Konkani Drama: कोकणी नाट्यस्पर्धेची 49 वर्षे! सेन्सॉर समितीची गरज, संहितेची निवड; काय सुधारणा आहेत अपेक्षित, वाचा..

Konkani Drama Competition In Goa: नाटक हा अथांग महासागर. कला संस्कृतीच्या उत्क्रांतीची हजारो वर्षांची परंपरा असलेला. आनंदाच्या लाटा देणारा. कोकणी नाटक खोल आणि उंच जावो.
Amchan Kul Play Review
Konkani Drama Competition Amchan KulDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी

आमच्या लहानपणी आम्ही घरात एक साधा खेळ खेळत असू. सिगारेटची पाकिटे गोळा करून ठेवत असू. नंतर ती चौकोनी आकारांची पाकिटं पत्त्यांसारखी रांगेत वा नागमोडी वळणं घेत उभी करत असू. पहिलं पाकीट थोडेसे ढकललं की पाकिटं धडाधड कोसळत जाई. ‘आगगाडी आगगाडी, झूक झूक’ असा कोलाहल करत उड्या मारणं हा आमचा बालपणीचा खेळ.

नाट्यकृतीविषयी मी विचार करतो तेव्हा मला ही उपमा आठवते. नाट्यकृतीतही अशीच कलात्मक सुख देणारी सलगता हवी. खिळवून ठेवणारी. आवाज वा पार्श्वसंगीत, प्रकाशझोत या वंगणासारख्या घटकांचं सुसूत्र मिश्रण, अभिनय, विचार, अंत:प्रवाह, संदेश, रूपकं, साहित्यिक मूल्यांची प्रतीकं-प्रतिमा, भावभावनांचं जिवंत नाट्य यांनी प्रेक्षकाला अक्षरश: खिळवून गुंतवून ठेवावं. कलानंदात भिजवून मंत्रमुग्ध करून सोडावं. ती नाट्यकृती अंतरंगात व मानगुटीवर रुतून बसावी. आत कुठं तरी मंथन सुरू होऊन सर्जक जाणिवांना प्रेरणा चालना मिळावी.

संहितेतल्या संवादांतील शब्द न् शब्द कोंदणातल्या हिर्‍यासारखा चपखल असावा. त्याला कोकणीचा सुगंध असावा. म्हणी, वाक्प्रचार व प्रचलित भाषेतील शब्द संवादात अविभाज्य घटक होऊन यावे. वाचिक अभिनयाच्या आरोह अवरोहात ते खणखणीतपणे दाणेदारपणे उसळून यावे. आसमंतात आपला गाज व ऊर्जा सिद्ध करून जावे. शब्द शब्द विणून नाटकाचं कथानक बनतं. शब्द प्रथम. खराब उच्चारामुळे किंवा आवाजाची पातळी खाली ठेवून जर संवादफेक झाली तर ते ऐकू न आल्याने नाटकाच्या प्राणतत्त्वाला मार बसतो. लोकांना नाटकाची स्टोरी कळत नाही.

‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे गो पु देशपांडेंचं नाटक गाजलं. काही विद्वान समीक्षक व मार्क्सवादाचे अभ्यासक अजूनही या नाटकावर टीका करत आहेत. हे टीकाकार म्हणजे सटरफटर लोक नव्हेत.

ते विद्वान प्राध्यापक, साक्षेपी, समीक्षक आहेत. नाटक हा माझा एक अभ्यासाचा, आनंदाचा विषय राहिल्याने मी महाराष्ट्रातल्या लेखक मित्रांकडून ही माहिती मागवली. सत्यकथा मासिकात फेब्रुवारी १९७७ साली त्र्यं वि सरदेशमुख यांचा लेख प्रकाशित झाला होता व शरद नावरे यांचा गाजलेला लेख पुण्यातील एका मित्रांनी पाठवले. एकाने मला इंग्रजी नियतकालिकावर आलेला या नाटकावरील लेख पाठवला.

या सर्व लेखात पराकोटीची खोल चिकित्सा आहे. विशेष म्हणजे गोपु त्या काळी नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला होते. प्राप्त माहितीप्रमाणे त्यांना या नाटकाविषयी वार्तालाप करायला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये बोलावणे येई. गोपुंची बहीण ज्योती सुभाष यांनीही एनएसडीमध्येच नाट्यकलेचे स्नातक शिक्षण घेतले आहे. ‘उद्ध्वस्त नाटक’ मराठी, हिंदीमध्ये गाजलं. पण ते मूळ स्वरूपात वा अनुवादीत रूपात मंचित करताना नाटकातील या चर्वितचर्वण दुव्यांची, मसाल्याची माहिती दिग्दर्शकाला व अनुवादकाला हवी.

हे नाटक इब्राहिम अल्काझी यांनीही दिग्दर्शित केलं होतं. अल्काझी हे महान नाट्य दिग्दर्शक प्रस्थ. एनएसडीचे संचालक असताना त्यांनी उद्ध्वस्त नाटक बसवलं होतं. नाटकांवर लेखमाला व लेखांवर पुस्तकं आलेल्या ग्रंथांची अनेक उदाहरणे आहेत. विविध भाषेत अशी अनेक उदाहरणे देता येईल आणि आहेत. असे नाटक करताना सखोल अभ्यासाची ही पार्श्वभूमी हवी.

तात्पर्य- स्पर्धेसाठी संहितेची निवड करताना स्पर्धात्मक, साहित्यिक, प्रयोगशील मूल्यं काळजीपूर्वक तोलायला हवी. संस्थेकडून नवकल्पना, अनोखा आगळा ट्रीटमेंट अपेक्षित असतो. संहितेची निवड करताना ती हुडकून काढायला श्रम घ्यावे लागतात. व्यासंगी वाचन हवं. आपले चिंतनाचे एन्टेने सर्वभाषिक रंगमंचाचं भान बाळगणारे असावे.

अनुवाद घेतल्यास तो अनवट (ऑफ बीट) भाषेतील बंगाली, हिंदी वा इतर संहितेचा म्हणजे शक्यतो स्पर्धेत न झालेला असावा. कुठलाही अनुवाद घेतला तर लेखकाची रीतसर परवानगी घ्यायला हवी. कला अकादमीने प्रवेशिका घेतानाच मूळ लेखकाची एनओसी घ्यायला हवी. संहिता सेन्सॉर करायला गोव्यात परिशीलन समिती नाही हा विनोद.

यंदा मिलिंद म्हाडगूत यांनी सर्व १८ नाटकांसाठी लिहिलेली अभ्यासपूर्ण परीक्षणे स्तुत्य. त्यात दिसतो - स्पर्धेच्या दर्जाचा आलेख. लेखक, अऩुवादक, दिग्दर्शक यांना आपण काय पेश केलंय ते नीटपणे वहन झालं का, हे समजायला पाहिजे. एक साहित्यिक व नाटककार या नात्याने मला संवादातील शब्दरचना, प्रचलित सोडून ग्रांथिक शब्द, चुकीचे उच्चार खटकतात. त्याच्यावर कटाक्षाने लक्ष दिलं जावं.

कैक वर्षे या कोकणी नाटक स्पर्धेतील नाटकांचा प्रेक्षक, परीक्षक, लेखक, अनुवादक, कोकणी चळवळीचा सेवक या नात्याने मी साक्षीदार आहे. ५० वर्षापेक्षा जास्त मी लिहीत आहे, ही कोकणी नाटकं पाहत आलो आहे.

आरंभीच्या काळात पाच प्रवेशिका कशा येईल याची चिंता आम्हा कोकणीप्रेमींना असायची. कुणाला तरी अनुवाद करायला सांगितलं जायचं. मौलिक स्वतंत्र संहितांचा तेव्हा आणि आताही अभाव आहेच. अभिनेत्री मिळणं सोपं नव्हतं. आर्थिक समस्या होत्या. अशा या कठीण नागमोडी वळणातून, प्रवासातून कोकणी नाट्य स्पर्धा ४९ वर्षांचा प्रवास करत पुढं आली आहे. एक नाटक म्हणजे संस्थेला निदान एक लाख तरी खर्च येतोच. दुसरा, तिसरा प्रयोग बहुधा होण्याची शक्यता कमीच असते.

तरीही नाट्यवेड्या गोव्यात पराकोटीच्या उत्साहामुळे व कला अकादमीच्या निरंतर प्रयत्नांमुळे स्पर्धा पुढं मजल मारत आहे. खिशाला भुर्दंड घालूनच ही कलेची सेवा, उपासना, साधना चालू आहे. त्यातून फक्त रसमय व टिकणारा आनंद मिळतो इतकंच.

Amchan Kul Play Review
Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धेत चुरशीचा अभाव, रसिकांचा अल्‍प प्रतिसाद; स्पर्धकांची संख्याही घटली

कलाकार जितका प्रामाणिक तितका हा आनंदरस मोठा. चहाचा कप टेबलावर ठेवल्यावर तिथं एक वर्तुळाकार छाप येतो तशी ही आनंद-वर्तुळं रंगसाधकाच्या प्रामाणिक हृदयात कायमची मुद्रा कोरून जातात.

शेवटी काही सूचना - कला अकादमी आणि कोकणी अकादमी यांनी एकत्र येऊन स्पर्धेच्या बर्‍याच आधी एक कार्यशाळा घेऊन कोकणी उच्चारण, भाषेचे बारकावे, म्हणी, वाक्प्रचार, कोकणी सुगंध याविषयी मार्गदर्शन करावं. मुख्य चुका, घोडचुका कुठे होतात, त्या कशा सुधाराव्यात हे सांगावं.

Amchan Kul Play Review
Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धा रंगणार 20 फेब्रुवारीपासून, वीस नाटकांचा सहभाग

पुढील वर्षी कला अकादमीची कोकणी नाट्य स्पर्धा ५०वी म्हणजे सुवर्ण महोत्सवी. २५ वर्षे टप्प्यावर अकादमीने एक पुस्तिका काढली होती. सुवर्ण महोत्सवी स्पर्धेच्या निमित्ताने अशीच एक पुस्तिका प्रकाशित केली तर उत्तम डोक्युमेंटेशन होऊन जाईल.

नाटक हा अथांग महासागर. कला संस्कृतीच्या उत्क्रांतीची हजारो वर्षांची परंपरा असलेला. आनंदाच्या लाटा देणारा. कोकणी नाटक खोल आणि उंच जावो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com