्सवमूर्तीला साजेसे अत्यंत सुंदर कलाकुसरींनी युक्त असे एक छोटेखानी मखर या उत्सवासाठी निर्माण करण्यात आले. संपूर्ण नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने दररोज अभिषेक पूजा दुपारी महानैवेद्य व सायंकाळी भजन, किर्तन व मखरोत्सव असा कार्यक्रम असतो.

या नवीन परंपरेच्या निमित्ताने की काय पण गावातील समस्त ग्रामस्थ हा कार्यक्रम याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी अगदी आवर्जून येतात. दसऱ्यादिवशी आपट्याच्या झाडाची पूजा होत नाही तर कलम नावाच्या झाडाची पूजा केली जाते व नंतर सोने लुटले जाते.

कसे पोहचाल? (How to reach sanqulim?)

  • साखळी बस स्थानकापासून हे ठिकाण पाच किलोमीटर आहे.

  • डिचोली बस स्थानकापासून हे ठिकाण सहा किलोमीटर आहे.

  • सर्वात जवळच्या थिवी रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण पंधरा किलोमीटर आहे.

  • दाबोळी विमानतळापासून हे देवस्थान ४६ किमीच्या अंतरावर आहे

  • मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे देवस्थान ३२ किमीच्या अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT