Eco-Culture of Goa Festivals Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

पर्यावरण मूल्यांपासून आपण दूर जातोय का? गोव्यातील निसर्गस्नेही जत्रांचे बदलणारे स्वरुप आणि सावधगिरी

Eco-Culture of Goa Festivals: एकेकाळी प्रियोळ हा गाव जायांच्या फुलांसाठी ख्यात होता. गावातील बरीचशी कुटुंबे सणासुदीच्या वेळी जायांची विक्री करायची.

गोमंतक ऑनलाईन टीम

अ‍ॅड. सूरज मळीक

अंत्रुज महालातील म्हार्दोळ येथील म्हाळसा नारायणी मंदिरातील देवीला जायांची फुले भरपूर प्रिय आहेत. या पांढऱ्या शुभ्र फुलांनी भरभरून अलंकृत केलेल्या देवीचे रूप तनामनाला अतिशय उत्साह आणि प्रसन्नता प्रदान करणारे असेच असते. एकेकाळी प्रियोळ हा गाव जायांच्या फुलांसाठी ख्यात होता. गावातील बरीचशी कुटुंबे सणासुदीच्या वेळी जायांची विक्री करायची. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक जत्रेच्या निमित्ताने त्यांना आर्थिक लाभ व्हायचा. या फुलांच्या सुगंधाने आजही लोकमानसाला भुरळ घातलेली आहे. आपल्या आराध्य दैवताला जायांच्या फुलांनी सजवण्याची परंपरा आज अनेक गावांमध्ये स्वीकारलेली पाहायला मिळते.

गोव्यात (Goa) आश्विन-कार्तिक महिन्यात येणाऱ्या दिवाळीत विविध पद्धतीने दीपोत्सव साजरा केला जातो. सर्वत्र परिसर प्रकाशमय होतो. कार्तिक पौर्णिमेला गोव्यातील बऱ्याच मंदिरासमोर असलेली दीपमाळ पणत्यांनी प्रकाशित केली जाते. त्याचप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री पणत्या पेटवून आनंदोत्सव साजरा केला जातो. गोव्यातील सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून ग्रामदेवतेच्या मंदिरात माती किंवा धातूपासून बनवलेले दिवे लावतात.

ईस्टर या ख्रिस्ती सणानंतर येणाऱ्या दुसऱ्या सोमवारी म्हापसा येथील मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त साजरे केले जाते. यावेळी हिंदू धर्मातील भाविक तिच्या उत्सवमूर्तीवर तेल अर्पण करतात. त्याचबरोबर नवस फेडण्यासाठी ते मेणबत्त्या अर्पण करण्यास धन्यता मानतात. तर काही जण लाल आबोल्यांचे गजरे अर्पण करतात.

सत्तरी तालुक्यातील कोपार्डे गावात ब्राह्मणी देवीचे मंदिर आहे. जेव्हा एखाद्या माणसाला सर्पदंश किंवा चर्मरोग झाल्यावर ऍलोपॅथी, आयुर्वेदाची मात्रा लागू पडत नाही, तेव्हा देवीच्या पवित्र कलशातील तीर्थाचा औषध म्हणून वापर करून यावर उपचार केला जातो. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या या मंदिराच्या एका बाजूने दूरवर पसरलेला बोडगिणीच्या झुडपांनी समृद्ध आहेत. कार्तिक अमावास्या आणि मार्गशीर्षाच्या पहिल्या दिवशी दिवजांची जत्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मार्गशीर्षाच्या पहिल्या दिवशीच्या पहाटे काही सुवासिनी पेटलेल्या निखाऱ्यांची आंघोळ करतात. गोव्यातील प्रसिद्ध असलेली ही जत्रा दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवते. कोपर्डे गावातील कष्टकरी लोकमानसावर ब्राह्मणी मायेची कृपा असल्याने आजतागायत या गावात सर्पदंशाने कुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नसल्याचे सांगितले जाते.

गोव्यातील स्त्रियांचा नृत्य, गायन, नाट्य यांसारख्या कलांचा आविष्कार घडविणारा धालोत्सव पौष महिन्यात होतो. या महिन्यातील पौर्णिमेला माशेल येथील देवकीकृष्ण मंदिरात मालनी पुनवेच्या जत्रेत शेतीसाठी उपयुक्त अवजारे व इतर दैनंदिन उपयोगात येणाऱ्या वस्तूंची विक्री केली जाते. याच दिवशी डिचोली येथे माउली देवीच्या मूर्तीला पालखीत बसवून देवाच्या विहिरीवर नेले जाते व तिथे रात्रीचा मुक्काम असतो. तेव्हा चर्मरोग झालेल्या माणसांसाठी मेणकुरे येथील देवीच्या विहिरीतील पाणी औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याचे मानले जायचे. त्यामुळे पूर्वी इथल्या लोकमानसात या रोगावर उपाय म्हणून याच पाण्याचा विशेष वापर करण्याची परंपरा रूढ होती. रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात होणाऱ्या या जत्रा भक्तगणांना अध्यात्माची प्रचिती देतात. फोंडा येथील हडकोण तर डिचोलीतील मये गावात रेड्याची जत्रा मोठ्या उत्साहात होते, तिथे असंख्य भाविकांची गर्दी असते.

मये येथे चैत्रात येणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला महामाया केळबाय पंचायतनात रेड्याची जत्रा साजरी व्हायची. त्यालाच ’थोरली जत्रा’ असेही म्हटले जायचे. मध्यरात्रीला पेटलेला मातीचा महाकाय दिवा माथ्यावर घेऊन माले नाचवले जातात. माशेल येथून देवकी कृष्ण आणि पिसो रवळनाथाची तरंगे होडीद्वारे जलमार्गातून प्रवेश करत मये गावात जत्रेसाठी येतात.

गोवा कोकणात महिनाभर शाकाहार करणारे भाविक वैशाखातल्या शुक्ल पंचमीला शिरगावात अग्निदिव्यासाठी जातात, तेव्हा ते आपल्या हातात रंगीत बेताची काठी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होतात. डिचोलीतील शिरगाव येथील या लईराईच्या धोंडांच्या जत्रेत लाखो भाविक भारावलेल्या अवस्थेत उपस्थित होतात. देवीचा कलश माथ्यावर धारण करून निखाऱ्यांवरून चालू लागल्यानंतर त्याच्या पाठोपाठ स्त्री पुरुष, जाती जमातींमधील भेदाभेद विसरून भाविक अग्नी दिव्य करण्यास सज्ज होतात.

काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ, गावडोंगरी आणि खोतीगावातील अवे येथील मल्लिकार्जुनाच्या मंदिरात शिशिरान्नीची जत्रा होते. यात तीन पुरुषांचा विशेष सहभाग असतो. पारंपरिक वेशभूषेत जमिनीवर या तिन्ही पुरुषांचे डोके एकमेकांना टेकून झोपवले जाते. संगीताचा नाद सुरू असताना मातीच्या भांड्यात मानवी डोक्यांच्या चुलीवरती भात शिजवला जातो.

भुताखेतांची वक्रदृष्टी होऊ नये आणि अदृश्य असणाऱ्या देवचाराचे आशीर्वाद आपल्याला लाभावेत म्हणून शिगम्याच्या कालखंडात गोव्यातील कुडणे, वरगाव, मडकई, पिळगाव, बोर्डे या गावांमध्ये गड्यांची जत्रा होते. म्हणून शिगम्यात गड्यांच्या उत्सवाचे आयोजन केले जाते. डिचोलीतल्या साळ या गावात फाल्गुन पौर्णिमेपासून तीन रात्री गावातील पुरुष भारावलेल्या अवस्थेत जातात. त्यातील काही ठरावीक पुरुष धोतर परिधान करून रानवाटेच्या दिशेने देवचाराने पेटवलेल्या मशालीच्या दिशेने धावू लागतात. अचानकपणे एका जागेवरून लगेच दुसऱ्या जागी पेटणारी मशाल तासन्तास एका जागेवर उभे राहिलेल्या हजारो भाविकांना रात्रीच्या वेळी भारावून टाकते.

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी डिचोलीतल्या नार्वे गावात मृण्मय वारूळ रूपातील मसणदेवीची जत्रा होते. ती भुताखेतांवर नियंत्रण ठेवते. जत्रेच्या सायंकाळी आपल्या परिसरात दफन करण्यात आलेल्या स्त्रियांच्या बंदिस्त आत्म्यांना ती मुक्त करते. त्यामुळे तिथे उपस्थित असलेली मंडळी सूर्यास्तापूर्वी मंदिरापासून दूर जातात. तेव्हा रात्रीच्या वेळी तिथे भुतांची जत्रा होते असे मानतात.

सत्तरीतील (Sattari) करंझोळ गावात चोरोत्सवाची जत्रा साजरी होते. शिमगोत्सव दरम्यान येथे चार पुरुषांची डोकी जमिनीच्या आत पुरली जातात तर अजून चार पुरुषांची डोकी बाहेर ठेवून संपूर्ण शरीर जमिनीच्या आत पुरले जाते. कधीकाळी घाटमार्गाने प्रवास करणाऱ्या युवकांना चोर समजून त्यांना ठार मारण्याची कथा सांगितली जाते. याच आत्म्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा चोरोत्सव होतो.

म्हापसा शहरात अनेक ठिकाणी पूर्वी वायंगणी शेती केली जायची. तिथे असलेल्या केगदीच्या झुडपातून बारमाही वाहणाऱ्या नाल्यातून हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या शेतीला सिंचनासाठी पाण्याची सोय व्हायची. केगदीला स्थानिक भाषेत बोडगी किंवा बोंडका असेही म्हटले जाते. येथील कष्टकरी लोकमानसाने निसर्गात वसलेल्या शक्तीला बोडगेश्वर म्हणून पुजले. आज गोव्यातील निसर्गस्नेही देवदेवतांशी संबंधित जत्रा आणि अन्य उत्सवांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. त्यांच्याशी संबंधित सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मूल्यांपासून आपण दूर जात आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

Viral Post: "चार्म गेला, सर्वात वाईट परिस्थिती"! गोवा पर्यटनाबद्दल रंगली चर्चा; सोशल मीडियावर दिली कारणांची लिस्ट

SCROLL FOR NEXT