कीर्तीकुमार प्रभू
नाटक उजेड-काळोख या प्रकाश माध्यमाच्या खेळावर आधारलेले आहे. नाटकाच्या पडद्यामागे असंख्य मानवी आणि यांत्रिक यंत्रणा अथकपणे कार्यरत असतात तेव्हाच लोकांना नाटकाचा आनंद मिळतो. सर्वांच्या सहकार्याने घडणारी ती एक कलाकृती असते. ज्या उजेडात नाटक सुरु होतं त्या प्रकाशयोजनाकाराची ओळख मात्र पडद्यामागेच राहते. अशाच एका पडद्यामागील सहकाऱ्याचे नाट्यक्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण आहे-माशेल येथील शरद हरि शेट नार्वेकर. त्यांचा जन्म १५ जून १९५१ रोजी माशेल येथे झाला.
पूर्वीच्या काळी विजेवर चालणारी प्रकाशयोजना नव्हती. तेव्हा दिवाबत्ती (पेट्रोमॅक्स) या दिव्यांचा वापर नाटकाच्या प्रकाश योजनेसाठी केली जायचा.
त्या काळात शरद दिवाबत्ती दुरुस्तीचे काम करण्यापासून समोरचे दोन (किंवा चार), खालचे दोन (फूटस्पॉट) यांची उघडझाप दोरीच्या साहाय्याने करत नाटकाला पूरक प्रकाशयोजना करीत असत- नाटकाला साहाय्य करणे, प्रकाश मंदावला की तो दिवा झाकायचे काम कराणे, नाटक संपल्यावर सर्व सामान पुर्ववत ठेवणे वगैरे. दिवाबत्ती वापरून प्रकाशयोजना करणारे शरद हरि शेट नार्वेकर हे हयात असलेले कदाचित गोव्यातील त्या काळाचे एकमेव प्रकाशयोजनाकार असतील.
कौंटुंबिक कारणात्सव माशेल सोडून साकोर्डा (कुळे) या गावी राहिल्याने नाटकाचे पडदे लावणे, मेकअप, पोशाख, रंगमंच व्यवस्था पाहाणे ही कामे करताना नाटकाला लागणाऱ्या बत्ती दुरुस्तीकडे शरद आकर्षित झाले व केरोसिनवर चालणारी उपकरणे दुरुस्त करायला शिकले. आत्मसात केलेली कोणतीही कला उर्वरीत आयुष्य उपजिवीकेचे साधन होते तसेच शरदचे झाले. जवळच्या गावामध्ये नाटक सादर व्हायचे असल्यास शरदला नाटक कंपनीचे बोलवणे येऊ लागले. नंतर शरदने ठाम ठरविले की याच व्यवसायामध्ये आयुष्य घालवायचे.
१४ वर्षे साकोर्डा गावात राहिल्यानंतर सांस्कृतिक वारसा असलेल्या माशेल या आपल्या जन्मगावी परतले व नव्या जोमाने कॅरोसिनची उपकरणे दुरुस्तीची कामे सुरु केली. अल्पावधीतच पेट्रोमॅक्स दुरुस्तीची अनेक कामे त्यांना मिळायला लागली.
माशेल गाव हे नाटकांचे आगर. दरवर्षी माशेल पंचक्रोशीत नाटकांचे जवळ-जवळ पन्नास प्रयोग होतात, अवघ्या दोन ते तीन वर्षांमध्ये शरद हे नाव सर्व नाटक कंपनीत व आसपासच्या गावांमध्ये परिचित झाले. बत्ती दुरुस्ती करता करता ते प्रकाशयोजनाकारही बनले.
एकदा विठ्ठल मंदीर येथे शिमगोत्सवाच्या नाट्यप्रयोगावेळी त्यांचा प्रकाशयोजनाकार पोचला नाही. शरद तेव्हा तिथेच होते. सगळा रंगमंच उभारला गेला होता पण बत्तीवाला पोहोचला नव्हता. प्रसंग बाका होता.
रंगमंच व्यवस्थापकाने तिथे उभ्या असलेल्या शरद यांना विचारले की बत्तीचे कामा करणारा जवळपास कोणी आहे का? शरद यांनी त्यांना स्वत: प्रयत्न करुन बघू करु का हे विचारता व्यवस्थापकाने नाक मुरडले पण वेळ कमी असल्याकारणाने त्यांना होकार मिळाला. शरद यांनी एका तासात अडलेले काम पूर्ण केले.
नाटक व्यवस्थापकाने त्यांची विचारपूस केली आणि काही पैसे त्यांच्या खिशात ठेवत त्याला विचारते, तुला नाटकाच्या बत्तीची उघडझाप करता येते का? शरदने होकार दिला. नाटक सुरु झाले आणि संपले. शरद यांना या कामाचीही बिदागी मिळाली. मान आणि धन देणारा हा प्रसंग होता.
नंतरचा काळ शरदच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरला. माशेल पंचक्रोशीत कुठेही, कुणाचेही नाटक असले तरी कंपनीचे व्यवस्थापक शरदलाच प्रकाशयोजनाकार म्हणून बोलवायचे. प्रकाशयोजनेच्या तांत्रिक बाजू सांभाळण्याबरोबर दुरुस्तीच्या कामातही ते पटाईत होते.
मात्र नंतरच्या आधुनिकीकरणाने त्याच्यासारख्या प्रकाशयोजनेकाराची दशा केली. विजेची उपकरणे घरात चालू लागली. नाटकामध्येही विजेवर चालणारी प्रकाशयंत्रणा आली आणि पेट्रोलवर चालणारी बत्ती नाटकातून गायब झाली. नाट्यक्षेत्रातील त्या सुवर्णकाळाच्या आठवणीत शरद अधूनमधून अजूनही रमतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.