डिसेंबर महिन्यात गोव्यात आयोजित होणाऱ्या सेरेंडीपिटी महोत्सवाची रूपरेषा निवडक उपस्थितांसामोर सादर करण्यासाठी, मळा येथील 'टी ट्रंक' या छोट्याशा परंतु आकर्षक कॅफेमध्ये आयोजकांनी विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
'टी ट्रंक'च्या स्निग्धा यांनी अनोख्या मिश्रणाचा चहा आणि तसेच चहाचा स्वाद असणारे विविध प्रकारचे स्नॅक्स यातून उपस्थितांच्या केलेल्या आदरातिथ्यामुळे या कार्यक्रमाला आगळी लज्जत लाभली.
सुरुवातीपासून सेरेंडीपिटी महोत्सव उत्सव आणि चिंतनशील यांचे एक सर्जनशील ठिकाण राहिले आहे. इथे कलाकार जोखीम पत्करताना आणि प्रेक्षकांच्या मनात उत्कट प्रतिध्वनी उमटतील अशा कला सादर करताना दिसतात.
12 ते 21 डिसेंबर या दिवसात आयोजित होणाऱ्या यंदाच्या अकराव्या आवृत्तीतही सेरेंडीपिटी महोत्सव नृत्य, नाट्य आणि संगीत आणि इतर दृश्यकलांचा उत्सव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. यंदा प्रथमच 12 आणि 13 डिसेंबर या पहिल्या दोन दिवशी, नागाळी हिल या ठिकाणी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमातून या महोत्सवाला सुरुवात होईल.
मात्र 14 डिसेंबरपासून महोत्सवातील इतर कार्यक्रम पणजी शहरात सादर व्हायला सुरुवात होतील. कला अकादमी, जुने जीएमसी संकुल, आझाद मैदान, सांता मोनिका जेटी, लेखा संचालनालयाची जुनी इमारत, सॅग क्रीडांगण आणि पणजी शहरातील काही इतर ठिकाणांवर महोत्सवातील विविध कार्यक्रम रंगणार आहेत. दरवर्षीप्रमाणे या काळात संपूर्ण पणजी शहर सेरेंडीपिटीपय होईल.
जुन्या लेखा संचालनालय इमारतीत प्रसिद्ध शेफ थॉमस झकारियास आणि द लोकाव्होर यांच्याकडून सादर होणारा 'व्हॉट डज लॉस्ट टेस्ट लाईक' हा यंदाचा भव्य प्रकल्प असेल. इसवी सन 2100चा काळ दाखवणारा हा प्रकल्प हवामान बदल, सांस्कृतिक स्मृती आणि अवाजवी तंत्रज्ञान यामुळे आमच्या ताटांतून आणि आठवणींमधून हळूहळू गायब होणाऱ्या आमच्या कधीकाळच्या परिचित अन्नपदार्थांची आणि त्यांच्या स्वादाची आपल्याला कल्पना करून देईल.
यंदाच्या महोत्सवातील नाटके निवडण्यासाठी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक महेश दत्तानी त्यांचेही योगदान आहे.
त्यांनी क्युरेट केलेली नाटके क्लिष्ट सामाजिक प्रक्रिया, जात, वर्ग आणि लिंग यासारख्या सामाजिक संघर्षातून तयार होणाऱ्या खंडित जगाची ओळख आणि जगण्याच्या दैनंदिन वाटाघाटी प्रतिबिंबित करणारी आहेत.
सेरेंडीपिटी कला महोत्सवासाठी नोंदणी सुरू झाली आहे. या महोत्सवाचा भाग असलेल्या कार्यशाळा, सादरीकरणे, प्रदर्शने यासंबंधी माहिती लवकरात घोषीत केली जाईल.
सेरेंडीपिटीने आपल्या कार्यक्रमाविषयी माहिती करून देणारा हा संवाद ज्या ठिकाणी आयोजित केला होता ते देखील कल्पक असेच ठिकाण होते. 'टी ट्रंक'च्या स्निग्धा यांनी आपल्या या अनोख्या जागेची ओळख करून दिली. 'चहा' या घटकाचा व्यावसायिक स्तरावर अभ्यास करून त्यांनी 'टी ट्रंक'ची सुरुवात केली.
जपानी चहा आणि चहाचे मिश्रण हा त्यांच्या अभ्यासाचा विशेष विषय होता. वेगवेगळ्या वनस्पती, मसाले, फुले आणि विविध चहाचे प्रकार यांचे मिश्रण करून इथला चहा तयार होतो. इथे तयार झालेले चहाचे मिश्रण अनेक देशात देखील जाते. एका युरोपियन मासिकात, मृत्यूपूर्वी अवश्य भेट द्यावी अशा १५० चहाच्या ठिकाणांवर लिहिले गेले आहे. त्या दहा ठिकाणात 'टि ट्रंक'चा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.