Goa Navratri 2024: माता-पुत्र स्थापन केलेले भारतातील एकमेव मंदिर गोव्यात; वाचा काय आहे आख्यायिका

Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan Marcel: माता देवकी व तिचा पुत्र भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती प्रधान देवता म्हणून मंदिरातील गर्भागृहात स्थापित केली आहे.
Shree DevakiKrishna Ravalnath Mandir
Shree DevakiKrishna Ravalnath MandirDainik Gomantak
Published on
Updated on

Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan Marcel, Goa

माशेल! माशेल म्हणजे कलाकुसर व कलासाधना करणाऱ्या कलाकार तसेच विविध क्षेत्रात विद्वत्ता प्राप्त केलेल्या बुद्धिवंत, बळवंत, धनवंत व श्रमवंतांचा गाव! आपल्या कलेचा, संगीताचा, बुद्धिमत्तेचा व एकूण ऐश्वर्याचा समृध्द वारसा अभिमानाने मिरवणारा अन् येत्या काही वर्षांत 'नगर वा शहर' होऊ पाहणारा निमशहरी प्रदेश.

'महाशैल' व 'महाशाला' असाही ज्या गावाचा उल्लेख होतो ते अत्रुंज महालातील वा फोंडा तालुक्यातील गाव म्हणजे अनेक मंदिराचं गाव म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 'महाशैल' या नावाचा एक सुंदर अर्थ सांगितला जातो. ज्या गावातील ग्रामस्थ प्रत्येक विषयात विद्वान व निष्णांत आहेत ते म्हणजे 'महाशैल'. अर्थात हे गणेश चतुर्थीच्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक व चित्तवेधक देखाव्यांच्या निमित्ताने वेळोवेळी व वर्षांनुवर्षे सिध्द झालेलेच आहे.

पण हा देऊळाराऊळांनी युक्त असा गाव आपलज्ञ संपूर्ण देशात एकमेव अशा प्रकारच्या मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. ते देवस्थान म्हणजे श्री देवकीकृष्ण रवळनाथ संस्थान.

ह्या देवस्थानातील पंचायतनात श्री देवकीकृष्ण ही प्रधान देवता आहे तर श्री भुमिका परमेश्वरी, श्री लक्ष्मीनारायण, श्री कात्यायनी, श्री लक्ष्मी रवळनाथ (पिशे रवळू) व लक्ष्मी रवळनाथ (शाणो रवळू) हे दोन्ही अश्वारूढ शिवाचे गण अशा पंचिष्ट देवता पंचायतनात गणल्या जातात तर चोडण गावातून विस्थापित झाल्यावर स्थलांतरित होताना चोडणेश्वर व महादेव अशा सोबत आलेल्या दोन शिव देवता असा एकूण परिवार या संस्थानात आहे.

Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan FB

लक्ष्मी रवळनाथ (पिशे रवळू) हे दैवत पांडववाडा या ठिकाणी स्थापित आहे तर लक्ष्मी रवळनाथ (शाणो रवळू) हे दैवत गावणेवाडा या ठिकाणी स्थापित केलेले आहे.या देवतांव्यतिरिक्त झाड साखळ व मल्लिनाथ हे संन्यासी देवरूपात स्थापित केलेले आहेत‌.

शेकडो वर्षांपूर्वी ह्या मंदिराचे बांधकाम करताना पारंपरिक पद्धतीचे सिमेंट अर्थात गूळ, चुना, उडीद डाळ यांचे मिश्रण करून ते मिश्रण अनेक दिवस कुजवून मग चिरे व माती यांचा वापर करून मंदिर बांधण्यात आले होते व गेल्या काही वर्षांपुर्वी त्यावर आधुनिक सिमेंट वापरून प्लास्टरींग करण्यात आले.

इतिहास (History of Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan)

अंदाजे इसवी सन १५६० ते १५८० या सालात पोर्तुगीज पाद्री व इतर धर्मवेड्या जहाल जेझुईट धर्मगुरूंचे आगमन होऊन मंदिरभंजनाचा पहिला हातोडा पडला तो तिसवाडी महालावर (महाल‌ म्हणजे तालुका) पडला. यातून चोडण बेट सुटले असते तर नवल.

चोडणचे संस्कृत भाषेतील मूळ नाव चूडामणी असे आहे व पोर्तुगीज भाषेत ते शोरांव(Çhorao) असे छिन्नविच्छिन्न झाले आहे. श्री देवकीकृष्णाच्या देवालयावर पोर्तुगीजांचा हल्ला होताच या संस्थानचे सर्व महाजन व कुळावी आपला देव घेऊन मये या ठिकाणी आले.

Summary

मये या ठिकाणी आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात सुमारे शंभर ते दीडशे वर्षांच्या कालावधीत हे देवस्थान मये गावात होते. तिथून मग ते देवस्थान माशेल या गावी आले जिथे वर्तमान स्थितीत संपूर्ण देवस्थान प्रस्थापित आहे.

माशेल गावात येऊन संस्थानाला जवळपास साडेतीनशे वर्षे झाली असा अंदाज संबंधित अधिकारिक पदस्थ व्यक्त करतात. मुळचे करमळी गावातले व मूळ शेणवी घोटिंग हे आडनाव असलेले श्री सिध्देश आचार्य यांचे कुटूंब गेल्या चार पिढ्यांपासून पुजारी म्हणून कार्यरत आहे.

गेली शंभर ते सव्वाशे वर्षे त्यांचे कुटूंब श्रीचरणी सेवा करत आहे. श्री. आचार्य यांच्या पणजोबांच्या विद्वत्तेचा यथोचित सन्मान म्हणून 'आचार्य' ही पदवी पर्तगाळ मठाधीश स्वामींनी त्यांच्या पुर्वजांना बहाल केली.

महत्व (Importance of Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan)

या देवस्थानाला अखिल भारतीय पातळीवर महत्व आहे. कारण माता-पुत्र स्थापन केलेले हे एकमेव देवस्थान आहे असा दावा संबंधितांकडून ठामपणे केला जातो. माता देवकी व तिचा पुत्र भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती प्रधान देवता म्हणून मंदिरातील गर्भागृहात स्थापित केली आहे. देवाला प्रार्थनापुर्वक गाऱ्हाणे सांगून त्या दांपत्याच्या विशेषतः सवाष्ण स्त्रीच्या ओटीत ही तुळशीकाष्ठाची मुर्ती दिली जाते.

१९७९ साली मूळ मुर्तींचे विसर्जन व नवीन मूर्ती प्रतिष्ठापना झाली. झिज झालेली मूर्ती आधी विहीरीत व नंतर समुद्रात विसर्जित करण्यात आली. या मुर्तींव्यतिरिक्त उत्सवमूर्ती म्हणून तुळशीकाष्ठ अर्थात तुळशीच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेली बाळकृष्णाची मूर्ती आहे.

Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan FB

जी गर्भागृहात समोर ठेवण्यात येते तसेच पालखीत देवकीकृष्णाची उत्सवमूर् तीव समोर तुळशीकाष्ठाचा बाळकृष्ण असे देव पालखीत उत्सवसमयी विराजमान होतात. एकादशी व उत्सवाचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी एक देवकृत्य केले जाते.

नवरात्री विशेष (Navratri in Goa)

नवरात्रीत उत्सव हा देवकीकृष्णाचा असतो, मखरोत्सवाला मखरात देवकीकृष्ण बसतो पण नऊ प्रकारच्या धान्याची पेरणी करून मातीच्या रूजवणावर घटरूपात शारदीय नवरात्र बसते ते भुमिका परमेश्वरीचेच‌. संपूर्ण गोव्यात हे असे एकमेव देवालय आहे जिथे मखर देवाच्या समोर नव्हे तर देवाच्या बाजूला दक्षिण-पश्चिम असे लावले जाते.

नवरात्रीत नित्य कार्यक्रम हा ठरलेला असतो. सकाळी सर्व पंचिष्ट देवतांना अभिषेक, दुपारी आरती व नित्य अन्नसंतर्पण, संध्याकाळी सहा वाजता घंटानाद करून इशारत व नंतर नौबत, आठ ते दहा किर्तन व दहा वाजता मखर हलवायला सुरुवात होते. आतल्या देवाची व मखराची आरती एकदाच होते.

Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan FB

नवमीला भुमिकेच्या घटाची आरती व घटविसर्जन झाले की सर्व देवांना अर्पण करून उरलेल्या रूजवणाचे भाविकांमध्ये वितरण होते‌. या दिवशी पिशे रवळू व शाणे रवळू अशा दोन्ही रवळनाथांच्या तरंगाचे पूजन व देवाला उपाहार दाखवला जातो.

सायंकाळी रवळनाथाची आरती झाल्यावर तेथील 'भगत' हा सेवेकरी 'कवदा' अर्थात मशाल पेटवतो व देवास पाठ न करता माघारी येऊन तरंगांना ती ज्योत दाखवून अक्षता टाकून तो 'कवदा' घंटेखाली उभा असलेल्या हरिजन सेवेकऱ्याच्या हाती देतो.

हरिजन सेवक बाहेर गेल्यावर देवळाचे दार बंद होते. सर्व भाविक आत राहततुव कोणाला देवळाच्या बाहेर जायची परवानगी नसते. हरिजन सेवक तो 'कवदा' नेऊन म्हारिंगणाकडे ठेवतो व तिथे आवश्यक विधी करेध तो आल्यावर दार उघडले जाते.

दसरा

दसऱ्याला महापर्वणी असते व या दिवशी दिवसभराचे नित्य कार्यक्रम झाल्यावर ०४:३० वाजता इशारत होते दोन्ही लक्ष्मी रवळनाथ देवांची तरंगे देवकीकृष्णाकडे येतात व चांदीचे देव व तुळशीकाष्ठाचा बाळकृष्ण बसलेली चांदीची पालखी सिमोल्लंघन करण्यासाठी खांडोळा गावाच्या वेशीवर जाते.

तिथे शमी व आपट्याच्या पेडावर संस्थानच्या अध्यक्षांतर्फे व नाईक कुळावींतर्फे अश्मांतक पूजा व शस्त्रपूजा होते तद्नंतर अध्यक्ष पालखीची पूजा करतात व नाईक तरगाची पूजा करतात. तरंगे व पालखी परत आल्यावर नवरात्री उत्सव संपतो.

कसे पोहोचाल? (How to reach Marcel Goa?)

  • गोव्याची राजधानी पणजीहून हे देवस्थान 35 मिनिटांच्या अंतरावर म्हणजेच 17 किलोमीटर आहे.

  • करमळी या सर्वात जवळच्या रेल्वे स्टेशन पासून हे ठिकाण 20 मिनिटे म्हणजेच दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे.

  • दाभोळी विमानतळापासून हे देवस्थान एका तासाच्या अंतरावर म्हणजेच तेहत्तीस किलोमीटर आहे.

  • मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे देवस्थान सव्वा तासाच्या अंतरावर म्हणजेच 49 किलोमीटर आहे.

Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan FB

कुठे राहाल (Where to stay at Marcel?)

  • देवस्थानच्या भक्त निवासात फक्त भक्तमंडळींना खोली मिळते.

  • ओल्ड गोवा व पणजीपासून हे देवस्थान जवळ असल्याने या दोन्ही ठिकाणी चांगल्या व स्वस्त हॉटेलमध्ये राहता येते व इथे रूम स्वस्तात उपलब्ध असतात.

हे करा (Do's)

  • देवळात जाताना अंगभर कपडे घालून जा.

  • देवळात शांतता राखा.

  • देवळात शिस्त पाळा.

  • लहान मुलांना देवळात शिस्त पाळायला शिकवा.

Shree DevakiKrishna Ravalnath Saunsthan FB

हे करू नका (Dont's)

  • स्त्रियांनी तोकडे कपडे घालून देवळात जाऊ नये.

  • कोणीही कोणत्याही प्रकारचे मद्यपान, मांसाहार, मत्स्यहार किंवा अपेयपान करून देवळात प्रवेश करू नये.

  • देवस्थान समितीच्या परवानगीशिवाय फोटोग्राफी व्हिडिओ ग्राफी करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com